Sunday 14 June 2020

सुशांत तू खरंच चुकलास...

प्रिय सुशांत,

आज तुझ्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्काच बसला. मित्रा, तू अतिशय संवेदनशील कलाकार होतास. तुझे चित्रपट पाहताना आम्हाला जीवनाकडे पाहण्याची एक पॉझिटिव्हीटी मिळते. अन् तू हे असं पाऊल उचलावंस... खरंच हे अनाकलनीय आहे.

तुझा 'एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट जेव्हा आम्ही कधीही पाहतो, तेव्हा त्या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट मनाला फारच भावतात. या चित्रपटात तुझा एक डायलॉग आहे. रेल्वे स्टेशनवरचा... तू तुझ्या अधिकारी गांगुली सरांना बोलतोस की, "हम कर क्या रहे हैं. सुबह से लेकर शाम तक सिर्फ टिकीट चेक कर रहे हैं. ना हमारा गेम इम्प्रूव्ह हो रहा है, ना हम." त्यावर तुझे सिनियर जीवन म्हणजे काय हे सांगतात. आणि शेवटी बोलतात, "समझले अभी ये सब बाऊन्सर है." त्यावेळी जसा तू व्यक्त झालास, तसा आजही व्यक्त झाला असतास, तर प्रश्न‌ नक्की सुटला असता. पण आज तू हे असं पाऊल उचलावंस?

अरे, जीवनातील आव्हानांशी तोंड देताना एवढा कसा काय घाबरु शकतोस तू? मला हे मान्यच आहे, समस्या सगळ्यांनाच असतात. पण त्याचा सामना करायला पाहिजे. असं भ्याडपणे पळून जायला नको होतंस.

आज कोरोनासारख्या महामारी मुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. आमच्या कोकणात तर 'निसर्ग' चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले, ते पाहताना फारच अस्वस्थ व्हायला होतं. पण तरीही या मंडळींनी इतकं टोकाचं पाऊल उचललं नाही. ते सगळे लढतायतच ना? तसं तू ही लढायला पाहिजे होतंस.

बहुतेक तू आमच्या कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता वाचली नसावीस. तू जर तू ही वाचली असतीस, तर जीवनातला संघर्ष असा टाकून गेला नसतास. कारण या कवितेतील नायक महापुरात सगळं घर उद्धवस्त झाल्यावरही एवढंच म्हणतो,
"मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून लढ म्हणा"

शेवटी इतकंच सांगतो, आज तू सोडून गेलास खरा. पण तुझे चित्रपट हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील!

तुझा

एक चाहता