Thursday 4 January 2018

तरुणाईची वाटचाल पुन्हा 'मंडल' आंदोलनाच्या दिशेने?

गुजरातच्या निवडणूक निकालानंतर काही दिवसांपूर्वी एका मित्राने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, आणि जिग्नेश मेवाणींनी धुरळा उडवल्याचं म्हटलं होतं. त्यातून त्याला मोदींचं नाक कसं कापलं? गेलं हे दाखवायचं होतं. पण त्याला उत्तर देताना मी म्हटलं की, याला धुरळा उडवणं नाही, तर देशाला जाती-धर्मात तोडणं म्हणतात. पण त्याला माझं हे मत विनोदी वाटलं. वास्तविक, इथं माझा उद्देश मोदीचं समर्थन करण्याचा नव्हता, तर देशात जातीपातीचं राजकारण कसं जोर पकडतंय हे सांगण्याचा होता. पण त्यावरुन त्याची आरग्यूमेंट सुरु झाली. स्वतःची भूमिका पुढे रेटण्यासाठी एक-ना-अनेक दाखले देत होता. हे सर्व वाचून मला त्याच्या आकलनाची किव करावी वाटली. कारण केवळ त्याच्या मनात फक्त एकच होतं. ते म्हणजे मोदी द्वेष. हा द्वेष इतका ठासून भरलेला होता की, त्याला काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं.


वास्तविक आजच्या तरुणाईला शालेय जीवनातील प्रतिज्ञेचा 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' याचाच विसर पडलेला आहे. त्यामुळेच आजची तरुणाई राजकीयदृष्ट्या दिशाहीन झालेली आहे. राजकारणासाठी तरुणांचं नेतृत्व विकासापेक्षा जातीला महत्त्व देत आहे. आणि त्यांच्या मागून सगळीच भरकटत आहेत. त्यामुळे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणार्यांना आजची तरुण पिढी नेता मानू लागली आहे.


2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून संपूर्ण देश मोदींच्या पाठीमागे उभा होता. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे वाटलं होतं की, देश आता जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देऊन, विकासाला प्राधान्य देईल. पण 2014 नंतरची परिस्थिती पाहिली, तर फार वाईट वाटते. आज संपूर्ण देश पुन्हा जातीपातीच्या खाईतलोटला जातोय. अन् त्यात तरुणाई अग्रेसर आहे, हे वास्तव आहे.

त्यामुळे आजची स्थिती पाहिली तर 90 च्या दशकातली व्ही.पी सिंग सरकारच्या 'मंडल कमिशन'ची पुनरावृत्ती होईल का? अशी भीती वाटू लागली आहे. कारण त्या काळात या जातीपातीच्या राजकारणापाईच अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यात दिल्ली विद्यापीठाचा एस.एस चौहानने स्वतःला पेटवून घेतले. तर त्याच आगीत राजीव गोस्वामी हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाजला. 14 वर्षांचा त्रास सहन केल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण देशभरात सवर्ण विरुद्ध दलित असा संघर्ष इरेला पेटला. आजही त्याच मार्गावर देशाची वाटचाल सुरु आहे.


आज जातीपातीच्या घाणेरड्या राजकारणातून हार्दिक, अल्पेश, जिग्नेश, कन्हैय्या सारखी तथाकथित तरुण नेते स्वतःला राजकारणात लॉन्च करत आहेत. कन्सट्रक्टिव्ह राजकारणापेक्षा डिस्ट्रक्टिव्ह राजकारणावरच त्यांचा भर आहे. आणि आजच्या तरुणाईला त्यांची हिच डिस्ट्रक्टिव्ह राजकारणाची भूमिका आवडत आहे. हे देशाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे याचा फायदा काही 'जाणते' नेते आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे, पण आदिवासी  बांधवांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन, त्यांच्या हातात शस्त्र देणारे नक्षलवादी संघटनांशी संबंधित संघटना घेत आहेत.


स्वामी विवेकानंदांनी तरुणांनी ध्येय साध्य करण्यासाठी संघटीत होण्याचा मंत्र दिला होता. पण आजचा तरुण विकासाच्या मुद्द्यावर संघटीत होऊन, देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी अग्रेसर होण्याचं ध्येय साध्य करण्यापेक्षा, जातीसाठी संघटीत होत आहेत. प्रत्येकजण दुसर्या जातीचा दुस्वास करत आहे. आणि हे असंच सुरु राहिलं, तर देशाची पुन्हा फाळणी होईल. तेव्हा मात्र ही फाळणी आधीच्या फाळणीसारखी रक्तरंजित असेल, यात शंका नाही.