Friday 14 October 2016

दहशतवाद्यांची फॅक्टरी

उरी हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे, अशी एकच हाक गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिली जात होती. त्याला केंद्राचाही सकारात्मक प्रतिसाद मिळला, अन् गुरुवारी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या घटनेला 48 तास उलटले नाहीत, तोच पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली. भारताला सर्जिकल स्ट्राईक काय असताता, हे आम्ही दाखवू अशी धमकी हाफिज देत आहे. संयुक्त राष्ट्रांनी सईदला 26/11च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले, पण तरीही हा नाग फणा काढून फुत्कारतो आहे. अन् त्याला पाकिस्तानही पाठीशी घालत आहे.
वास्तविक पाकिस्तानची ही दुतोंडी भूमिका काही नवी नाही. काश्मीरविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला नेहमीच खतपाणी घातले. यालाही अमेरिकेचे वेळोवेळी पाठबळ मिळाले. व्हिएतनाम युद्धापासून ते 1990 पर्यंतच्या काळातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हियत रशिया आणि अमेरिका ही दोन बलाढ्य राष्ट्रे समोरासमोर येऊन ठेपली होती. एकमेकाचा वचपा काढण्यासाठी हे दोन्ही देश छोट्या राष्ट्रांचा सदैव वापर करत आली आहेत.
यासाठी सोव्हिएत रशियाने अमेरिकेच्या खालोखाल असलेल्या क्युबाचा, तर अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरले. पाकच्या राज्यकर्त्यांनीही याचा पुरेपुर वापर करुन अमेरिका आणि अरबांकडून बक्कळ पैसा उखळला. अन् तोच पैसा आफगाणमधील तालिबान्यांना आणि मुजाहिद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या काळात पाकस्तानचे मेजर जनरल झिया उल हक यांनी शीतयुद्धाच्या काळात तब्बल 500 अब्ज यूएस डॉलर उखळले. तर सौदी राजपुत्रांनी याच कालावधीत 3.5 अब्ज यूएस डाँलर झियांनी घशात घातले. सेव्हियतांना रोखण्यासाठी आणि आखाती देशातले तेल मिळवण्यासाठी अमेरिकेनेही कधी आखडता हात घेतला नाही. अमेरिकेकडून अब्जावधी डाँलर्सची वाहती गंगा सुरुच राहिली.
अमेरिकेच्या सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी एकप्रकारे अफगाणिस्तानात जिहादची फॅक्टरीच उघडली. आखाती देशातील कोवळा कच्चा माल उचालायचा, अफगाणिस्तानच्या टेकड्यांमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करायची आणि हेच प्रॉडक्ट आखाती देशातील प्रस्थापितांविरोधात त्यांना धक्के देण्यासाठी वापरायचं. हेच उद्योग अमेरिका आणि पाकिस्तान विनासयास करत होतं.
यातूनच मग कालांतराने या जिहादी प्रोडक्टचे विविध गट होण्यास सुरुवात झाली, ओसामाची अल कायदा, आयमान जवाहिरीची पूर्वीची अल-जिहाद, सय्यद अबुल अला मौदुदीची जमाते इस्लामी, मौलाना मुहम्मद इलियास अल कंन्धालवीची तिबलिघ, तिबलिघमधूनच फूटून बाहेर पडलेली दावत-ए-इस्लामी, हफिज-मुहम्मद सईद व झफर इक्बाल या दोन प्राध्यापकांनी लाहोर मध्ये सुरु केलेल्या अहल-ए-हदीथ मदरशातून तयार झालेली जमातुद दावा म्हणजेच लष्कर-ए-तोयबा,बेतुल्लाह मेहसूदची तेहरीक-ए-तालिबान अशा अनेक संघटना पाकिस्तानमध्ये वाढल्या. दहशतवादी संघटनांसाठी या नंदनवनच बनल्या.
अमेरिकेतल्या 9/11 नंतर अमेरिकेचे डोळे खाडकन उघडल्यानंतर अमेरिकन राज्यकर्त्यांनी आपला हात आखडता घेतला. 9/11 च्या हल्ल्यानंतर बुश प्रशासनाने गुड मुस्लीम आणि बॅड मुस्लीमची सरमिसळ घालून आखाती देशाविरुद्ध युद्ध पुकारले. बुशनंतर सत्तारुढ झालेल्या ओबामांनीही तोच कित्ता गिरवला. एकीकडे जगाला शांततेचा दूत दाखवून दुसरीकडे मात्र 9/11चा मास्टर माईंड ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी लष्कराला रान मोकळे करुन दिले. अन् 2011 त्याचा पत्ता लागल्यानंतर त्याचा खात्मा केला.
पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं, पाकिस्तानच्या स्वार्थी राजकारण्यामुळे पाकिस्तान हा देश जिहादची फॅक्टरी बनली होता. काश्मीरला काहीही करुन भारतापासून विलग करायचेच यावरुन त्यांनी विविध गटांना सदैव पाठीशी घातलं. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांनीही वाज खान या पाकिस्तानातील दिग्गज पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमध्ये आपण कशाप्रकारे जिहादची फॅक्टरी चालवतोय याचे दाखले दिले. या मुलाखतीत मुशर्रफांनी लादेन, मौलाना जलालुद्दीन हक्कानी, जवाहिरी हे पाकिस्तानचे हिरो असल्याचं सांगितलं. पण यावेळी खानने मुशर्रफने हाफिज सईदवर कारवाई संदर्भात विचारले, तेव्हा मात्र त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणून वेळ मारुन नेली. आजही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना दहशतवादी हिरोच वाटत आहेत. त्यामुळेच राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांना बुरहान वानी काश्मीरमधील युवा नेता वाटतो.
एकीकडे यूनोच्या व्यासपीठावरुन दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही इतरांसोबत आहोत, असं सांगायचं, पण दुसरीकडं मात्र, दहशतवाद्यांना पाठीशी घालायचे उद्योग पाकिस्तानी राज्यकर्ते इमाने इतबारे करत आहेत. विशेष म्हणजे आता याला चीनी ड्रॅगनचीही साथ मिळत आहे. चीनने वारंवार व्हीटोचा वापर करुन जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला वाचवले आहे. त्यात हाफीज सईदही फणा काढून बसला आहे. राजरोस हे दोन्ही साप भारताविरोधात फुत्कारत आहेत. तसेच अनेक देशांमधून दहशतवादी कुरापती घडवून आणत आहेत.
त्यामुळे यांना ठेचून काढण्यासाठी संयु्क्त राष्ट्राने दहशतवादाचे नंदनवन बनलेल्या पाकिस्तानला टेररिस्ट नेशन घोषित करण्याची गरज आहे.यासाठी अमेरिकेत जी मोहीम सुरु आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेत वसलेल्या भारतीयांनी व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील ‘वुई द पीपल’ सुविधेत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमधील मागणीला आतापर्यंत 5 लाखहून अधिक नागरिकांनी समर्थन दिले आहे. आता अशीच मोहीम इतर युरोपीयन देशांसोबत आखाती आणि एशियाई देशांनी सुरु केल्यास जनभावनांचा आदर राखून संयुक्त राष्ट्राला पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र घोषित करणे भाग पडेल. त्यावेळी चीनलाही आपले घोडे दामटवता येणार नाही हे नक्की!

http://abpmajha.abplive.in/blog/prasanna-joshis-blog-on-pakistan-terrorism

Wednesday 20 July 2016

झाकीर नाईकच्या निमित्ताने...


बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या झाकीर नाईक अनेक इस्लामिक जिहादी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला असल्याचे समोर आले. जगभरातील अनेक तरुण झाकीर नाईकची भाषणे ऐकूनच कट्टरवादाकडे वळत आहेत, हे अनेक दहशतवाद्यांनी जाहीर ठिकाणी लिहल्याने झाकीरसह अन्य मंडळींचे धाबे दणाणले. ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेल्या रोहान इम्तियाज आणि निब्रास इस्लाम यांनीही आपण झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित असल्याचे सांगितले. यातल्या रोहान इम्तियाजने तर आपल्या फेसबुक पेजवर नाईकच्या भाषणानेच आपण याकडे वळल्याचे म्हटल्याने अनेकांची गोची झाली. या प्रकाराने जगात शरियत लागू करण्याच्या नावावर ही मंडळी तरुणांची माथी कशी भडकवतायत हे सर्वांसमोर आले.

ढाक्यातील हल्ल्यानंतर स्वत: धर्माने मुस्लीम असलेल्या आणि एक विचारवंत म्हणून गणल्या जाणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी इस्लामला शांततेचा धर्म समजू नका, असे जाहीर मत मांडून इस्लामच्या प्रस्थापित धर्म पंडितांविरोधात उभा डाव मांडला. जगभरात होणारे दहशतवादी हल्ले आणि त्यामागचे कर्ते करविते धनी हे इस्लामिक विचारवंत असल्याचे समोर येत असल्याने या धार्मिक संस्थांची गोची होऊ लागली. झाकिर नाईक प्रकरणावरूनही हेच पाहायला मिळाले. नाईकच्या कथित धर्म प्रसारामुळे दार-उल-उलूमला थेट आपल्याच जातभाईविरोधात फतवा काढावा लागला. अन नंतर हे प्रकरण अंगाशी येऊ लागल्याने त्यावर सारवासारव करावी लागली. विशेष म्हणजे, यात धर्मगुरू आणि विचारवंतांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. झाकीरच्या समर्थनार्थ सुन्नींचा गट उभा राहीला. तर त्याच्या दुसऱ्याबाजूला शिया धर्मगुरूंनी नाईक विरोधात दंड थोपाटले. मुस्लीम लॉ बोर्डाचे मौलाना खालिद रशीद फरंगी यांनी नाईकला या प्रकरणात गोवण्याचं षडयंत्रच रचलं जात असल्याचा आरोप करून झाकीर नाईकला क्लिन चीट दिली. तर ऑल इंडिया शिया पर्सनल ला बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी झाकिर नाईकवर थेट हल्ला चढवत, त्याचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्याची मागणी केली. त्यामुळे आखाती देशातील शिया विरूद्ध सुन्नी वादाचे वारे आता इतर देशातही वाहू लागले आहेत.

शितयुद्धानंतर आखाती देशात शिया-सुन्नींमधील वादामुळे अनेक हिंसक दहशतवादी संघटना उदयास आल्या. यात मग ओसामची अल कायदा असेल, किंवा मुल्ला ओमरची तालिबान, आणि आताचा इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी. हे सारेच सुन्नी आणि त्यातच कोणत्या ना कोणत्या मदरशाचे मुल्ला-मौलवी. या साऱ्यांनीच शितयुद्धाच्या काळात शियांना चोपून काढले. सौदीच्या राजाश्रयावर पोसलेल्या या तिघांनीही अक्षरश: शिय्यांसोबतच इस्मायली अहमदी आदी आपल्याच जात भाईंचे शिरकाण केले. ढाक्यातही जो हल्ला झाला त्यावेळीही कुराणातील आयत येत नसलेल्या मुस्लिमांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे सध्या जगभरातून शिय्यांना जीव मुठीत धरून आपल्याच देशातून परागंदा व्हावे लागत आहे.

इस्लाम धर्मात कुराणाला सर्वात पवित्र ग्रंथ मानले जातो. पण याच ग्रंथाच्या आयतीचा सोईचा अर्थ लावून तरुणांची माथी भडकवण्याचे काम हे कथित धर्मगुरू करत आहेत. जगभरात शरियत लागू करण्यासाठी जिहाद केला तर जन्नत नसिब होते, हे या धर्मगुरूंचे सांगणे असते. पण खरंच असे होते का हे मुस्लीम धर्माच्याच अभ्यासकांनी मुस्लीम समाजासमोर आणण्याची गरज आहे. वास्तविक, कुराणातील ६,६६६ आयतींपैकी १०००० आयत या वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेली आहेत. पण या वैज्ञानिक रूपाचे दर्शनच तरुणांना घडवलेच जात नाही, अन मग आयतीचा सोईसकर अर्थ लावून तरुणांना दहशतवादाच्या खाईत ठकलले जाते.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जमियत उल हदिसचे सदस्य आणि बंगळुरूच्या दार-उल-इरफात-वल-इरशादचे मिराज शेख रब्बानी हे मौलवी जिहाद कसा करायचा याचे धडे तरुणांना देत होते. यात इस्लाम धर्म वाढवण्यासाठी जर तुम्हाला मृत्यू जरी आला, तरी तुम्हाला जन्नत नसिब होईल, असे हे साहेब सांगत होते. विशेष म्हणजे, ज्यांच्या मनात इस्लामसाठी जिहाद करणे नसेल तो, मुनाफीक (दुतोंडी) आहे असेदेखील हे ठासून सांगत होते. यांची अनेक विखारी भाषणे सोशल मीडियावर आजही उपलब्ध आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्या माध्यमातून काही इस्लामिक धर्मप्रसारक समाजात अशांतता पसरवण्यासाठी कुराणाचा सोईस्कर अर्थ लावून जगात अशांतता पसरवण्याचे प्रकार सुरु असतात. त्याला शह देण्यासाठी इस्लामच्या खऱ्या अभ्यासकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.


Monday 25 April 2016

डोल्कून इसाचा व्हिसा आणि ड्रॅगनची घबराट

प्रसन्न जोशी
सध्या डोल्कून इसाला भारताने ई-व्हिसा दिल्याने चिनी ड्रॅगनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. चीनने भारताच्या या कृतीचा निषेध करून ‘रेड कॉर्नर’ नोटीसचे निमित्त पुढे करीत भारताने इसाला अटक करून त्याला चीनच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली आहे.
चीनला चपराक
वास्तविक नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून दहशतवादाशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढावे, यासाठी जीवाचे रान करीत आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवरून पाकिस्तानच्या कुरापती भारताने वेळोवेळी उघड्या पाडल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून मसूद अझहरला ‘दहशतवादी’ घोषित करण्यासाठी मोदी सरकारने विशेष प्रयत्न सुरू होते. पण, त्यात खोडा घालण्याचे कामचीनने केले. चीनने संयुक्त राष्ट्रसंघातील ‘व्हिटो’चा वापर करून मसूद अझहरवर बंदी घालण्यास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे दहशतवाद्यांना नामोहरमकरण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर पाणी फिरविले गेले अन् अझहर मसूदला मोकळे रान मिळाले. भारत एकीकडे दहशतवादाशी प्रामाणिकपणे लढत असताना, चीनने आपले आशिया खंडावर वर्चस्व कायमठेवण्यासाठी आणि भारताची महासत्तेकडे सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी हे उद्योग केले होते.
चीनच्या मुस्लीमबहुल वीगर (युघूर) प्रांतातील फुटीरतावादी नेता डोल्कून इसा याला २८ एप्रिल ते १ मेदरम्यान हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथे होणार्‍या एका परिषदेला हजर राहण्यासाठी भारताने ई-व्हिसा दिला त्यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताच्या या कृतीवर चीनने आता गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते ह्युआ च्युनिंग यांनी भारताच्या या कृतीचा निषेध करून ‘रेड कॉर्नर’ नोटीसचे निमित्त पुढे केले. त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, ‘‘डोल्कून इसा हा दहशतवादी असून त्याच्याविरुद्ध इंटरपोलतर्फे ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केल्यामुळे त्याला अटक करून भारताने चीनच्या हवाली केले पाहिजे,’’ अशी बडबड सुरू केली आहे. यावर भारताने तूर्तास जरी प्रतिक्रिया दिली नसली, तरी तज्ज्ञांच्या मते, चीनने अझहर मसूद प्रकरणात पाकिस्तानला गोंजारण्यासाठी भारताच्या विरोधात उभा डाव मांडून दहशतवादाला आपलेही पाठबळ दिल्याचे दाखवून दिले आहे.
कोण आहे डोल्कून इसा?
१९४९ साली तिबेटच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ‘पिपल्स् लिबरेशन ऑफ आर्मी’ (PLAPLA )ने आपला मोर्च पूर्व तुर्कस्थानकडे वळवला होता. पूर्व तुर्कस्थानचा घास गिळण्यासाठी च्या आर्मीने या भागात अनन्वित अत्याचार सुरू केले. त्याविरोधात आवाज उठवण्याचे कामरिबीया कादीर यांनी केले. त्यांनी पूर्व तुर्कस्थान आणि उत्तर चीनमधील तुर्की भाषिकांना संघटित करुन मोठे जन आंदोलन छेडले. याच काळात १९६७ साली जर्मनीत जन्मलेला डोल्कून इसा हा १९८०च्या दशकात शिक्षणाच्या निमित्ताने उत्तर चीनमधील सिक्यांग येथे आला. कादीर यांनी उभे केलेल्या आंदोलनाने इसा इतका प्रभावित झाला की, तो त्यांच्या ‘World Uyghur Congress'Unrepresented Nations and Peoples Organization शी जोडला गेला. कारण, त्याच काळात कम्युनिस्टांनी विद्यापीठामधून देखील तुर्की भाषिकांवर अत्याचार सुरू केले होते. तुर्की भाषिकांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी अनेक हातखंडे वापरलेले होते. याच्याविरोधात इसाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या एका गटाने सिक्यांग विद्यापीठात मोर्चा काढला. परिणामी, इसाला विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. अशावेळी त्याने आपले उर्वरित शिक्षण तुर्कस्थानमधील गाझी विद्यापीठातून पूर्ण केले अन् त्यानंतर आपले संपूर्ण जीवन चीनमधील दडपशाहीच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला वाहून घेतले. त्यानंतर चीन सरकारने इसाला अटक करण्याचे अतोनात प्रयत्न केले. पण, १९९७ साली इसा आपली जन्मभूमी जर्मनीकडे परतला. पण, तरीही त्याने पूर्व तुर्कस्थानावर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवणे सुरूच ठेवले. त्यामुळे २००३ साली चीनच्या गृहमंत्रालयाने इसाला ‘दहशतवादी’ घोषित केले. पण, इसाने मात्र चीन सरकारच्या या आरोपांना केराची टोपली दाखवत २००६ साली तैवानमध्ये या संस्थेच्यावतीने आयोजित बैठकीला हजेरी लावली. याची माहिती २००९ साली मीडियातून प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आल्याने इसावर तैवानमध्ये जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. सन २००९ पासून सिक्यांग (झिनजिअँग) आणि वीघर (युघूर) प्रांतांमध्ये चीनच्या शासनाविरोधात मुस्लीमगटाच्या फुटीर चळवळीने आंदोलन सुरू केले. यापैकी सिक्यांग हा प्रांत मुस्लीमबहुल असल्याने या प्रांतातील जवळपास एक कोटींपेक्षा जास्त मुस्लीमबांधव आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाचे नेतृत्व डोल्कून इसाने केले. त्याच्या या आंदोलनामुळे माजी राष्ट्रपती ह्यु जिंतो यांची खुर्ची धोक्यात आली. त्यामुळे अखेर चिनी सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करीत इसाच्या युघूर कॉंग्रेसवर बंदी घातली. यानंतर इसा नेतृत्व करीत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात जवळपास अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर चीन सरकारने ‘इंटरपोल’च्या माध्यमातून इसाला ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावून ‘दहशतवादी’ ठरवले. त्यामुळे इसाला चीनमधून परागंदा व्हावे लागले. बनावट पासपोर्टच्या आधारे त्याने जर्मनी गाठले.
चीनला भीती
इसा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय जगतात मोठी खळबळ उडाली आहे. कारण, इसाच्या भारत भेटीत तो चीनमधून परागंदा व्हावे लागलेल्या दलाई लामा यांनादेखील भेटणार आहे. त्यामुळे या घटनेला आता अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेतील ‘इनिशिएटिव्हज फॉर चायना’ या संस्थेने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यविषयक परिषदेला अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करताना चीनमधून हद्दपार झालेले अनेक लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यकांक्षी नेते उपस्थित राहून स्वातंत्र्य चळवळींविषयी विचारविनिमय करणार आहेत. त्यामुळेच चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सिंहासनाला आतापासूनच इसारुपी भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. कारण, सुरुवातीपासूनच कम्युनिस्टप्रणीत चिनी सत्ताधार्‍यांनी अहिंसक आंदोलनांना दडपण्याचे आक्रमक धोरण अंगीकारले आहे. पण, या परिषदेच्या निमित्ताने कम्युनिस्टांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लागेल, अशी भीती चिनी सत्ताधार्‍यांना वाटू लागलेली आहे. त्यामुळेच चीनने आपल्या परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून भारतावर दबावतंत्राचा प्रयोग सुरु केला आहे.
चीनची दुटप्पी भूमिका
एकीकडे अझहर मसूदला दहशतवादी जाहीर करण्यास नकार द्यायचा, पण दुसरीकडे इसाने अहिंसक मार्गाने आंदोलने करून सरकारला धक्के दिले म्हणून त्याला दहशतवादी ठरवायचे अशी दुटप्पी भूमिका पुन्हा सार्‍या जगासमोर उघड झालेली आहे. अझहर मसूदने निष्पाप लोकांचा बळी घेतला तेव्हा चीनला तो दहशतवादी दिसला नाही. मात्र, जो इसा कम्युनिस्टांच्या जुलमी सत्तेविरोधात आवाज उठवतो त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवायचे आणि त्याच्या अटकेची अपेक्षा भारताकडून करायची अशी ही ड्रॅगची डबल ढोलकी भूमिका सुरू आहे, ऐवढे मात्र नक्की!