Sunday 12 December 2021

रग रग हिंदू मेरा परिचय

 बरोबर राहुलजी ... तुम्ही सोकॉल्ड हिंदू आहात... म्हणजे जे जन्माने तर हिंदू आहेत, पण चार चौघात हिंदू म्हणवून घ्यायला लाज वाटते, अशा कॅटेगरीतील. (तुम्ही केवळ गांधी आडनाव सांगता, म्हणून हिंदू मानायचे) कारण हिंदू हे सांगून होता येत नाही, तर अटलजींच्या शब्दात सांगायचे तर;  'हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग


हिन्दू मेरा परिचय!' असं तुम्हाला बनणं शकत नाही.‌ असो...


दुसरं तुम्ही बोललात ते म्हणजे हिंदुत्वाबदद्दल, मुळात हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद हा रक्तात असावा लागतो.... ते येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. आपल्या देशात हिंदुत्व ही आदर्श जीवन पद्धती आहे. 


आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभूःपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः॥


जरा अजून पुढे जाऊ, म्हणजे विस्कटून सांगता येईल. हिंदू आणि हिंदुत्व समजण्याकरिता हिंदुत्व, हिंदूधर्म आणि हिंदूजगत या  तीन शब्दांचा अर्थ नीट समजणे अत्यावश्यक आहे.जे तुमच्या सारख्या सोकॉल्ड हिंदुंना शक्य नाही. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. 


दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून, त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. 


अन् तिसरे आणि शेवटचे हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.


पण हे एवढं सगळं तुम्हाला कसं कळणार. कारण, तुमचं हिंदू पण आणि हिंदुत्व हे पार्ट टाईम आहे.‌निवडणुका आल्या की, आपण हिंदू आहोत, ब्राह्मण आहोत, मंदिरं आठवतात, जानवं आठवतं. एवढं सगळं काही काळापूरतंच. इतरवेळी तुम्ही काय आहात हे दाखवून देतातच.‌असो... यावर जास्त बोलायला नको... उगीच त्रास होईल. 


त्यामुळे तुम्ही जरी हिंदू आहात हे आज म्हणत असाल, तरी ते तथाकथित आहे हे सर्वांना माहीत आहे. कारण आपल्या... मुद्दाम आपल्या शब्द वापरतोय हं! तर आपल्या देशात हिंदुत्व म्हणजे आदर्श जीवन पद्धती आहे. जी अनादी काळापासून चालत आलेली आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राने आणि श्रीकृष्णाने आखून दिलेली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी पुनर्स्थापना केलेल्या हिंदवी स्वराज्याचे पालन करणे अन् तिचं अनुकरण करणं ही आमची (मुद्दाम आमची म्हणतोय) संस्कृती आहे. त्यालाच आम्ही हिंदुत्व म्हणतो. आणि जो या आदर्श जीवन पद्धतीचं पालन करतो, तो हिंदुत्ववादी... त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्ववाद हे तुमच्या कडून शिकण्याची गरज नाही.