Thursday, 26 November 2020

वारसदार


काल बीबीसी मराठीवर एक लेख वाचनात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘शरद पवार हे अजित पवार यांना वारसदार करणार नाहीत,वक्तव्याचा संदर्भ देऊन विश्लेषण केले होते. हे विश्लेषण करताना महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पत्रकार जे संपादक स्तरावरचे होते, त्यांच्या प्रतिक्रीया देण्यात आल्या होत्या. त्यात काही बँलेंन्स होत्या, तर नेहमीप्रमाणे पवार साहेबांच्या गुड लिस्ट राहण्यासाठी दिलेल्या प्रतिक्रीया होत्या.

यामध्ये पवार साहेबांचा राजकीय वारसदार कोण? याचे सखोल विश्लेषण करताना शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया ताई सुळे यांना यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे संदर्भ देण्यात आले होते. यापैकी गेल्या वर्षी महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना नेहमीप्रमाणे गुगली टाकत पवार साहेबांनी सांगितलं होतं की, सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्या आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे. आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांना अधिक रस असल्याचे पवार साहेबांनी सांगितलं होतं.

पवार साहेबांच्या या उत्तराचा बारकाईने अभ्यास केल्यास, खरंच सुप्रिया ताईंना राष्ट्रीय राजकारणात रस आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. कारण, त्या राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणातच जास्त रस दाखवतात हे वेळोवेळी दिसून येतं. मग ते उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यातील त्यांचा वावर असो, किंवा राज्यातील इतर विषयात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय विषयांपेक्षा राज्यातील विषयांतच त्यांना जास्त स्वारस्य असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे पवार साहेब जे म्हणतात, ते कितपत वरवरचं आहे, हे सहज लक्षात येईल.

दुसरं विषय हा की, आपला वारसच नेमायचा विषय असतो, तेव्हा पुत्र प्रेमालाच नेहमी प्राधान्य दिलं जातं, हे अगदी रामायण- महाभारतापासून आपण पाहत आलो आहोत. एवढंच कशाला देशाच्या राजकारणात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला आपला राजकीय वारस निश्चित करण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, त्या-त्या वेळी गांधी घराण्याचेच पारडे जड राहिले. राज्याचा विचार केला, तर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपला राजकीय वारस नेमताना राज ठाकरेऐवजी उद्धव ठाकरेंनाच प्राधान्य दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा आपला राजकीय वारस म्हणून आदित्य ठाकरेंलाच प्राधान्य देत आहेत.

याच लेखात प्रताब असबे यांची बीबीसीने प्रतिक्रीया जाणून घेतली, त्यावेळी प्रताब असबेंनी वारसदार हा लोकांनीच ठरवायचा असतो. पवारांनीही आपलं हे मत बोलून दाखवल्याचं सांगितल्याचं त्यांचं म्हणणं होतं. असं होतं, मग गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईंना निवडणून आणण्यासाठी पवारसाहेबांनी बारामतीतच का ठाण मांडलं होतं हे उत्तर त्यांनी द्यायाला हवं होतं.

एवढंच कशाला पवार साहेबांनी ज्या पद्धतीने रोहित पवारांना नेतृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन विधानसभेत निवडून आणलं, तशी संधी पार्थ पवारांना का दिली नाही. पार्थ पवारांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणून त्यांच्याकडून ही संधी का हिरावली. त्यामुळे पवार साहेबांना सुप्रिया सुळेंशिवाय दुसरं कोणीही नको आहे हे वारंवर सिद्ध होत आहे. त्यामुळे पवार साहेबांचा राजकीय वारस सुप्रिया ताईच असतील हे कुणीही डोळे बंद करुन सांगेल.

No comments:

Post a Comment