Monday 21 November 2022

मराठी पत्रकारांचा केमिकल लोच्या...


केमिकल लोच्या... हा शब्द जरी कानावर पडला की, लगेच आठवतो लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाई अर्थात संजय द्त्त! राष्ट्रपिता महात्मा गांधींप्रती अफाट वाचन केल्याने, मुन्नाभाईला महात्माजी दिसू लागल्याचा आभास निर्माण होतो. त्यानंतर त्याला जो-तो आपल्या समस्या सांगू लागतो, अन् त्या समस्यांवर आभासी महात्माजींना विचारून मुन्नाभाई उत्तरं देतो. पण जेव्हा याच मुन्ना भाईला एका पत्रकार परिषदेत सायकॅट्रिस्टकडून महात्माजींबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात.. तेव्हा त्याची उत्तरे आभासी महात्माजींना माहिती नसल्याने संजय दत्त उर्फ मुन्नाभाई पूरता निराश होतो.

त्यानंतर त्याच प्रश्नांच्या उत्तराची चिठ्ठी प्रश्नकर्ता डॉक्टर मुन्नाभाईला देतो, त्यानंतर आभासी महात्माजींकडून त्याची उत्तरे एकापाठोपाठ एक मिळतात. हे सर्व घडल्यानंतर मुन्नाभाईचा पार्टनर सर्किट म्हणजे अर्शद वारसी, जो त्याला सतत भाई…. मेरेको भी बापू दिख ते हे..असं खोटं सांगत असतो, त्या सर्किटला जेव्हा संजय दत्त उर्फ मुन्नाभाई दिशाभूल करणारा प्रश्न विचारतो की, हे सर्किट तुझे बापू दिख रहे क्या?तेव्हा नेहमीप्रमाणे अर्शद वारसी पुन्हा भाई आपको जिधर दिख रहे है वहीं मुझेही दिख रहे हैअसं खोटं सांगतो. त्यानंतर संजय दत्त एका दिशेकडे बोट दाखवून ये देख सर्किट... बापू जा रहे है उधरअसं सांगतो. तेव्हा तो पुन्हा खोटा आविर्भाव आणतो. अन् अर्शद वरसीचे हा खोटेपणा पकडला जातो, तेव्हा... संजय दत्त त्याच्यावर भडकतो... अन् म्हणतो की, झूठ बोला अपून को... झूठ... क्या अपून पागल है?... वो डॉक्टर बोला... अपून के भेजे में केमिकल लोचा है.... अपून भी साला निकलपडा बापूके भरोसें लडने को... हा संपूर्ण संवाद आणि घटना पाहिल्यानंतर आजच्या मराठी तथाकथित पुरोगामी पत्रकारांची अवस्था त्या मुन्नाभाईप्रमाणे झाली आहे असं वाटतं.

कारण, गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी पुरोगामी पत्रकारांना चुक काय आणि बरोबर काय हेच मुळात कळत नाही आहे. अन् ज्यांना कळतं, त्यांना वळत नाही, अशी स्थिती झाली आहे. हे पुरोगामी पत्रकार आपलं क्षेत्र सोडून एका पक्षाचे बटिक झाल्याने त्यांच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोच्या झाला आहे का असा प्रश्न अपसूकच विचारावासा वाटतो. कारण सध्या हे पुरोगामी पत्रकार राजकीय पक्षाचे बटीक बनल्याने ते म्हणतील ती पूर्व मानून काम करत आहेत. त्यांच्या या पक्षपातीपणाची एक नाही अनेक उदाहरणे देता येतील.



त्यातलंच पहिलं सांगयचं तर... काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरुजी) यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने प्रश्न विचारला, तेव्हा भिडे गुरुजींनी आधी तू कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन... आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रुप आहे.. भारतमाता विधवा नाहिये... कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो... अशी भावना व्यक्त केली. पण त्यानंतर सगळे पत्रकार असे काही चौताळून उठले की, जणू त्यांचा मुलभूत अधिकारच हिरावून घेतला होता. जवळपास सर्वच वृत्तपत्रांची रकानेच्या रकाने भरुन याची बातमी दिली गेली होती. तर अनेक प्रस्थापित पत्रकांरांकडून आपल्या फेसबुक, ट्विटर अशा विविध समाज माध्यमांवरुन भिडे गुरुजींवर यथेच्च चिखलफेक करण्यात आली होती.

दुसरीकडे रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिचवडमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मराठी विशेष करुन महिला पत्रकारांनी साडी घालावी, आपल्या मराठी संस्कृतीचे जतन करावं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. तर त्यानंतर आज सगळे पत्रकार चिडीचूप्प. कोणीही अवक्षरही काढायला तयार नाही. फक्त देखल्या देवा दंडवत म्हणून केवळ निषेध नोंदवत आहेत. कुणीही चौताळून उठताना दिसत नाही. कोणताही पत्रकार सुप्रियाताईंच्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी आपल्या फेसबुकवर लांबच लांब पोस्ट लिहित नाही आहे. तथाकथित बुद्धीजीवींजी देखील तिच तऱ्हा असो...

 


काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेकडून विनयभंगची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड स्वत: ला मी किती पापभिरू आहे... माझ्याकडून अशी चूक होऊच शकत नाही, अशा पद्धतीचा आव आणला जात होता. अन् ती महिलाच कशी चुकीची होती, यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर पडत होत्या दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते जितेंद्र आव्हाडांच्या बचावासाठी पुढे येत आहेत. सुप्रिया ताईंसह जयंत पाटील यांच्यापर्यंत प्रत्येकजण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारत होते की, घरी जा!’ म्हणणं हा विनयभंग आहे का? पण जेव्हा हेच जितेंद्र आव्हाड काही वर्षांपूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या समोर आपल्या विजारीत हात घालून एका वेगळ्याच नजरेतून पाहतात... अन् हा सर्व प्रकार कॅमेरात कैद होतो, तेव्हा कुठेही व्यभिचार नसतो... असो...

एवढंच कशाला जितेंद्र आव्हाड यांनी ज्या महिलेचा हात धरुन घरी जा!’ असं बोललं. त्या महिलेप्रती राज्याचा महिला आयोग गप्प.. कोणतीही प्रतिक्रीया नाही... कारण महिला आयोगाच्या लेखी त्या महिलेचा अवमान होत नाही. पण जेव्हा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं. तेव्हा व्यथित होऊन घरी जा... हा शब्द प्रयोग वापरला, तेव्हा सगळी माध्यमवीर दादांवर तुटून पडली. सतत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर हे वक्तव्य प्रसिद्ध करुन महिलांचा आवमान वगैरे सांगितलं गेलं. राज्याचा महिला आयोगाने तर चंद्रकांतदादांना नोटीस पाठवून म्हणणं सादर करण्यास सांगितलं. पण जितेंद्र आव्हाडांप्रती ढिम्म... असो... यावर जास्त बोलायला नको... कारण पुरोगामी पत्रकारांच्या भावना दुखावतील.

वास्तविक, आज मराठी पत्रकारांचा वैचारिक केमिकल लोचा झाला आहे. त्यामुळे त्यांना चुकीचं काय बरोबर काय हे दिसत नाही आहे. केवळ एकच हिंदुत्वद्वेष, मोदीद्वेष आणि भाजप द्वेष... त्यामुळे जो भाजपा आणि मोदींचा विरोधी तो आपला. म्हणून त्याची पाठराखण केली जाते. तो कितीही चुकीचा असला तरी.. त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात नाही. तर दुसरीकडे भाजपा किंवा एखाद्या हिंदुत्ववाद्याने तर्कसंगत मांडणी केली, त्यात एखादी उपमा वेगळ्या आशयाने मांडली, तर त्या वरुन असा काही गजहब माजवायचा की, जणू धरणीकंपच झाला असेल.. अशाने आज मराठी पत्रकारिता अक्षरश: लयाला जात आहे हे मात्र नक्की!