Thursday, 8 January 2015

धोनीच्या निवृत्तीचा वाद

२०१४च्या पूर्वसंध्येला क्रिडा क्षेत्राला धक्का देणारी घटना घडली ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रीकेट मधून घेतलेल्या निवृत्तीची. धोनीच्या निवृत्तीचे वृत्त बाहेर आले आणि अनेक क्रीकेटप्रेमींच्या नववर्ष स्वागत कार्यक्रमाच्या उत्साहाला विरजण लागले. धोनीचा कसोटी क्रीकेटमधून निवृत्तीचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक असला तरी त्याचे वृत्त बाहेर येण्याच्यावेळाने अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. अन या प्रश्‍नांच्या आधारावर तज्ज्ञांकडून देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे वृत्त बाहेर येण्याच्या दुसर्‍या दिवशी असाच एक तर्क लढविला जात आहे तो, म्हणजे या निवृत्तीमागे रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील जवळकीचा. शास्त्री आणि कोहली यांच्या जवळकीवरून जे चर्वितचर्वण सुरू आहे त्याचे फलित नेमके काय: का एकाचे खापर दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रकार आहे. तसेच धोनीला देखील शास्त्रीबुवांची आणि कोहलीची ही जवळकी इतकी का खटकावी? हा देखील प्रश्‍न आहे.
वास्तविक, धोनीची कसोटी सोबतच एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी कर्णधार पदी नियुक्ती करण्यात रवी शास्त्रीनींच महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यावेळी गुरू ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दित सौरभ गांगुली यांच्या सोबत सुरू झालेल्या शितयुद्धाने भारतीय क्रीकेट संघाची वाताहत झाली होती. त्याचवेळी भारतीय नियामक मंडळाने काही काळापुरते रवी शास्त्री, व्यंकटेश प्रसाद आणि रॅबिन सिंग यांची हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. धोनीमधील नेतृत्त्वगुण ओळखुन त्याच्यावर कर्णधारपदाची धुरा द्यावी असे शास्त्रींनीच सुचवले होते. त्याला त्यावेळच्या नियमाक मंडळाने देखील सहमती दर्शवली होती. त्यामुळे शास्त्रींनीच धोनीला कर्णधार पदी आरुढ केले होते असे म्हणलास वावगे ठरणार नाही.
धोनीने आपल्यावर सोपावलेली जबाबदारी लिलया पार पाडली. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकालातील कसोटी मालिकेतील एकूण ६० सामन्यांपैकी २७ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला. तर १८ सामने अनिर्णित राहिले. तसेच त्याच्याच नेतृत्त्व काळात भारतीय संघ अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाने टॉप ५ मधून कधी टॉप १ तर कधी टॉप २ पर्यंत मजल मारली. अशा या चमकदार र्नतृत्त्वाला काळानुरूप अनेक संकटांचादेखील सामना करावा लागला. मात्र तरीही त्याला समर्थपणे तोंड देत धोनीने आपल्यातील नेतृत्त्व गुणांचा परिचय सर्वांना करून दिला. अशा या नेतृत्वानेच विराट कोहली नावाचे रत्न हेरुन काढले. २००८ साली १९ वर्षांखालील विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने संघाचे नेतृत्व करून भारताला विश्‍व चषक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानाच त्याला भारतीय संघात समावेश झाल्यानंतर त्याला खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य धोनीने दिले. धोनीच्या नेतृत्वशैलीमुळेच विराट कोहली मधील उत्कृष्ट फलंदाजीचे आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाचे गुणांना बहर आला. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी देखील धोनीला पुरेपुर सहकार्य केले. तेव्हा मग धोनीच्या या निर्णया मागे या दोघांचा हाथ असण्याचे वृत्त म्हणजे दुसर्‍यावर खापर फोडण्याचा प्रकार आहे का? असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
तसेच धोनीच्या निवृत्तीची घोषणा धोनीने स्वत: केलेली नसून नियामक मंडळाकडून झाली आहे. कारण जेव्हा हे वृत्त बाहेर आले त्याचवेळी नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी पीटीआयाला दिलेल्या माहितीनुसार धोनीने जेव्हा फोन करून निवृत्ती घेण्याची माहिती दिली, त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटपेक्षा एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. तसेच ते पुढेही म्हणाले, ‘‘धोनीने मला सांगितले की, निवृत्तीचा निर्णय सहकार्‍यांना कळवल्याशिवाय जाहिर करू नये.’’ तर मग असे असेल तर मग बीसीसीआयने देखील इतर खेळाडूंच्या निवृत्तीच्या घोषणेप्रमाणे धोनीला पत्रकार परिषद घेऊन स्वत:च निवृत्ती जाहिर करण्यास का सांगितले नाही? हा देखील प्रश्‍न उद्भवतो. कारण पटेल यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘‘एखाद्या खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय त्याचा वैयक्तीक असतो. अन तो त्यांनीच जाहीर केलेला असतो.‘‘ आजपर्यंत अनेक खेळाडूंनी आपली निवृत्ती स्वत: पत्रकार परिषद घेऊन जाहिर केली. मग तो ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटींग असेल, सौरभ गांगुली असेल, सचिन तेंडूलकर असेल अशी एकना अनेक नावे सांगता येतील.या सर्वांनी आपली निवृत्ती पत्रकारांसमोर सांगितली. मग धोनीनेच का आपली निवृत्ती जाहीर करण्यास बीसीसीआयला सांगितले. तो स्वत: देखील हा निर्णय जाहिर करू शकला असता. कारण आजपर्यंत धोनीने कधीही आडपडद्याने खेळी केलेले एकीवात पण नाही. तर मग निवृत्तीसाठी हा आडपडदा कशासाठी? असे अनेक प्रश्‍न क्रीकेट प्रेमींसोबत माजी क्रीकेट खेळाडूंनादेखील पडले आहेत. त्यामुळे या निर्णयावर सर्वच माजी खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
माजी क्रिकेट पटू चंदू बोर्डे, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर सुनिल गावसकर आदीमंडळींनी निवृत्तीचा निर्णय अनपेक्षित असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच हा निर्णय स्वत: घेतला नसून घ्यावा लागला आहे. त्यातच गेल्या काही क्रिकेट मालिकांमधील ड्रेसिंग रुममधील वातावरणात कमालिचा बदल झाला आहे. तिसर्‍या कसोटी सामन्याच्या सुरूवातीलाच शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यातील वाद हाणामारी पर्यंत पोहचला. धोनीच्या वेळीच मध्यस्थीमुळे वादावर पांघरूण घातले गेले. त्यामुळे अशा वादांना कंटाळून तर धोनीने निवृत्ती जाहीर केला का? का याच्या मागेदेखील आणखी कोण आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे. या प्रकरणातील पडद्यामागील खरा सुत्रधार अजूनही अनभिज्ञ आहे. जेव्हा हा खरा सुत्रधार समोर येईल त्यावेळीच असले प्रश्‍न उपस्थित होण्यास पुर्ण विराम मिळेल.

No comments:

Post a Comment