Thursday 27 August 2015

अन् फुगा फुटतोय...


गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या चिनी ड्रॅगनच्या घोडदौडीला आता ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे. स्वत:ला बलशाली म्हणवून घेण्यासाठी चीनने आपल्या अर्थव्यवस्थेत जे काही बदल घडवून आणले, ते बदलच त्याच्यावर उलटू लागले आहेत. सोमवारी शांघाय शेअर बाजारातील घसरण हे त्याचे एक उत्तम उदहारण म्हणता येईल. जगात दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून गणल्या जाणार्‍या अर्थव्यवस्थेचे पितळ आता हळूहळू उघडे पडू लागले आहे. 

गेेल्या काही वर्षांपासून चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि मंदीची झालर कमी करण्यासाठी आपल्या चलनाचे अवमूल्यन करण्याचा जणू सपाटाच लावला. याचा परिणाम शांघायसह जगातील इतर देशांमधील शेअर बाजार कोसळण्यावर झाला.
 तर दुसरीकडे, चीन उत्पादन करत असलेल्या उत्पादनांची विश्वासार्हता कमी झाल्याने देशांतर्गत वस्तूंची मागणी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चीनमधील आयात-निर्यातदेखील अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे, चीनची अर्थव्यवस्था एकप्रकारे मंदीच्या गर्तेत सापडली आहे. वास्तविक, चीनी अर्थव्यवस्थेचा मुख्य जोर हा आयातीपेक्षा निर्यातीवरच जास्त आहे; पण सातत्याने त्यात घटच झाली आहे. रॉयटर्स या जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या भारतातील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, जून अखेर चीनी वस्तूंच्या निर्यातीमध्ये ८.३ टक्क्यांची घसरण झाली. शिवाय ‘युआन’ (चीनचे चलन)च्या सातत्याने अवमूल्यनाने चीनी अर्थव्यवस्थेच्या फुग्यातील हवाच चालली आहे, असा निष्कर्ष काढला होता.
 चीनने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले स्थान टिकविण्यासाठी स्थानिक उद्योगांना वारेमाप सवलती दिल्या, इथे चीन चुकला. उद्योगांना मदत करण्यासाठी देऊ केलेले कर्ज शेअर्समध्ये रुपांतरित करण्याची घोडचूक चीनने केली. सरकारचे उद्योगांना अभय मिळाल्याने चीनमधील जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला आणि त्यांनी कर्ज काढून पैसे शेअर मार्केेटमध्ये गुंतवले. त्यामुळे शेअर बाजारातील दलालांची चांगलीच चांदी झाली. एका वर्षात तब्बल १५० टक्के परतावा शेअर होल्डरांना मिळू लागल्याने शांघाय शेअर बाजारात एकच गर्दी उसळली. काही विदेशी गुंतवणूकदारांनी आपले हात ओले करून घेण्याच्या उद्देशाने डॉलर्सच्या स्वरूपात आपला पैसा शांघाय शेअर बाजारात लावला. युआनच्या अवमूल्यनाने त्याचे धक्के आता त्यांना बसू लागले आहेत.
 दुसरीकडे अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानाचा परिणामदेखील चीनी अर्थव्यवस्थेवर झाला. २१व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिकेच्या ‘शेल’ तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या दरांमध्ये घसरण होऊ लागली होती. या घसरणीचा फटका वारंवार आपल्या अर्थव्यवस्थेला बसू नये, म्हणून चीनने चालाखीने खेळी करत, आपल्या ‘युआन’चे आवमूल्यन करण्यास सुरुवात केली. गेल्या सोमवारी चीनने आपल्या युआनच्या दरात तब्बल दोन टक्क्याने अवमूल्यन केले. त्याचा थेट परिणाम शांघाय शेअर मार्केेटवर झाला. शांघाय शेअर मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेले शअरचे भाव गडबडले. अन् अनेकांना अरबो-खरबोंचे नुकसान सहन करावे लागले.
 वास्तविक, इतर राष्ट्रांवर दबदबा निर्माण करण्यासाठी चीनला १९७८पासून वेगाने प्रगती करण्याची हाव जडली. त्यासाठी त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेची कवाडे इतर देशांना उघडी करून दिली. १९७८ ते २००५ या काळात चीनने आपला विकास दर असा काही वाढवला की, हा आकडा बघून सगळे जग अचंबित झाले. १९७८ साली चीनचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) १५३ अमेरिकन डॉलर होता. मात्र, तोच जीडीपी २००५ साली एक हजार २८४ अमेरिकन डॉलरपर्यंत फुगला होता. हा आकडा पाहून जगातील गुंतवणूकदारांनीच नव्हे, तर अर्थतज्ज्ञांनीदेखील तोंडात बोटे घातली. चीनने आपला हा आकडा वाढविण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना बोलावून आपल्या देशात दुकान थाटावे आणि देशवासीयांना गडगंज बनवावे, यासाठी उद्योजकांना अनेक गाजरे दाखवली. अन् यावर भुललेल्या गुंतवणूकदारांनी विविध मार्गाने या देशात भली मोठी गुंतवणूक केली. शेअर बाजारात ही गुंतवणूक सर्वात मोठी होती, भारतीय रुपयांनुसार हा आकडा सात लाख कोटी इतका मोठा होता. आज हा सर्व पैसा शांघायच्या बाजारात बुडाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही, असे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडे अजून तीन हजार कोटी डॉलर्सची गंगाजळी शिल्लक असल्याने तिचा वापर अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे मत शेअर बाजारातील घसरणीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुरामन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील असे चढ-उतारांपासून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. उलट व्यक्तिगत पातळीवर शेअर बाजारातील अशी घसरण हा नव्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णकाळच असतो.

Wednesday 5 August 2015

मुल्ला ओमरचा मृत्यू आणि तालिबान्यांमध्ये यादवी

नुकतेच तालिबान्यांचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा खातमा झाल्याच्या वृत्ताची पुष्टी आफगाणिस्तान सरकारने केली. या घटनेनंतर ओमरची गादी कोण चालवणार? याबाबत तालिबान्यांमध्ये चर्चा सुरू झाली. ओमरनंतर दोन नंबरचा नेता म्हणून गणला जाणार्‍या मुल्ला अख्तर मन्सूर याने ही गादी बळकावली, त्यामुळे काही तालिबानी नाराज झाले. शिवाय मंसूर विरोधात ओमरचाच भाऊ अब्दुल मन्नान याने दंड थोपटले आहेत. त्यामुळे तालिबान्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यामुळे भविष्यात तालिबान्यांमध्ये यादवी माजण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

१९९०च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबानने चांगलाच धुडगूस घातला होता. तोंडाला मफलर, पठाणी पेहराव आणि हातात एके ४७ घेऊन, हे गुंड टोयाटो पिकअपमध्ये बसून येत आणि भरवस्तीत मोठा हैदोस घालत. पोलीसही यांचा प्रतिकार करण्यापेक्षा लपून बसण्यातच धन्यता मानत असत. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली होती, घरांमधून कोणीही चित्रपट अथवा टीव्ही पाहू शकत नव्हते. स्त्रियांवर तर इतका जाच होता की, दहा वर्षांच्या पुढे मुलींना शिक्षण घेण्यास बंदी होती. स्त्रियांनी आपल्या आरोग्य तपासणी पुरुष डॉक्टराकडून करायची नाही, असे फर्मानच होते. जर असे केल्यास, त्या स्त्रीला भ्रष्ट केले जात होते. घराबाहेर पडतानादेखील बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडण्यास बंदी होती. आणि सोबत वडील, भाऊ किंवा नवरा यापैकी कुणाला तरी एकाला सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते. 
एखादी स्त्री जर एखाद्या तिर्‍हाईत व्यक्तीसोबत बोलताना दिसली, तर त्या स्त्रीलादेखील दंडित केले जात होते. शिवाय त्या पुरुषाला पकडून मुख्य चौकांमध्ये, अथवा शहारातील मोठ्या मैदानामध्ये आणून फासावर लटकवले जात होते. या वेळी सर्व अफगाणी जनतेला त्याठिकाणी एकत्रित राहण्याचे आदेश दिले जात होते. देशात कायदा आणि सुव्यवस्था नव्हती, तर ‘शरियत’ शिवाय दुसरा कोणताच कायदा चालत नव्हता. मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळा नव्हत्या, तर मदरसे चालवले जात होते! आणि यामधूनदेखील तजवीद (कुराण तोंडपाठ करून घेणे), तफसीर (कुराणाचे बरोबर अर्थ ते पण स्वत:च्या फायद्यानुसार), फिका (इस्लामिक न्याय), हदिस (प्रेषितांचे जीवन व त्यांनी दिलेले निर्णय), मंतिक(तत्त्वज्ञान तेही जिहादी), तबलीग (अल्लाच्या संदेशाचा प्रसार) असे विषय शिकवले जात होते. अन् या मदरशांमध्ये ५० ते दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत. म्हणजे एकप्रकारे जिहाद्यांची फॅक्टरीच अफगाणिस्तानमध्ये कार्यरत होती. 
याला पैसा सरकारकडून नव्हे, तर कंदहारच्या मुल्ला ओमर याच्या एका छोट्याशा घरातून येत होता. कारण जे सरकार होते ते मुल्ला ओमरच्या तालावर नाचणारे होते. मुल्ला ओमर हा तालिबान्यांचा स्वयंघोषित प्रेषित (देव)च होता. त्यामुळे तो म्हणेल, ती पूर्व अशीच स्थिती अफगाणिस्तानमध्ये होती. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे नुकतेच ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीने आणि अफगाणिस्तानच्या सरकारने मुल्ला ओमरचा खातमा झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली; पण याला इथेच पूर्णविराम मिळाला नाही, तर आता मुल्ला ओमरच्या उत्तराधिकार्‍याचा वाद सुरू झाला आहे. मुल्ला अख्तर मन्सूर याच्याकडे तालिबान्यांची जबाबदारी गेल्यामुळे काहीजण नाराज झाले आहेत, तर काहींच्या मते मुल्ला ओमरचा वारसा त्याचा मुलगा याकुब याने चालवावा, अशी धारणा आहे. यासाठीच आता मुल्ला ओमरचा भाऊ मुल्ला अब्दुल मन्नान यानेदेखील आपल्या पुतण्यालाच हा अधिकार मिळावा, यासाठी बोंबाबोंब सुरू केली आहे. वास्तविक, मुल्ला ओमर हा कोणी राजकारणी नव्हता, की ना कोणता क्रांतिकारी. त्याचे मूळ नाव महम्मद ओमर असे होते. १९५९ साली कंदहार जवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या या मुलाचे वडील एक भूमिहीन मजूर होते. जन्मावेळीच वडिलांचे छत्र हरपल्याने हा नोकरीच्या शोधात सिंगसेर येथे आला. त्या गावच्या मुल्लाची जागा रिकामी असल्याने महम्मदचा, मुल्ला ओमर झाला. वास्तविक अफगाणिस्तान हा टोळ्यांचा देश. या टोळ्या आपापसात लढाया करीत. यातूनच आफगाणिस्तानमध्ये पेटलेले हे टोळी युद्ध रंक्तरंजित बनले होते. याचा फायदा रशियन सैन्य घेत होते, तेव्हा या सर्व टोळ्यांना एकत्रित आणण्यासाठी मुल्ला ओमरने आपला शिक्षकी पेशा सोडून हातात बंदूक घेतली. अफगाणमधील टोळ्यांना एकत्रित करून, त्याने ‘तालिबान’ ही संघटना जन्माला घातली. आधीच या संघटना रक्ताला चटावलेल्या होत्या. त्यामुळे देशातील इस्लामीकरण टिकविण्यासाठी यांनी एकत्रित येऊन, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये रक्ताचे पाट वाहायला सुरुवात केली होती. १९८९ ते १९९२पर्यंत तालिबान्यांचा हा नंगा नाच संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये चालत होता. त्यातूनच १९९२ साली तालिबान्यांनी तत्कालिन नजिबुल्ला सरकार उलथवून लावले. अन् तालिबान्यांचे सरकार स्थापन केले. हे सरकार मुल्ला ओमरच्या सिंगेसरमधल्या छोट्याशा एका खोलीतूनच चालवले जात होते. एका खोलीत मदरसा आणि दुसर्‍या खोलीत सरकार चालविण्याचे कार्यालय. मुल्ला ओमरला पाहिजे त्या वेळी पाहिजे ते अध्यादेश वजा फतवे काढण्याची सवय होती. एकप्रकारे मुल्ला ओमरचा मनमानी कारभारच देशभर चालू होता. त्यामुळे हा स्वयंघोषित प्रेषित आपल्या कार्यपद्धतीमुळे जगातील नवा हुकूमशहाच ठरला होता. याला आर्थिक रसद सौदीपुत्रही देत होते आणि ओसामा बिन लादेनही. कारण, एकतर १९९५ साली तालिबान्यांचा अफगाणिस्तानमध्ये नंगा नाच सुरू होता, त्या वेळीच या मुल्लाने तिसरे लग्न केले. अन् तेही ओसामाच्या मुलीशी. अन् गंमतीची गोष्ट म्हणजे, ओसामानेदेखील मुल्ला ओमरच्या एका बहिणीशी लग्न केले. या नव्या साटे लोट्यामुळेच हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. तालिबानी संघटना वाढविण्यासाठी आणि पोसण्यासाठी आर्थिक रसद पुरविण्याचे काम ओसामा करीत होता. यातून जिहादी बळकट होत होते. याचाच परिणाम अमेरिकेवरील ‘९/११’च्या हल्ल्यात झाला. यानंतर ओसामाला अफगाणिस्तानचा ‘राजा’आश्रय देण्याचे काम मुल्ला उमर आणि त्याचे आफगाणी सरकार यांनी केले. अन् यातूनच हे दोघेही जगाचे इस्लामीकरण करण्याच्या मागे लागले होते.
अफगाणमध्ये तालिबान्यांचा प्रभाव जसजसा वाढत होता, तसतसा मुल्ला ओमरच्या आसपासचा गोतावळादेखील वाढत होता. यात सर्व होते, मुल्ला होते, मौलवी होते, सर्व इस्लामी कट्टरपंथीच होते. पाश्‍चात्यांचा उमरला भयंकर तिटकारा होता. त्यामुळे तालिबानी परदेशींना उमरच्या जवळही भटकू देत नव्हते; पण ९/११च्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकन सैन्य आणि नॉर्दन आलायन्स हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये डेरेदाखल झाले आणि एकप्रकारे मुल्ला ओमरच्या एकाधिकारशाहीला उतरती कळा लागली. अमेरिकन सैन्याने, तर तालिबान्यांना पिंजूनपिंजून मारले. त्यामुळे ओसामा सोबतच मुल्लालाही लपावे लागले. त्याला एका शहरातून दुसर्‍या शहरात पळावे लागत होते. अखेर २००९ साली अमेरिकन सैन्याने ओसामाला अबोटाबादमध्ये संपवल्यानंतर तालिबानी ताकद कमी झाली. यानंतर तालिबान्यांना पोसणारा कोणीही नसल्याने तालिबानी संपल्यात जमा झाले. नुकताच तालिबान्यांचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा मृत्यू झाल्याचे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी जाहीर केल्यानंतर त्याच्या वारसा हक्काच्या वादाला सुरुवात झाली आहे. मुल्ला अख्तर मन्सूर आणि मुल्ला याकुब हे दोघेही आमने-सामने आले आहेत. हा वाद चिघळणार आणि तालिबान्यांमध्येच यादवी माजणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
कारण मुळात मन्सूर हा तालिबान्यांमध्ये दोन नंबरचा नेता म्हणून ओळखला जातो. तोच ओमरच्या अनुपस्थितीत सर्व सूत्रे सांभाळत असे. त्यामुळे उमरनंतर त्यालाच नेता करण्यासाठी काहिंनी चंग बांधला, तर आता ओमरच्या मुलालाच ही गादी मिळावी, त्यासाठी त्याचा काका मुल्ला अब्दुल मन्नान सरसावला आहे. या सर्व घटनांमुळे अफगाणिस्तानमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच आखाती देशावरील इसिसच्या वाढत्या प्रभावामुळे तालिबान्यांचे आस्तित्व धोक्यात आले आहे, तेव्हा तालिबानी एकत्र राहून इसिसशी संघर्ष करतात की, आपापसातच लढून पुन्हा टोळी युद्धाला आमंत्रण देतात किंवा इस्लामिकरणासाठी इसिसशी हातमिळवणी करतात, यावरच आखाती देशाचे राजकारण अवलंबून आहे. यातच अफगाणिस्तानमधील ‘टोलो न्यूज’ या वृत्तवाहिनीने मुल्ला उमर सोबतच त्याचा मुलगा याकुब हा पाकिस्तानमधील क्वेटामध्ये ठार झाल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा मन्सूर यांने फेटाळून लावला आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून तालिबान्यांसोबत अफगाणिस्तान सरकारची सुरू असलेली शांततावार्ता मोडल्याचे मन्सूर यांनी जाहीर करून, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचीच एकाधिकारशाही या पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. या यदवीमुळे लोकशाही निर्माण होत की नवा मुल्ला उमर जन्माला येतो हे पाहणे संयुक्तीक ठरेल.
http://mumbaitarunbharat.in//Encyc/2015/8/5/1398101.aspx#.VcIsPu7_Knx.