बिहार विधानसभेच्या 243 पैकी पहिल्या टप्प्यात आज 71 जागेसाठी मतदान होत असून, 71 जागांवर 1066 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला असून, नेहमीप्रमाणे अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची चिखलफेक सुरु आहे. मात्र, त्यामध्ये सर्वात लक्षवेधून घेणारी वक्तव्ये ठरत आहेत, ती म्हणजे राजदचे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारमधील सध्या स्टार प्रचारक तेजस्वी यादव यांची. तेजस्वी यांनी नुकतेच रोहतास जिल्ह्यातील डेहरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रचारावेळी जातीय वाचक वक्तव्य करुन वोटपोलरायझेशनचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या वडिलांच्या कार्यकाळाचा दाखला देत, “लालू प्रासद यादव यांचे राज्य होते, तेव्हा ‘बाबू’ साहेबांच्या समोर गरीब लोक छाती फुगवून चालत होता” असं वक्तव्य करुन सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतलं आहे.
कारण, बिहारच्या
राजकारणात बाबू म्हणजे राजपूत जातीतील लोक असा आहे. तर राजपूत समाजासह, ब्राह्मण,
भूमिहार, कायस्थ या चार जाती उच्च वर्णीय किंवा
पुढारलेल्या म्हणून ओळखल्या जातात. तर या चार जातींव्यतिरिक्त 51 टक्के ओबीसी, 26
टक्के ईबीसी, 16 टक्के मुस्लीम समाजाचा दबदबा आहे. यापैकी ओबीसींपैकी सर्वात मोठा
मतदार हा यादव समाजाचा असून, त्यांचे प्रमाण 14 टक्के आहे.
वास्तविक, यादव
समाज लालू प्रसाद यादव यांचा परंपरागत मतदार मानला जातो. तर त्या जोडीला 16 टक्के
मुस्लिम समाजाच्या मतांवरच राजदचे लालू प्रसाद यादव यांचे राजकारण अवलंबून राहिले
आहे. या व्यतिरिक्त 8 टक्के कुशवाह आणि 4 टक्के कुर्मी समाजाची देखील आहे. या दोन्ही
समाजांमध्ये नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह हे लोकप्रिय आहेत.
या व्यतिरिक्त
16 टक्के मुस्लिम वोट बँकेवर परंरपरागत लालू प्रसाद यादव यांचे वर्चस्व राहिले असून,
मुस्लिमांना आपल्याकडे खेचण्यासाठी नितीश कुमार प्रयत्नशील राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत
नितीश कुमारांना यात यशही आले होते. कारण, गेल्या निवडणुकीत नितीश कुमारांनी लालू
प्रसाद यादव यांच्यासोबत युती करुन मुस्लिम आणि यादव वोटबँक आपल्याकडे वळवली होती.
त्यामुळे ही वोटबॅक आपल्याला परत मिळवणं हे राजदं समोरचं आव्हान आहे. त्यासाठी तेजस्वी
यादव मेहनत घेत आहेत. त्या जोडीला ईबीसी समाजावरही तेजस्वी यादव यांनी लक्ष केंद्रित
केलं आहे.
कारण, राज्यात
एकूण 26 टक्के ईबीसी समाज असून, यात लोहार, कहार, सोनार, कुंभार, ततवा, बढई, केवट,
मलाह, धानुक, माळी, नोनी यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व जातींनी वेगवेगळ्या
पक्षांना मतदान केले होते. पण 2005 नंतर यापैकी बहुतांश जातींनी नितीश कुमार यांच्या
पारड्यात मतदान टाकले होते. तर काही जातींनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे यंदाच्या
निवडणुकीत भाजपा आणि जेडीयू युती झाल्याने ईबीसींना आपल्याकडे खेचण्यासाठी तेजस्वी
यादव प्रयत्नशील आहेत.
दुसरीकडे राज्यात
16 टक्के दलित समाज आहे. यापैकी पाच टक्के समाजावर रामविलास पासवान यांचे प्रभूत्व
होते. त्यामुळे ती मते देखील आपल्याकडे कशी खेचता येतील, याअनुषंगाने तेजस्वी यादव
प्रचार करत आहेत. कारण, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले
आहे. त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, चिराग पासवान यांनी पक्षाची धुरा आपल्या
खांद्यावर घेतली असली, तरी ती पोकळी भरून काढण्यात ते कितपत यशस्वी ठरतील हा प्रश्न
आहे. कारण, त्यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हृदयात असल्याचं वक्तव्य
करुन धमाल उडवून दिली होती.
त्यामुळे एकुणच
जातीय समीकरणाचा आढावा घेतला; तर ओबीसी 51 टक्के, त्यापैकी 14 टक्के यादव, 6.4 टक्के
कुशवाह-कोइरी, 4 टक्के कुर्मी, 16 टक्के दलित, भूमिहर 4.7 टक्के, ब्राह्मण 5.7 टक्के,
राजपूत 5.2 टक्के, कायस्थ 1.5 टक्के आणि 16.9 टक्के मुल्सिम समाजाचे प्रभूत्व आहे.
त्यामुळेच राजकीय पक्षांकडूनही तिकीट वाटपात जातीय समीकरणांवर सर्वाधिक भर दिला जात आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राजदने 40 टक्के
म्हणजे 58 उमेदवार हे यादव समाजातील आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने 115 पैकी
17 यादव समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील 110 पैकी
16 यादव समाजातील उमेदवार दिले आहेत.
तर ईबीसींपैकी
राजदने 24 टक्के, तर जेडीयूने 26 टक्के उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यासोबतच
राजदचे 17 टक्के आणि जेडीयूचे 11 मुस्लिम उमेदवार आहेत. मात्र, भाजपाने हिंदुत्वावरच
जास्त भर देत एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेला नाही. त्यामुळे जातीय
समीकरणांवरच बिहारचे राजकारण चालत आले असून, निवडणूक प्रचारात पाच वर्षांच्या विकासाचा
कितीही डंगोरा पिटला, तरी मतदार मतदानावेळी आपल्या जातीलाच महत्त्व देतात हे वास्तव
आहे. त्यामुळेच बिहारच्या राजकारणातून ‘जात नाही ती जात’ असंच म्हणण्याची सध्या परिस्थिती आहे.

छान विश्लेषण केलत प्रसन्ना
ReplyDeleteशिवाजी पाटील
ReplyDelete