महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काल बरोबर एक वर्ष पूर्ण झाली. या एका वर्षात महाराष्ट्रात काय घडलं, काय बिघडलं याचा जर विचार केला, तर बऱ्याच गोष्टी सांगता येतील. मग ते राजकीय कुरघोड्या असतील, किंवा प्रशासकीय शिथिलता असेल किंवा माध्यमांचा रंग बदलू पणा. एक नव्हे अनेक गोष्टी. असो...
सुरुवातीला राजकीय कुरघोड्यांचा विचार करु. तसं पाहिलं तर राजकारण आणि कुरघोड्या हे काय आपल्याला नवीन नाही. बातम्यांमध्ये रोज त्याचीच चर्चा जास्त असते. ते म्हणतात ना, आपल्याकडे सेक्स, क्राईम आणि पॉलिटिक्स हे तीनही विषय चवीने रवंत केले जातात. या तीनही विषयात प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात इंट्रेस्ट असतोच. असो... पण आजचा विषय तो नाही. आज आपण गेल्या वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरांवर बोलत आहोत.
कारण, गेल्या वर्षभरात राज्यातील जनतेने ज्या पद्धतीने राजकीय कुरघोड्या पाहिल्या आहेत, तशाच कुरघोड्या, स्थित्यंतरे पुलोदच्या स्थापनेवेळी घडली असतील. फक्त फरक इतकाच त्या काळात अस्तित्वात असलेलं सरकार विश्र्वासघाताने पाडून पुलोदची निर्मिती झाली. इथे निवडणूक पूर्व युती तोडून षडयंत्र करुन महाविकास आघाडी सत्तेत आली. पण या दोन्हीचा समान धागा एकच ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब.
विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्यात शिवसेनेला आलेलं महत्त्व, अन् त्यातली संधी ओळखून शरद पवार साहेबांनी जे राजकारण केलं, ते अतिशय नाट्यमयच होतं.
कारण बहुमताने निवडून आलेली भाजपा-सेना युती तोडायला भाग पाडून आपण सत्तेत जाणं हे काय खायचं काम नव्हतं. यासाठी पवारसाहेबांनी जे डावपेच आखले ते भल्याभल्यांना चितपट करणारे होते. बरं, यात मजा अशी; जे ठाकरे कुटुंबीय राजकीय विषयांसाठी कधीही दुसऱ्याच्या दारात देखील जात नव्हते, त्या उद्धवजींना घराबाहेर पडून सत्तेसाठी सिल्वर ओकवर कुर्निसात करायला लावणं म्हणजे एका दुसऱ्या पर्वाचा उदय होता. ते पर्व म्हणजे 'पवार पर्व'. या 'पवार पर्वा'ने एकार्थाने ठाकरी बाणा कमकुवत करुन टाकलं. असो...
बरं या कुरघोड्यांच्या काळात सगळीकडे पवारसाहेबांचा बोलबाला होता. सगळीकडे पवार साहेबच दिसत होते. त्यांच्याशिवाय कुणाचं पान हालत नाही अशीच ती स्थिती होती. पण त्या ही काळात कढी केली ती अजितदादांनी. कुणी स्वप्नात देखील विचार केला नसेल, अशा स्थितीत अगदी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने शपथविधी उरकून घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेमुळे भाजपचा हा डाव 'नेहले पे देहला' आहे असंच, सगळ्यांना वाटत होतं.
पण त्यानंतर पुन्हा पवार साहेबांनी चक्र फिरवली, अन् पुन्हा परिस्थिती पूर्ववत केली. बरं... यानंतर शिवसेनेला आणखीनच झुकावं लागलं. कारण आधीच सत्तेसाठी युती तोडली होती. अन् पुन्हा भाजपच्या दारात जाणं शक्य नव्हतं. काहीही करुन सत्ता स्थापन करणं हा एकमेवच पर्याय उद्धव ठाकरेंसमोर होता. त्यामुळे सत्तेसाठी सगळ्या तडजोडी करण्याशिवाय सेना नेतृत्वाला गत्यंतर नव्हतं. यामध्ये जी महत्त्वाची खाती होती, ती राष्ट्रवादीलाच मिळाली. कारण ही तसंच होतं, कारण या नव्या आघाडीच्या निर्मितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे राष्ट्रवादीने सेना आणि कॉंग्रेसला एकप्रकारे आपलं गुलाम बनवलं. त्यामुळे मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला, तरी त्यांचा रिमोट शरद पवार साहेबांकडे शिफ्ट झाला होता. असो...
पण यानंतर झालं काय सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपची जिरवण्यासाठी कामाला लागले. त्यात मग भाजपा सरकारने घेतलेले एक एक निर्णय रद्द करायचं किंवा प्रकल्पांना स्थगिती द्यायची. एवढाच काय तो या महाविकास आघाडीचा एककलमी कार्यक्रम राहिला. असो...
पण यानंतर खरी कसोटी सुरु झाली ती कोरोनामध्ये. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला, त्यानंतर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जी मेहनत घेतली, त्याचे विरोधकांसह सर्वांनी कौतुक केले. तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भाषणं सुरुवातीला अनेकांना आश्वासक आणि कुटुंब वत्सल वगैरे वगैरे वाटत होती. पण जसजसा काळ पुढे गेला, तसतशी आरोग्य यंत्रणेचा ढीसाळपणा आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणातील फोलपणा सगळ्यांनाच दिसू लागला. यामध्ये परत सचिव दर्जातील अधिकाऱ्यांचे परस्पर हेवेदावे, यातून मार्ग काढण्यात उद्धव ठाकरेंना आलेलं अपयश, या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा कोरोना नियंत्रणाचा आलेख अतिशय मागे पडला. महाराष्ट्र आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. यातून कसा मार्ग काढायचा हे कुणालाही सुधरत नव्हतं. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने याचे आधीच राजकारण करायचे नाही असे ठरवल्याने ते शांत होते. ते आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेला सेवेच्या संदेशावर काम करत होते. यातून जनतेचं समर्थन भाजपला मिळतंय हे पाहून पुन्हा शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले. मुख्यमंत्री घर सोडून हलायला तयार नाहीत म्हटल्यावर त्यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. यातून काही साध्य झालं नाही. केवळ उद्धव ठाकरेंची निष्क्रियता अधोरेखित झाली. असो...
कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अक्षरश: कहर केला. कोकणाचं होत्याचं नव्हतं झालं. यानंतर मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या तिघांनी कोकणाचा दौरा केला. यातही पुन्हा ठाकरेंचा बडेजावपणा/ राजेशाही थाट आलाच. मुख्यमंत्री उद्धवजी आपल्या ठाकरी बाण्यानुसार राजेशाही थाटात जेट्टीने प्रवास करुन अलिबागला गाठलं. अन् अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन; नेहमीच्या शैलीत आश्वासनांची खैरात वाटली. तर दुसरीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रस्ता मार्गे प्रवास करुन कोकणातील जनतेचा आक्रोश समजून घेतला. यावेळी कोकणी माणूस या दोन्ही नेत्यांसमोर घाय मोकलून रडला. पण सरकारकडून जी मदत मिळायला पाहिजे ती आजतागायत काही मिळाली नाही.
कोरोना आणि चक्रीवादळाचं संकट कमी म्हणून की काय, निसर्गदेवता पुन्हा महाराष्ट्रावर कोपली. अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि पश्र्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे अक्षरश: कंबरडे मोडले. यानंतर पुन्हा तेच उद्धवजी, देवेंद्रजी आणि पवारसाहेबांनी दौरे करुन शेतकऱ्यांचे सांत्वन केले. या दौऱ्यातही पुन्हा ठाकरी बडेजाव होताच. उद्धवजींनी सोलापूर मध्ये दौरा करताना सांगवीतल्या गावकऱ्यांना 'मी गाडीतून उतरु शकत नाही, तुम्हीच माझ्याकडे या!' असा निरोप दिला. त्यामुळे गावकऱ्यांनी पण आपला इंगा दाखवत उद्धवजींना गरज असेल, तर तुम्ही या! असा सज्जड इशाराच दिला. एवढं होऊनही ठाकरी बाणा मोडला नव्हता. सोलापूर जिल्हयातील एका पुलाची पाहाणी करताना अक्षरशः ठाकरे साहेबांना ग्रीन कार्पेट अंथरले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी हे नक्की लोकशाहीच्या काळात वावरतायत की राजेशाहीच्या काळात हा प्रश्र्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला. असो...
पण या सगळ्यात पवार साहेब उजवे ठरले. वय वर्ष ८० असूनही ज्या हिरीरीने पवारसाहेब महाराष्ट्रभर फिरले ते सर्वांनाच कौतुकाचं वाटलं. शिवाय, ठाकरेंची निष्क्रीयता झाकून घेण्याचा मोठेपणा पवार साहेब प्रत्येक टप्प्यावर दाखवला. जे माध्यमं दुर्लक्षित करतायत. एकंदरीत काय. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंच्या रुपाने जे निष्क्रीय नेतृत्व अनुभवलंय, ते यापूर्वी कधी अनुभवले नसेल.
(क्रमशः)

No comments:
Post a Comment