Friday, 30 October 2020

कबुल है... कबुल है... कबुल है....


काल पाकिस्तानचे इमरान खान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत बोलताना, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला आपणच घडवून आणल्याची कबुली दिली होती. तसेच, याचा आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे, अशी दर्पोक्ती दिली होती. पण चौधरी यांच्या कबुलनाम्यानंतर संपूर्ण जगात पाकिस्तानची छी-तू सुरु झाली आहे. पाक सरकारच्या या कबुलनाम्यानंतर भारताकडून काय प्रतिक्रीया याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. तशी ती प्रतिक्रीय माजी भारताचे माजी लष्कर प्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी देत, पाकला चांगलेच सुनावले आहे.

जनरल सिंह म्हणाले की, भारत सरकारने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सुरुवातीपासूनच म्हटलं होतं की, हा हल्ला पाकिस्ताननेच घडवून आणला होता. त्यामुळे पाकिस्तानने स्वत:च्याच तोंडून याची कबुली दिली, हे एकप्रकारे चांगलंच झालं. त्यामुळे या कबुलनाम्याचा वापर करुन भारत सरकार पाकला चांगलीच अद्दल घडवेल. आम्ही पाकला दाखवून देऊ की, त्यांना एफएटीएफमध्ये ब्लॅकलिस्टेड कसं केलं जाऊ शकतं.

जनरले व्ही. के. सिंह यांच्या या प्रतिक्रीयेनंतर पाकची चांगलीच भांबेरी उडाली आहे. त्यामुळे पाकने आता लखोबा लोखंडेची भूमिका घेतली आहे. ज्या फवाद चौधरी यांनी संसदेत राणाभीमदेवी थाटात कबुलनामा दिला होता, त्यांच्यावरच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणण्याची वेळ आली आहे. वास्तविक, चौधरी यांना एवढं साधी गोष्ट समजून नये की, ते ज्या व्यासपीठावरुन वक्तव्य करत आहेत, ते व्यासपीठ म्हणजे सर्वोच्च सभागृह आहे. त्या सभागृहातील कोणत्याही मंत्र्यानं किंवा खासदाराने बोललेली एकन् एक गोष्ट ही सभागृहाच्या रेकॉर्डवर जाते. त्यामुळे रेकॉर्डवर आलेली प्रत्येक गोष्ट चिरकाळ कायम राहते. हे साधं चौधरी यांना माहिती नसावं, हे आश्चर्यच आहे. असो.

त्यामुळे चौधरी यांनी हे वक्तव्य अनावधानाने केलं की, त्यांना इमरान खान यांना गोत्यात आणायचं होतं, हा देखील एख प्रश्नच आहे. कारण, आपल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतलीच जाणार, आणि हा विषय थेट संयुक्त राष्ट्रातही उचलला जाऊ शकतो, याची चौधरींना पुरेपूर जाणीव असणार. त्यामुळे यातून पाकिस्तानची चांगलीच नाचक्की होऊन बहिष्कार टाकण्यापर्यंतची वेळ येऊ शकते. पण आता आपण काय बोलून गेलो, याचा उलगडा झाला असल्यानेच त्याचे खापर आपल्यावर फुटायला नको म्हणून चौधरींना आता उपरती आलेली असावी. त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत आहेत.

वास्तविक, पुलवामा हल्ल्यानंतर त्याचे उट्टे भारताने अतिशय चोखपणे काढले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. एकदम म्हणजे पाकिस्तानच्या घरात घुसून भारताने या हल्ल्याचा वचपा काढला होता. एवढंच कशाला यानंतरही भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडले. त्यानंतर त्यांना सन्माने भारताला परत करण्याची वेळ पाकिस्तानवर आली.

कारण या पाठिमागे काय घडलं हे पाकचे खासदार एयाज सादिक यांनीच संसदेत सांगितलं आहे. या माहितीमुळे देखील पाकची संपूर्ण जगात इभ्रत गेली आहे. अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारतीय वायूदलाने जी तयारी केली होती, ती जाणून पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचे पाचावर धारण बसले होते. असे एयाज यांनी सांगितले होते. एयाज यांच्या या वक्तव्यामुळे पाक सरकारसह लष्कराचे ही चांगलेच वाभाडे निघाले आहेत. त्यातच चौधरी यांचा कबुलनामा यामुळे भविष्यात आपल्यासमोर काय वाडून ठेवलंय याची पूरती जाणीव पाकला आलेली आहे. म्हणून आता चौधरी आपल्याच संसदेतील वक्तव्यावरुन हात झटकत आहेत.

वास्तविक, पाकने आतापर्यंत जी काही कृत्ये केली आहेत. त्याचा कच्छा-चिठ्ठा भारताकडे आहे. त्यामुळे आता भारताकडून जसे यापूर्वी उत्तर मिळाले, त्यापेक्षा अनेक पटीने जोरात याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील 26/ 11 च्या हल्ल्यात जिवंत पकडल्या गेलेल्या अजमल कसाबमुळे पाकिस्तान हे कशा प्रकारे दहशतवाद्यांचे आगार बनले आहे, याची माहिती संपूर्ण जगाला मिळाली आहे. त्यानंतर हे प्रकरण संयुक्त राष्ट्रातही गाजले. तिथे पाकची चांगलीच छी-थू झाली. आता पुन्हा तशीच छी-थू होऊ नये, यासाठी पाकने कातडी बचाव धोरण अवलंबले आहे.

काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या स्थायी समितीत आतरराष्ट्रीय दहशतवादच्या समूळ उच्चाटणानाचे उपाय या विषयावर व्यापक विचारमंथन झालं. या बैठकीत भारताने पाकिस्तानची पोलखोल केली. या समितीत भारताचे प्रतिनिधीत्व करताना टीएस त्रिमूर्ती यांनी पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनाच्या यादीतील सर्वाधिक संघटना या पाकिस्तानमध्येच आहेत. यामध्ये जमात-उद-दावा, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन सारख्या संघटनांचा समावेश आहे. याबद्दलचा सविस्तर अहवालच त्रिमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर सादर केला होता.

विशेष म्हणजे, यासंदर्भातील एक अहवाल संयुक्त राष्ट्रानेही तयार केला असून, यामध्ये देखील पाकिस्तानच दहशतवाद्यांचा अड्डा बनल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, पाकचे दहशतवादी हे अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वत्र उच्छाद मांडत असल्याचे स्पष्ट केले होते.

या अहवालानंतर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि एफटीएफच्या नियमांचा दाखला देत पाकिस्तानविरोधात सर्व देशांनी एकत्रित येऊन दबाव वाढवला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता चौधरी यांच्या संसदेतील वक्तव्यामुळे भारताच्या भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचा हा कबुलनामा गोत्यात आणणारा ठरणार आहे, हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment