गेल्या वर्षी MX प्लेअरवर ‘क्विन’ ही वेबसिरीज रिलीज झाली. 11 भागांची ही मालिका नुकतीच पाहण्यात आली. प्रसिद्ध लेखिका अनिता शिवकुमार यांच्या ‘क्विन’ या कादंबरीवर आधारित या वेबसिरिजमध्ये तामिळनाडुच्या राजकारणातील अतिशय शक्तीशाली अशा जयललिता यांचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. या वेब सिरिजमध्ये राम्या कृष्णन, इंद्रजीत सुकुमारन, वामशी कृष्णन, अनिखा, अंजना जयप्रकाश यांनी भूमिका साकारल्या असून, राम्या कृष्णन यांना पाहताना प्रत्यक्ष जयललिताच आपला जीवनपट उलगडून सांगत असल्यासारखे वाटते.
खरं तर राजकारण
या विषयावरील सिनेमांना जास्त प्रेक्षक मिळत नाही. काही ठराविक आणि इंट्रेस्टिंग गोष्टी
असल्याच तर प्रेक्षक ते पाहण्यासाठी येतात. पण ‘क्विन’ ही वेब सिरीज पाहताना प्रेक्षक एका जागेवर खिळून राहतात.
कारण, जयललिता हे भारताच्या राजकारणातील असं पान आहे, ज्याबद्दल जाणून घेणं अनेकांना
आवडतं. त्यामुळेच ही वेब सिरीज रिलीज झाल्यापासून प्रचंड लोकप्रिय झाली. पण ही वेब
सिरीज पाहताना काही प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होतात. ते म्हणजे, दक्षिण भारताच्या
राजकारणावर सिनेसृष्टीचं इतकं गारुड का? अन् जयललिता
यांच्यानंतर कोण?
त्यामुळे या
प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडासा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला, तर असे लक्षात येते
की, तामिळनाडुचं राजकारण सिनेक्षेत्राशिवाय चालूच शकत नाही. त्यामुळेच सध्या भारतीय
जनता पक्ष देखील आपले पाय दक्षिण भारतात घट्ट रोवण्यासाठी कधी रजनीकांत, कधी पवन कल्याण,
कधी खुशबू सुंदर यांच्या नावांची चाचपणी करत आहे. असो. पण मुद्दा हा नाही... मुद्दा
हा आहे की, दक्षिण भारताच्या राजकारणावर सिनेसृष्टीचा इतका प्रभाव का? तर याचं उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय विरुद्धच्या
संघर्षात पिछेहाट झालेल्या द्रविड चळवळीत सापडतं.
कारण, ब्रिटीशपूर्व
भारतात म्हणजे अगदी राजेशाही काळाचा विचार केला, तर मोघलशाही, आदिलशाही, निजामशाही
या राजेशाह्यांविरोधात दक्षिण भारतातील अनेक संस्थानिक नेहमी उभे ठाकल्याचे पाहायला
मिळते. पण अपूऱ्या सामर्थ्यामुळे हा संघर्ष तोकडा पडायचा. त्यामुळे द्रविड विरुद्ध
इतर हा सुप्त संघर्ष कायमच राहिला. याच द्रविडी अस्मितेला फुंकर घातली ती पेरियार
अर्थांत एस.एल. रामासामी यांनी. 1925 मध्ये द्रविडी अस्मिता चेतवून, पेरियार यांनी
नवी चळवळ सुरु केली. ब्राह्मण वर्चस्ववादाला आणि पर्यायाने बहुतांश हिंदू वा वैदीक
चालिरितींना विरोध करत त्यांनी ही द्रविडी चळवळ वाढली. तत्कालिन ब्रिटीश साम्राज्यातील
दक्षिण भारत आणि श्रीलंकेमधील जाफना (शहर) पर्यंतचा भाग स्वतंत्र देश म्हणून घोषित केला जावा,
अशी या चळवळीची मागणी होती. या चळवळीतूनच जन्म झाला, तो ‘द्रविड कळघम’ अर्थात DK चा. या ‘द्रविड कळघम’ने द्रविडी अस्मितेला चेतवल्यामुळे त्यावेळचे अनेक क्रांतिकारी,
लेखक विचारवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर ‘द्रविड कळघम’च्या झेंड्याखाली
एकत्रित झाले. यात दोन नावे महत्त्वाची होती. एक म्हणजे
अण्णादुराई आणि दुसरे म्हणजे करुणानिधी. अण्णादुराई हे पेशाने पत्रकार आणि निष्णात
लेखक; तर दुसरे हे पटकथा लेखक.
या दोघांचाही सुरुवातीपासूनच समाजकारणाकडे कल होता. त्यामुळे पेरिनार यांच्या नेतृत्वाखाली
‘द्रविड कळघम’ (DK) मध्ये काम करायला सुरुवात केली.
पण भारताला
स्वातंत्र्य मिळालं, अन् या द्रविडी चळवळीमध्ये फूट पडली. कारण पेरियार यांना देश
स्वतंत्र होणं ही संकल्पनाच मान्य नव्हती. कारण, त्यामुळे त्यांच्या ‘द्रविडनाडू’ या मूळ संकल्पनेला
मूठमाती मिळणार होती. त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्याला कडवा विरोध होता. तर दुसरीकडे
अण्णादुराई आणि करुणानिधी यांचा स्वातंत्र्याला पाठिंबा होता. त्यामुळे या मुद्द्यावरुन
पेरियार आणि अण्णादुराई यांच्यात खटके उडाले. अन् अण्णादुराई हे द्रविड कळघम मधून
बाहेर पडून त्यांनी ‘द्रविड मुनेत्र
कळघम’ (DMK) या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. या DMK च्या माध्यमातून अण्णादुराई पुढे तमिळनाडूचे भाग्यविधाते
ठरले.
पुढे याच DMK च्या संपर्कात
तामिळ चित्रपट सृष्टीतले महानायक MGR म्हणजेच एम.जी. रामचंद्रन आले. प्रचंड लोकप्रियतेमुळे MGR यांना राजकारणात रुळण्यास वेळ लागला नाही. अल्पवधितच ते लोकनेते
झाले. पण, MGR यांची लोकप्रियता
करुणानिधींच्या डोळ्यात खुपू लागली. याची दोन कारणं होती. एकतर पेरियार यांच्यापासून
फारकत घेऊनही अण्णादुराई यांच्यामुळे करुणानिधींना अपेक्षित लक्ष्य साध्य करता आले
नाही. त्यातच MGR यांच्या प्रचंड लोकप्रियतेपुढे करुणानिधी फिके पडले. त्यामुळेच
ते आपल्या मुलाला मुथूला राजकारण आणि सिनेजगत दोन्ही ठिकाणी प्रस्थापित करु पाहात
होते. पण या दोन्ही ठिकाणी MGR यांचाच प्रभाव असल्याने, करुणानिधींना आपला हेतू साध्य करता
येत नव्हता. त्यामुळे करुणानिधी MGR यांचा सतत दुस्वास करु लागले. त्यांना हिणवू लागले.
त्यामुळे
वैतागून MGR यांनी DMK मधून बाहेर पडत ‘अण्णा द्रमुक’ची स्थापना
करुन आपली नवीन राजकीय कारकिर्द सुरु केली. त्यातच स्वत: च्या पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळावी, म्हणून त्यांनी त्यात
‘ऑल इंडिया’ शब्द जोडून AIADMK नावारुपाला आणलं. याचा परिणाम व्हायचा तो झाला. प्रचंड लोकप्रियतेमुळे MGR सत्तास्थानी
सहज आरुढ झाले. AIADMK च्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले, आणि पुढे त्यांचीच
गादी चालवत जयललिता या देखील मुख्यमंत्री झाल्या. हाच धडा NTR म्हणजेच नंदामौरी तारका रामराव यांनी गिरवला. आपल्या लोकप्रियतेचा
यथायोग्य वापर करुन आंध्र प्रदेशचं सत्ता हस्तगत करुन मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण
केलं. हीच इच्छा मनी बाळगून चिरंजीवी यांनीही राजकारणात प्रवेश केला. त्यांनी प्रजाराज्यम
नावाने पक्ष स्थापन केला. पण त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने 2011 मध्ये राष्ट्रीय
काँग्रेसमध्ये त्याचे विलनीकरण केलं.
आता याच मार्गाने
दक्षिणेतील पुढची पीढि चालली आहे. दक्षिण भारतातील दोन दिग्गज अभिनेते थलैवा रजनिकांत
आणि कमल हसन हे राजकारणाच्या आखाड्यात उतरु पाहात आहेत. यातील कमल हसन याने 2018 मध्ये
‘मक्कल निधी मय्यम’ नावाने पक्ष
स्थापन करुन राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पण अजून कमल हसन यांना अपेक्षित यश प्राप्त
झालेलं नाही. त्यांनी आपला पक्ष सोशल मीडियापूरताच मर्यादित ठेवल्याने, त्यांना समर्थन
कितपत मिळेल याबद्दल राजकीय विश्लेषकांकडून प्रश्नच उपस्थित केले जात आहेत. कमल हसन
यांच्या राजकीय भवितव्याबाबत मद्रास विश्वविद्यालयाचात राज्यशास्त्र शिकवणारे प्रोफेसर
रामू मनिन म्हणतात की, कमल हसन हे एक उत्तम कलाकार आहेत. पण त्यांना राजकारणात स्वत:ला प्रस्थापित करायचं असेल, तर त्यांना जमिनीवर उतरुन काम
करावं लागेल. कमल हसन यांच्याबाबत तोच खरा प्रश्न आहे. अलिशान रुफटॉप गाडीतून येणे,
त्यांचे चाहते मोबाईलवर फोटो घेणे, एकप्रकारे शोऑफ करण्यामुळे ते लोकांशी अजून कनेक्टच
झाले नाहीत.
दुसरीकडे थलैवा देखील राजकीय आखाड्यात येऊ पाहात आहेत. तामिळनाडूच्या आगामी निवडणुकीत ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देत राजकीय पक्ष स्थापन करणार नसलं असल्याचं सांगितलं आहे. यासाठी त्यांनी एक पत्र देखील ट्विट केलं आहे. पण त्या पत्रात त्यांनी तामिळनाडुच्या जनतेची सेवा करणार असंच म्हटलंय. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीवर आपली छाप पाडणार, हे नक्की मानलं जात आहे. एकंदरितच दक्षिण भारताच्या आणि विशेष करुन तामिळनाडुच्या राजकारणाला सिनेसृष्टीशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या जरी वलंयाकित चेहरा नसला, तरी त्याची अनेकजण आपापल्या मार्गाने चाचपणी करत आहेत. यातून ज्यांची लोकप्रियता जास्त, तेच तामिळनाडुवर राज्य करतील हे मात्र नक्की.!

No comments:
Post a Comment