Tuesday 4 August 2020

युगायुगातिल हे सिंहासन आज पुन्हा जाहले सचेतन

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचे आयोध्या नगरीत भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. येत्या ५ अॉगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. त्यामुळे आज लाखो रामभक्तांच्या मनात एकच भावना उत्पन्न होत आहे; ती म्हणजे 'युगायुगातिल हे सिंहासन आज पुन्हा जाहले सचेतन.' कारण भारतखंडाचा मानबिंदू म्हटलं तर सर्वांच्याच मुखात प्रभू श्रीरामांचेच नाव येते. अन् हा मानबिंदू आता पुनर्स्थापित होत आहे.

मुस्लिम आक्रमक बाबराने १५२८ मध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर पाडून तिथे मशिद उभारली. अन् लाखो भारतीयांच्या जनमानसावर तीव्र आघात केला. हा आघात इतका तीव्र होता की, त्यामुळे लाखो भारतीयांच्या जनमानसावर जी जखम झाली होती, ती कित्येक वर्षे भळभळत होती. ही भळभळती जखम बरी व्हावी, यासाठी अनेक वर्षे लढा सुरू होता. या लढ्याला २० व्या शतकात यश मिळालं आहे. 

राम मंदिर उभारणीसाठीच्या आंदोलनाचा इतिहास पाहिला, तर सन १८५३ पासून ते स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संघर्ष झाले. पण मुसलमान राज्यकर्त्यांकडून होणारी हेटाळणी, अन् ब्रिटिशांची संधीसाधू वृत्ती यामुळे याला कधीही यश आले नाही. स्वतंत्र्योत्तर काळातही मुस्लिमांच्या तुष्टिकरणामुळे, हिंदू राज्यकर्त्यांकडून विशेषतः काँग्रेसी राज्यकर्त्यांकडून हे कोट्यवधी रामभक्तांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न सातत्याने झाला. त्यामुळे १९८९ मध्ये विश्र्व हिंदू परिषदेने व्यापक जनसमर्थनासाठी मोहिम सुरू केली. विश्र्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल आणि मोरोपंतजी पिंगळे यांच्याकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली. अशोकजी आणि मोरोपंतजी यांनी तर एकनाथजी रानडे यांच्या प्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य या कार्यास समर्पित केलं होतं. या कार्यासाठी हिंदू चेतना जागरुत करण्याचे पूर्व, पूर्ण आणि सूक्ष्म नियोजन मोरोपंतजींनी केले होते. तर अशोकजी या कार्यासाठी समाजातील विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन, बैठका घेऊन लोकजागृतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. या दोन महाविभूतींनी कोट्यवधी भारतीयांच्या मनात हिंदू आस्मितेची ज्योत प्रज्वलित केली. 

यासाठी सुरु करण्यात आलेली शिलापूजन मोहिमेला व्यापक जनसमर्थन मिळत होते. कोट्यवधी भारतीय स्वयंप्रेरणेने आपापल्या गावातून मंदिर उभारणीसाठी शिळा पूजन करुन अयोध्येला घेऊन येत होते. १९९२ मध्ये अडवाणीजींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. यामुळे भारतीय जनमानसात एक वेगळीच ऊर्जा संचारली. लाखो रामभक्त अयोध्येकडे कूच करत होते. लाखो रामभक्तांनी एक निश्चय केला होता की, 'बस्सं झालं आता.... रामलल्ला हम आएंगे मंदिर वहीं बनाएंगे.' अन् या निश्चयाची परिणिती म्हणून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पतन झाले. यात दुर्दैवाने कोठारी बंधुंना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. पण आज सोन्याचा दिवस उजाडला आहे, त्यामुळे कोठारी कुटुंबीय देखील आज भावनाकुल झाल्याचे आपण पाहतो. 

या आंदोलनात साध्वी ऋतंभराजी, उमा भारतीजी, आचार्य धर्मेंद्रजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी, कल्याण सिंहजी, प्रमोदजी, गोपीनाथ राव, मनोहर पर्रीकर, नरेंद्र मोदीजी यांनी हा यज्ञ आपापल्या परीने सफल बनवला. त्यामुळे हे स्वप्न पूर्णत्वास जात असताना, या आंदोलनाशी संबंधित उमा भारतींच्या पोटात आनंद मावेनासा झाला आहे. उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर उभारणीचा शुभारंभ होतोय, हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. कारण जी भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही, तो परमोच्च आनंदाचा क्षण असतो. राम मंदिर उभारणीचा क्षण हा अशाच प्रकारचा परमोच्च आनंदाचा क्षण आहे."

या आंदोलनाबद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे, याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता, की लाखो रामभक्त अंगावरच्या कपड्यानिशी  अयोध्येत पोहोचले होते. इथे हे सर्व रामभक्त  सकाळ-संध्याकाळ भजन, कीर्तन करत होते. या भजन किर्तनाने अयोध्या नगरी राममय झाली होती. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी जेव्हा बाबरीचं पतन अयोध्यावासींनी अक्षरशः दिवाळी साजरी केली होती. प्रत्येकजण एकमेकांना मिठाई वाटप करत होते. तर घराघरात दीपोत्सव साजरा केला जात होता. 

त्यामुळे आंदोलनाचा हा भारलेला काळ कोट्यवधी रामभक्तांसाठी एक आयुष्याची पूंजीच बनून राहिला आहे. कारण जे स्वप्न उराशी बाळगून, आज अनेकजण जगत आहेत, त्यांच्यासाठी ही जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याची भावना आहे. शेवटी इतकंच...

सिंहासन हे विक्रमशालि चिरगौरव युत वैभवशालि
होण्यास्तव हे अपुले येथे चला करा सर्वस्व समर्पण॥