Wednesday, 21 October 2020

कांद्याचा वांदा कोण करतोय...


काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदीवरुन मोठा गजहब माजवला जात होता. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कसे नुकसान होतंय वगैरे... वगैरेच्या प्रतिक्रीयांचा अक्षरश: ऊत आला होता. त्यामुळे त्यातील तथ्य सांगणारा ब्लॉग मी पोस्ट केला होता. त्यावर संमिश्र प्रतिक्रीया आल्या. पण यात नवल वाटलं ते माझ्या प्रगतीशील शेतकरी मित्राचं. त्याचीही प्रतिक्रीया जाणून मला थोडं अश्चर्य वाटलं. पण माझं या क्षेत्रातलं ज्ञान कमी असल्याने, मी त्याची माहिती खरी असेल, असेच मान्य केलं होतं.

पण आज जेव्हा कांद्याचे दर गगनाला भिडत आहेत, त्या मागची कारणं जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याची माहिती चुकीचीच होती याची जाणिव झाली. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय, कांद्यांचा वांदा नक्की कोण करतोय...

कारण सध्या किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने शंभरी पार केली आहे. तर घाऊक बाजारात कांद्याचे दोन भाग/दर दिसत आहेत. एक म्हणजे कांद्याचे दर नियंत्रणात राखण्यासाठी इराण आणि इजिप्तमधून मागवलेला कांदा, अन् दुसरा आपल्या भारतातील कांदा.

देशात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी गेल्या आठवड्यात इराण आणि इजिप्तमधून 600 टन कांदा आयात करण्यात आला. त्यापैकी 25 टन कांदा सोमवारी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला. या कांद्याची घाऊक बाजारात 50-60 रुपयांनी विक्री होत आहे. तर त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला नवीन कांदा 50-65 रुपयांनी विक्री होत आहे. तर या उलट जुन्या कांद्याची 85 रुपयांनी विक्री होत आहे.

आता दर पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल, की एवढी तफावत कशामुळे.. लॉकडाऊनच्या काळात कांद्याचे दर अतिशय खालावले होते. उठाव नसल्याने हे दर खालावल्याचे सांगितले जाते. यामध्ये चांगला कांदा 10 रुपये किलोने विकला जात होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. अनलॉकनंतर 10 रुपये किलोने मिळणारा कांदा 20-25 रुपये किलोने मिळू लागला. तर आता तर या दराने 50 पार केली आहे.

पुणे-नाशिक येथील स्थानिक बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने कांद्याचे दर वाढल्याचे कारण दिलं जात आहे. अन् दिवाळीपर्यंत हेच चित्र कायम राहिल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, जर स्थानिक बाजारात कांद्याला चांगला दर मिळत असेल, तर कांद्याला चांगला उठाव मिळायला हवा होता. कारण यातून शेतकऱ्यांचाच फायदा झाला असता. पण भाव वाढताच कांदा व्यापारी आणि खरेदीदारांकडून कांदा खरेदीसाठी हात आखडता घेतला गेल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, या भाव वाढीला आणखी एक कारण दिलं जातंय ते म्हणजे, हॉटेल सुरु झाल्याने बाजारात कांद्याची मागणी वाढल्याचं. आता यात कितपत तथ्य म्हणायचं... कारण तसं पाहिलं तर कोरोनापूर्वीच्या काळात, जेव्हा लॉकडाऊन सुरु व्हायचा होता, त्यावेळी ही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कांदा लागतच होता ना.... त्यावेळी अशी भाववाढ होत नव्हती. आताच जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असताना, आणि नवीन कांदा तुलनेत कमी बाजारात येईल हे माहिती असताना कांद्याचे दर वाढत असल्याचे चित्र आहेत.

याच कांद्याच्या विषयावरुन काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ सुरु होता. केंद्र सरकारने देशात कांदा निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर आंदोलनं, मोर्चे, आरोप वगैरे वगैरे सुरु झालं. मुळात भविष्यातील धोका ओळखूनच कांदा निर्यातबंदी केली असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. कारण, आधीच अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यात कांद्याचा देशात तुटवडा होऊ नये, यासाठीच ही निर्यात बंदी केली होती. पण त्यावेळी याला कडाडून विरोध झाला.

वास्तविक, निर्यातबंदीनंतरच भविष्यातील देशाअंतर्गत कांद्याची मागणी लक्षात घेऊन काही साठेबाजांकडून कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यास सुरुवात केली होती. पण त्याकडे सगळ्यांचे सोईस्कर दुर्लक्ष होते. दुसरं म्हणजे, या (आंदोलनाच्या) काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा बाजारात येऊ न शकल्याने तो गोदामात अडकून राहिला. परिणामी लांबलेल्या पावसामुळे गोदामातील कांदा खराब झाला.

अन् जो कांदा साठेबाजांनी अडवून ठेवला होता, त्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. जुना कांद्याची घाऊक बाजारात 85 रुपयांनी विक्री होत आहे. तर नवीन कांदा कांदा 50-65 रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे याचा फायदा नक्की कुणाला होतोय, याचा शोध घेण्याची गरज आहे.

Thursday, 8 October 2020

खरंच याने इम्युनिटी वाढेल...?


गेल्या सहा महिन्यात कोरोना महामारीने ज्या प्रकारे धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे साऱ्यांच्याच मनात भिती आहे. कोरोना झाला म्हणजे आता काय खरं नाही. हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात (1896 साल) पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथी सारखं झालं. काखेत गाठ आली म्हटलं की, लगेच सगळे घरचे भयभित व्हायचे, अन् काही काळातच त्याचा मृत्यू झाल्याने सर्व घरात शोककळा पसरली असायची. आजही तशीच परिस्थिती आहे म्हणा... त्यामुळेच त्यापासून बचावासाठी इम्युनिटी वाढवा... काढा घ्या.. ही टॅब्लेट्स घ्या.. हे चवनप्राश घ्या... असे सतत टीव्ही वरुन हॅमर केलं जात आहे. पण खरंच यामुळे इम्युनिटी वाढते का? हा खरं प्रश्न आहे.

कारण, गेल्या काही महिन्यांचा विचार केला, तर कोरोनाचा जसा संसर्ग वाढू लागला, तसतसं ही इम्युनिटी वाढवणारी टॅब्लेट्स, चवनप्राशन सगळे फिकी पडल्याचं पाहायला मिळालं. अगदी मी-मी म्हणणारे देखील कसे मृत्यूच्या दाढेत ओढले गेले हे सर्वांनी पाहिलंय. एवढंच कशाला... सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता, त्याकाळात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचेच प्रमाण जास्त होते. त्यानंतर हळुहळु हे प्रमाण वय वर्ष 21 ते 40 वयोगटाकडे सरकले. बरं या वयोगटाकडे लक्ष दिले तर, हे इम्युनिटी वाढवणारी औषधं घेत नव्हती का? तर त्याचं उत्तर होय घेत होतीच असंच आहे. पण तरीही त्यांना कोरोनाने गाठलं, अन् त्यांना आपल्या कवेत घेतलंच... असो.

जर कंपन्यांचा दावा खरा असता तर कोव्हीड सेंटर मध्ये ही इम्युनिटी बुस्टर औषधं (टॅब्लेट्स, चवनप्राश) दिली नसती का? तिथे कशाला अंडी किंवा फळं आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या असत्या. कोव्हीड रुग्णांवर उपचारांसाठी तर डॉक्टरांची फौजच दिवसरात्र मेहनत घेत होती ना. मग त्यांनी यावर खर्च करण्यापेक्षा चवनप्राश किंवा इम्युनिटी बुस्टर टॅब्सेट्सच दिली असती ना... असो...

याबाबतच एक विषय सांगायचा झाला तर... कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी पतंजलीने कोरोना किट बाजारात आणलं होतं. सुरुवातीला त्यांचा दावा होता की, हे कोरोना किट कोरोना ग्रस्तांवर उपचारासाठी रामबाण औषध आहे. पण जेव्हा यावर आक्षेप घेतला गेला, त्यावेळी पतंजलीनेही माघार घेतली. एवढंच कशाला कोरोनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना आयुष काढा, ज्यात तुळस, सुंठ, काळी मिरी, दालचिनी याचा वापर करुन बनवलेला काढाच घेण्याचे आवाहन केले नसते. त्यांनीही इम्युनिटी बुस्टर टॅब्लेट्स किंवा चवनप्राश घेण्याचं आवाहन केलं असतं. असो...

शेवटी इतकंच जाहिरातदार आपली उत्पादनं खपवण्यासाठी काय-काय शक्कल लढवतील, याचा नेम नसतो. त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य जपायचं असेल, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घेतला पाहिजे. केवळ जाहिरातबाजीवर भुलण्याची आवश्यकता नाही.

Saturday, 3 October 2020

खरंच हे कधी थांबणार?


सध्या हाथरस प्रकरणामुळे संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेत एका मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा असून, उत्तर प्रदेश सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. यात राजकीय पक्षांसह डाव्या माध्यमांनी उडी घेतली आहे. त्यामुळे ते याचे राजकीय भांडवल करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, नुकत्याच बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्ष याचं राजकीय स्वार्थासाठी भांडवल करताना दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रातही यावरुन चांगलं राजकारण सुरु असून, शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.

या प्रकरणा योगी आदित्यानाथ सरकारला टार्गेट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन हे कधी थांबणार?’ असा सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया ताईंचा सवाल खरंच सर्वांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण, बलात्कार, छेडछाड, विनयभंग आता रोजच्याच घटना होत आहेत. कारण, स्त्री म्हटलं की, तिला उपभोगाची वस्तू समजून, सतत तिच्याकडे वाईट नजरेतूनच पाहिलं जातं. एखादी मुलगी रस्त्यावरुन जात असेल, तर तिच्याकडे वासनांध नजरेनं पाहण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच मग बलात्कार, विनयभंग अशा घटना समोर येत आहेत.

पण खरंच याला जबाबदार कोण? असा प्रश्न असा प्रश्न विचारला, तर त्याचं एकमेव उत्तर मिळतं ते म्हणजे आपली चित्रपट सृष्टी. कारण, ज्या पद्धतीत आपल्या चित्रपट सृष्टीत स्त्रीला उपभोगाची वस्तू दाखवली जाते, त्याला कोणही आटकाव करताना दिसत नाही. सर्रास प्रत्येक चित्रपटातून बेड सीन, किसिंग सीन दाखवले जातात. त्यामुळे याचा नव्या पीढिवर विपरित परिणाम होत आहे. आज आपली ही चित्रपट सृष्टी आजच्या नव्या पीढिवर इतकी हावी झाली आहे की, जो-तो त्याच दुनियेत जगत आहे. त्यामध्ये मुलांसोबत मुलीदेखील तेवढ्याच पुढारलेल्या आहेत. आजच्या मुली अंग प्रदर्शन करण्यावर भर देतायत. तर मुलं ही एक नाही दुसरी या मानसिकतेतून वागत आहेत. त्यामुळे एकप्रकारे सगळीकडे सावळागोंधळ आहे. बरं यावर काही बोलायला गेलं की लगेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेमी गळे काढायला सुरुवात करतात. म्हणे, चित्रपट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रभावी माध्यम आहे वगैरे... अन् आपापल्या नजरेतून तो अभिव्यक्त होत असतो, असे एक-ना अनेक उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात होते. असो... त्यामुळे सुप्रिया ताई जो प्रश्न विचारतायत, तो या चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक यांना का विचारु नये?

आपल्या महाराष्ट्रात चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये. या घटनेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर पेट्रोल टाकून भर दिवसा जाळण्याचा प्रकार झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची एकच लाट उसळली होती. जो तो त्या नराधमाला कठोर शासन करण्याची भाषा बोलत होता. त्यामुळे सरकारने ही 30 दिवसात निकाल लावला जाईल, असं छातीठोक पणे सांगितलं गेलं. पण झालं काय..? तर आज ऑक्टोबर उजाडला; तरी त्याचा ना पत्ता.. ना गुन्हेगाराला शिक्षा... असो...

कालच एक बातमी वाचनात आली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या बलात्काराच्या घटनांसंदर्भातील. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडत असून, मुंबईचा थेट दुसरे स्थान आहे.  विशेष म्हणजे मुंबईतला दोषसिद्धीचा दर देखील 30 टक्के असल्याचं यामध्ये सांगितलं आहे. हे असतानाच काल आणखी एक घटना समोर आली ती पुणे जिल्ह्यातून. चाकूचा धाक दाखवून पिंपरी-चिंचवड मधील चाकणमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर नवी मुंबईतील नेरुळमध्ये मुलाच्या संगोपनासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तर सदर मुलगी गर्भवती राहिली आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतात, त्या नागपूर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. तिथे तर कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचं वृत्तपत्रातील बातम्यांमधून दिसून येत आहे. यामध्ये एका घटस्फोटित महिलेशी शरीर संबंध प्रस्थापित करुन, त्याची अश्लिल फित बनवून सतत महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते. या पोलिसाला सध्या बडतर्फ केलं असलं, तरी प्रश्न तोच उपस्थित होतो, या घटना थांबणार तरी कधी? त्यामुळेच की काय हाथरसवरुन राजकारण करणाऱ्या संजय राऊत यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. कोरोना काळातील पनवेलमधील घटनेचा संदर्भ देऊन, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा संजय राऊत झोपले होते का? असा सवाल विचारला आहे.

बलात्कारावर आणखी बोलायचं झालं, तर सध्या देशभरात आणखी जे प्रकरण धुमाकूळ घालत आहे, त्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही सुशांतच्या जुन्या मॅनेजरवर काहीतरी विपरित घडल्याचा दावा रिपब्लिक टीव्ही आणि भाजपा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यात एक राज्याचा मंत्री देखील अकडलेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जर बलात्काराच्या घटनेतच राज्याचा एखादा मंत्री अडकलेल्याचं खरं मानलं, तर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहतील. असो...

आता आपण पुन्हा हाथरस प्रकरणाबद्दल विचार करुया..., या प्रकरणात त्यामुलीवर बलात्कार झाला हे मान्यच. त्याचं कुणीही समर्थन करणारच नाही. कारण अशा पाश्वीवृत्तीचं कधीही समर्थन करुच नये, उलट अशा घटना करणाऱ्या नराधमांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अखून दिलेल्या नितीनुसार, एकतर चौरंगा करावा, किंवा त्याचा कडेलोट करावा. पण जर यावरुन राजकारण... राजकारण... आणि केवळ राजकारणच होणार असेल, तर ते का सहन करावं.

कारण, तसं पाहिलं तर नुकत्याच बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतरच या प्रकरणाला हवा दिली गेली. कारण, ही घटना 14 घडली सप्टेंबरला. अन् 25 सप्टेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच या प्रकरणाने जोर धरला. यात डावी माध्यमांकडून जो नेहमीचा प्रपोगेंडा केला जातोय, तो खरंतर चिड आणणाराच आहे. कारण, देशाच्या कोणत्याही राज्यात निवडणूक जाहीर झाली की, ज्या राज्यात भाजपा सरकारमध्ये आहे, त्या राज्यातील एखादं प्रकरण काढायचं, आणि मतदान होईपर्यंत ते तापवत ठेवून वेगवेगळ्या जातींमध्ये भितीचं वातावरण तयार करायचं.. याच नितीचा वापर ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी केला. Divide and rule… यानंतरच्या काळातही याचा वापर राजकारण्यांनी केल्याचं प्रत्येकवेळी पाहायला मिळत आहे. दोन जातीत वितुष्ट निर्माण करणारी वक्तव्ये करायची. त्यावरुन दंगली भडकवायच्या आणि आपलं सत्तेचं स्वप्न साध्य करायचं.

गेल्या काही वर्षात डावी माध्यमं देखील याच नितीचा वापर करताना दिसत आहेत. निवडणूक जाहीर झाली की, भाजपा शासित राज्यातील एखादं प्रकरण काढायचं, ते मतदान होईपर्यंत सतत तापवायचं, एकदा का मतदान झालं... की ते तसंच ते हावेत विरु द्यायचं. ही डाव्यांची मोडस ऑपरेंटी सिस्टीम आज बिहार निवडणुकीच्या निमित्ताने वापरली जात आहे. कारण का? तर बिहारमध्ये यादवांसोबतच दलित मतांचे देखील मोठे प्रमाण आहे. त्यामुळे त्यांना भिती दाखवून निवडणुकीला वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न आहे.

या तर्काला बळ मिळेल अशी घटना कालच समोर आली आहे. इंडिया टूडेची पत्रकार तनुश्री पांडे हथरस प्रकरणातील पीडितेच्या भावाला फोन करुन असा काही दबाव टाकत आहे, की हे सरकार कशाप्रकारे दंडशाहीचा वापर करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नात आहे. याबद्दलची ऑडिओ संभाषण सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, यातून तनुश्रीच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहेत. असो...

त्यामुळे सुप्रिया ताईंनी जो सवाल उपस्थित केला आहे, तो एकार्थाने  सर्वांनाच आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. यात मग समाजातील मंडळी असतील, राजकीय नेते मंडळी, माध्यमे, या सर्वांनीच आत्मपरिक्षण करायची गरज आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी एखादे प्रकरण पकडायचे, अन् त्यातून शक्य तितका राजकीय लाभ मिळवायचा. याला मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. जे राहुल गांधी हाथरस प्रकरणावर तावातावाने बोलत आहेत, त्यांनी वर्ध्यातील जळीतकांड प्रकरणात मौन का बाळगलं हे आधी देशाला सांगितलं पाहिजे. शिवाय जे शरद पवार आज योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीचं अवलोकन करावं, अन् बलात्काराच्या घटनेतील आरोपींचा कडेलोट किंवा चौरंगा करावा. तरच बलात्काऱ्यांना जरब बसेल... अन् त्यावेळी सुप्रिया ताईंनाही हे विचारण्याची वेळ येणार नाही की, हे सगळं कधी थांबणार...!

Tuesday, 29 September 2020

कपल चँलेंज कशासाठी?


गेल्या काही दिवसांपासून फेसबुक यूजर्सकडून कपल चँलेंज नावाने हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यामध्ये कोट्यवधी यूजर्स आपल्या पत्नी सोबत, प्रेयसीसोबतचे फोटो टाकून या चँलेंजला एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. पण अशा प्रकारचे चँलेंज खरंच गरजेचं आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या अटकावासाठी जेव्हा देशात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर त्याचे नकारात्मक परिणाम अनेकांनी अधोरेखित केले. पण त्याच्या सकारात्मक परिणामांना आपण सोईस्करपणे दुर्लक्ष केले. कारण, या लॉकडाऊनच्या काळात मोबाईलमध्ये गुंतलेली आजची आपली तरुण पीढि या निमित्ताने बोलू लागली, आपलं मन मोकळं करु लागली. हा सकारात्मक बदल अनेकांनी चांगला असल्याचं मत व्यक्त केलं. पण जसजसं लॉकडाऊन शिथील होऊ लागला, तसतसं पुन्हा ही नवी पीढि आपल्या पूर्वीच्या मार्गावर जाताना दिसत आहे. कपल चँलेंज हे त्यापैकीच एक म्हणावे लागेल.

वास्तविक, दोन व्यक्तींचं नातं हे अतिशय नाजूक आणि विश्वासावर आधारित असतं. पण आजच्या पीढिला प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन करायची सवय लागली आहे. त्यामुळे याचा सगळा पोरखेळ होताना दिसत आहे. कपल चँलेंजमुळे हे पोरखेळ प्रकर्षाने समोर आले आहेत. पंजाबच्या मोहालीमध्ये कपल चँलेंजमुळे एका व्यक्तीला घरवाली आणि बाहरवालीच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. तर देशाच्या विविध भागातून काही धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी या चँलेंजपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.

कारण, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कपल चँलेंजच्या माध्यमातून या चँलेजमधील फोटोंचा वापर करुन आणि आपली वैयक्तीक माहिती आपण सहजपणे सायबर गुन्हेगारांच्या हातात देत आहोत. ज्याच्या माध्यमातून बँक घोटाळ्यापासून पोर्नोग्राफी, डीपफेकपर्यंत वापर केला जाऊ शकतो.  त्यामुळेच पुणे पोलिसांनीही ट्विट करुन आपले फोटो अशा प्रकारच्या हॅशटॅगमध्ये वापरण्यापूर्वी दोन वेळा विचार करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे.

गेल्या काही वर्षात अनेक महिलांना डीपफेक आणि रिवेंज पॉर्नसारख्या प्रकारांचा सामना करावा लागला आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल हे डीपफेक म्हणजे काय? तर डीपफेक म्हणजे, आर्टिफिशिय इंटिलिजन्सचा वापर करुन, कॉम्प्यूटरद्वारे फोटो अथवा व्हिडीओ बनवून व्हायरल केला जातो. यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून कोणत्याही व्यक्तीचा चेहरा उपलब्ध व्हिडीओ किंवा फोटोवर सुपरइम्पोज करु शकतो.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनाही या डीपफेकचा करावा लागला आहे. 2018 मध्ये मिशेल ओबामा यांचा असाच एक फेक व्हिडीओ रेडिटवर व्हायरल झाला होता. फेक अॅपचा वापर करुन, त्यांचा चेहरा एका पॉर्नस्टारच्या चेहऱ्यावर लावण्यात आला होता. भारतातील अनेक अभिनेत्रींचे फोटो अशाप्रकारे मॉर्फ करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, अशा फेक किंवा एडिटेड फोटोंचा वापर सोशल नेटवर्किंग साईटवर आणि डेटिंग साईट्सवर करुन समोरच्याला ब्लॅकमेल केलं जातं. त्यामुळे असे असताना या अशा प्रकारच्या चँलेंजला प्रोत्साहन देण्याची गरज काय आहे? जर आजच्या पीढिने प्रायव्हसीच्या नावाखाली एकत्र कुटुंब पद्धतीला मुठमाती दिली आहे. मग आपल्या प्रायव्हेट गोष्टी सार्वजानिक करण्याची गरज ती काय?

Friday, 18 September 2020

कांदा निर्यात बंदी गरजेची होती का?


गेल्या चार दिवसांपासून राज्यात कांदा निर्यात बंदीवरुन मोठमोठी राजकीय आंदोलनं सुरु आहेत. शेतकरी संघटनांनी या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांसह अनेक नेत्यांनी निर्यात बंदी उठवावी अशी मागणी लावून धरली आहे. सर्व वृत्तपत्रातून ही याच्या बातम्या झळकत आहेत. खरंतर माझा या विषयावर जास्त नाही. त्यामुळे, त्यावर जरा शोधाशोध केली. कारण, खरंच कांदा निर्यात बंदी गरजेची आहे का? की इतर कारणे आहेत.

तर या संदर्भातील काही बातम्यांचे विश्लेषण वाचलं, त्यानंतर निर्यात बंदी हे योग्यच पाऊल असल्याचं मला पटलं. कारण का? तर ज्या प्रमाणे आपल्याला भविष्यात एखादी गोष्ट करायची असेल, तर त्याचं आपण ज्या प्रकारे पूर्व नियोजन करतो तसाच हा प्रकार आहे. अनेक जण म्हणतील मी मोदी भक्त असल्याने असं म्हणत आहे. पण त्यामुळे मला फरक पडत नाही. केवळ वस्तुस्थिती मांडावीशी वाटते.

वास्तविक, देशात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये 40 टक्के कांद्याचे उत्पादन हे खरीप हंगामात घेतले जाते. तर उर्वरित 60 टक्के उत्पादन रब्बी हंगामात होते. यातील खरीप हंगामातील कांद्याची साठवणूक करता येत नाही. त्यामुळे जो काही भार आहे तो उर्वरित 60 टक्के रब्बी हंगामावर अवलंबून आहे.

इंडियन एक्सप्रेस च्या विश्लेषणानुसार, कांदा निर्यात बंदीची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिलं म्हणजे, कांद्याचे दर घाऊक बाजारात सतत वाढत आहेत. त्यामुळे शहरी भागातील जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. यासाठीच मार्च ते सप्टेंबर दरम्यानची कांद्याची आकडेवारीकडे लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. मार्च महिन्यात नाशिकच्या लासलगाव बाजारात कांद्याचे दर प्रतिक्विंटल 1500 रुपये होते. ते आता सप्टेंबर महिन्यात 3000 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात 25-30 रुपये प्रतिकिलोने मिळणारा कांदा; सप्टेंबरमध्ये 30-40 प्रतिकिलो मिळत आहेत. या दरवाढीवरील सांख्यिकी मंत्रालयाच्या विश्लेषणानुसार, ऑगस्ट महिन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारात डाळ आणि कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. अन् ही वाढ नोंदवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, निर्यातीमध्ये 30 टक्क्यांची वाढ.  

आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, अतिवृष्टी. वास्तविक, भारत हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे. भारतातील कांद्याच्या विशिष्ठ चवीमुळे जगभरातील 76 देशांमध्ये कांद्याची निर्यात होते. यामध्ये प्रामुख्याने बांग्लादेश, श्रीलंका, मलेशिया, संयुक्त अरब इमिरात, जपान, स्वित्झर्लंड, अमेरिका, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आदी देशांचा समावेश आहे. तर देशातील कांदा उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरात आदी राज्यांचा समावेश होतो.

यंदा देशातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये तर पावसाचा कहर पाहायला मिळाला. या भागातील शेतकऱ्यांकडून हाता तोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात बंदी करुन देशाबाहेर पाठवण्यात येणारा कांदा साठवला, टिकवला. तर भविष्यात कांद्याचे दर अटोक्यात राहतील. पण याकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन कांदा निर्यातबंदीवरुन जो गजहब माजवला जात आहे, तो आश्चर्यकारक आहे.

बरं. हा जो काही अकांडतांडव चालू आहे, तो नक्की शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी हा देखील एक प्रश्नच आहे. कारण, दरवेळी दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकल्याच्या बातम्या आपण राजरोसपणे पाहतो/ वाचतो. कारण, हे व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमाल कमी किमतीत खरेदी करुन बाजारातील स्थितीनुसार, जास्त नफ्यासाठी एक तर साठवणूक करतात, किंवा चढ्या दराने निर्यात करतात. यातून शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी मधले दलाल, व्यापारी यांचाच फायदा जास्त होतो. त्यांच्यासाठी एवढा राडा कशासाठी. जर या विरोधामुळे शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे जास्त येणार असतील, तर हा विरोध योग्यच आहे. केवळ दलालांसाठी हा विरोध असेल, तर याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.  

Tuesday, 4 August 2020

युगायुगातिल हे सिंहासन आज पुन्हा जाहले सचेतन

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचे आयोध्या नगरीत भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. येत्या ५ अॉगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. त्यामुळे आज लाखो रामभक्तांच्या मनात एकच भावना उत्पन्न होत आहे; ती म्हणजे 'युगायुगातिल हे सिंहासन आज पुन्हा जाहले सचेतन.' कारण भारतखंडाचा मानबिंदू म्हटलं तर सर्वांच्याच मुखात प्रभू श्रीरामांचेच नाव येते. अन् हा मानबिंदू आता पुनर्स्थापित होत आहे.

मुस्लिम आक्रमक बाबराने १५२८ मध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर पाडून तिथे मशिद उभारली. अन् लाखो भारतीयांच्या जनमानसावर तीव्र आघात केला. हा आघात इतका तीव्र होता की, त्यामुळे लाखो भारतीयांच्या जनमानसावर जी जखम झाली होती, ती कित्येक वर्षे भळभळत होती. ही भळभळती जखम बरी व्हावी, यासाठी अनेक वर्षे लढा सुरू होता. या लढ्याला २० व्या शतकात यश मिळालं आहे. 

राम मंदिर उभारणीसाठीच्या आंदोलनाचा इतिहास पाहिला, तर सन १८५३ पासून ते स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संघर्ष झाले. पण मुसलमान राज्यकर्त्यांकडून होणारी हेटाळणी, अन् ब्रिटिशांची संधीसाधू वृत्ती यामुळे याला कधीही यश आले नाही. स्वतंत्र्योत्तर काळातही मुस्लिमांच्या तुष्टिकरणामुळे, हिंदू राज्यकर्त्यांकडून विशेषतः काँग्रेसी राज्यकर्त्यांकडून हे कोट्यवधी रामभक्तांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न सातत्याने झाला. त्यामुळे १९८९ मध्ये विश्र्व हिंदू परिषदेने व्यापक जनसमर्थनासाठी मोहिम सुरू केली. विश्र्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल आणि मोरोपंतजी पिंगळे यांच्याकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली. अशोकजी आणि मोरोपंतजी यांनी तर एकनाथजी रानडे यांच्या प्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य या कार्यास समर्पित केलं होतं. या कार्यासाठी हिंदू चेतना जागरुत करण्याचे पूर्व, पूर्ण आणि सूक्ष्म नियोजन मोरोपंतजींनी केले होते. तर अशोकजी या कार्यासाठी समाजातील विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन, बैठका घेऊन लोकजागृतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. या दोन महाविभूतींनी कोट्यवधी भारतीयांच्या मनात हिंदू आस्मितेची ज्योत प्रज्वलित केली. 

यासाठी सुरु करण्यात आलेली शिलापूजन मोहिमेला व्यापक जनसमर्थन मिळत होते. कोट्यवधी भारतीय स्वयंप्रेरणेने आपापल्या गावातून मंदिर उभारणीसाठी शिळा पूजन करुन अयोध्येला घेऊन येत होते. १९९२ मध्ये अडवाणीजींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. यामुळे भारतीय जनमानसात एक वेगळीच ऊर्जा संचारली. लाखो रामभक्त अयोध्येकडे कूच करत होते. लाखो रामभक्तांनी एक निश्चय केला होता की, 'बस्सं झालं आता.... रामलल्ला हम आएंगे मंदिर वहीं बनाएंगे.' अन् या निश्चयाची परिणिती म्हणून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पतन झाले. यात दुर्दैवाने कोठारी बंधुंना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. पण आज सोन्याचा दिवस उजाडला आहे, त्यामुळे कोठारी कुटुंबीय देखील आज भावनाकुल झाल्याचे आपण पाहतो. 

या आंदोलनात साध्वी ऋतंभराजी, उमा भारतीजी, आचार्य धर्मेंद्रजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी, कल्याण सिंहजी, प्रमोदजी, गोपीनाथ राव, मनोहर पर्रीकर, नरेंद्र मोदीजी यांनी हा यज्ञ आपापल्या परीने सफल बनवला. त्यामुळे हे स्वप्न पूर्णत्वास जात असताना, या आंदोलनाशी संबंधित उमा भारतींच्या पोटात आनंद मावेनासा झाला आहे. उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर उभारणीचा शुभारंभ होतोय, हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. कारण जी भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही, तो परमोच्च आनंदाचा क्षण असतो. राम मंदिर उभारणीचा क्षण हा अशाच प्रकारचा परमोच्च आनंदाचा क्षण आहे."

या आंदोलनाबद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे, याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता, की लाखो रामभक्त अंगावरच्या कपड्यानिशी  अयोध्येत पोहोचले होते. इथे हे सर्व रामभक्त  सकाळ-संध्याकाळ भजन, कीर्तन करत होते. या भजन किर्तनाने अयोध्या नगरी राममय झाली होती. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी जेव्हा बाबरीचं पतन अयोध्यावासींनी अक्षरशः दिवाळी साजरी केली होती. प्रत्येकजण एकमेकांना मिठाई वाटप करत होते. तर घराघरात दीपोत्सव साजरा केला जात होता. 

त्यामुळे आंदोलनाचा हा भारलेला काळ कोट्यवधी रामभक्तांसाठी एक आयुष्याची पूंजीच बनून राहिला आहे. कारण जे स्वप्न उराशी बाळगून, आज अनेकजण जगत आहेत, त्यांच्यासाठी ही जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याची भावना आहे. शेवटी इतकंच...

सिंहासन हे विक्रमशालि चिरगौरव युत वैभवशालि
होण्यास्तव हे अपुले येथे चला करा सर्वस्व समर्पण॥

Sunday, 14 June 2020

सुशांत तू खरंच चुकलास...

प्रिय सुशांत,

आज तुझ्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्काच बसला. मित्रा, तू अतिशय संवेदनशील कलाकार होतास. तुझे चित्रपट पाहताना आम्हाला जीवनाकडे पाहण्याची एक पॉझिटिव्हीटी मिळते. अन् तू हे असं पाऊल उचलावंस... खरंच हे अनाकलनीय आहे.

तुझा 'एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट जेव्हा आम्ही कधीही पाहतो, तेव्हा त्या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट मनाला फारच भावतात. या चित्रपटात तुझा एक डायलॉग आहे. रेल्वे स्टेशनवरचा... तू तुझ्या अधिकारी गांगुली सरांना बोलतोस की, "हम कर क्या रहे हैं. सुबह से लेकर शाम तक सिर्फ टिकीट चेक कर रहे हैं. ना हमारा गेम इम्प्रूव्ह हो रहा है, ना हम." त्यावर तुझे सिनियर जीवन म्हणजे काय हे सांगतात. आणि शेवटी बोलतात, "समझले अभी ये सब बाऊन्सर है." त्यावेळी जसा तू व्यक्त झालास, तसा आजही व्यक्त झाला असतास, तर प्रश्न‌ नक्की सुटला असता. पण आज तू हे असं पाऊल उचलावंस?

अरे, जीवनातील आव्हानांशी तोंड देताना एवढा कसा काय घाबरु शकतोस तू? मला हे मान्यच आहे, समस्या सगळ्यांनाच असतात. पण त्याचा सामना करायला पाहिजे. असं भ्याडपणे पळून जायला नको होतंस.

आज कोरोनासारख्या महामारी मुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. आमच्या कोकणात तर 'निसर्ग' चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले, ते पाहताना फारच अस्वस्थ व्हायला होतं. पण तरीही या मंडळींनी इतकं टोकाचं पाऊल उचललं नाही. ते सगळे लढतायतच ना? तसं तू ही लढायला पाहिजे होतंस.

बहुतेक तू आमच्या कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता वाचली नसावीस. तू जर तू ही वाचली असतीस, तर जीवनातला संघर्ष असा टाकून गेला नसतास. कारण या कवितेतील नायक महापुरात सगळं घर उद्धवस्त झाल्यावरही एवढंच म्हणतो,
"मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून लढ म्हणा"

शेवटी इतकंच सांगतो, आज तू सोडून गेलास खरा. पण तुझे चित्रपट हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील!

तुझा

एक चाहता