काही वर्षांपूर्वी शाहीद कपूर, करिना कपूर, आलिया भट अशी तगडी स्टारकास्ट असलेला उडता पंजाब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून पंजाबमधील अमली पदार्थ सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य करण्यात आले होते. अन् अकाली दल सरकारला एकप्रकारे टार्गेट करण्यात आले. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थाचा मुद्दा अतिशय कळीचा बनला होता. या मुद्द्याने जनमानस ढवळून निघाले होते. त्यामुळे परिणाम अपेक्षितच झाला, अन् अकाली दलाचे सरकार गेले. अन् कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आले. त्यानंतर या अमली पदार्थाचे पुढे काय झालं? म्हणजे नव्या राज्य सरकारला अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या उद्योगाला चाप बसला का? माहित नाही.
पण आज महाराष्ट्रातही तशीच स्थिती निर्माण होत आहे.
आधी मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्या घरी २०० किलो गांजा सापडल्याने एनसीबीकडून
अटक, अन् आठ महिने तुरुंगवास, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्स पार्टी
प्रकरण, आणि आता एनसीपीने नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त केल्याचं प्रकरण, किंवा
काल-परवा कोल्हापूरमधील एका फार्महाऊसवरुन ३८ किलो एमडी ड्रग्स जप्त होण्याचे
प्रकरण असो; या सगळ्यातून महाराष्ट्र हा आमली पदार्थांचा सुपरस्टॉक्सिस्ट होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय
राहात नाही.
नांदेड मध्ये पकडण्यात आलेलं ११२७ किलोच्या गांजाच्या
प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहेत. विशेष
म्हणजे, याप्रकरणात ३० वर्षांपूर्वी म्हशींचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गृहस्थाची
गेल्या १० वर्षात झालेली प्रगती अनेकांना अचंबित करणारी आहे. विशेष म्हणजे नांदेड
प्रकरणातील जळगाव जिल्ह्यातील एक पोलीस पाटील ही अडकणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे कोल्हापूरमधील फार्महाऊसवरुन जप्त करण्यात आलेल्या ३८ किलो एमडी ड्रग्स
प्रकरणी केअर टेकर ताब्यात घेण्यात आला आहे. तर यातील मुख्य आरोपी एक वकील असून,
तो आता फरार झाला आहे.
तिकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केजमधील पोलीस एका गोदामावर छापा टाकायला गेले. तिथे गुटख्याचा अवैध साठा सापडला. त्यामुळे तो जप्त करणार, तितक्यात तिथे उपस्थित कोणीतरी एका व्यक्तीला फोन करतो, तोे व्यक्ती समोरुन सांगतो की, "पोलिसांना सांग, हा खांडेचा (शिवसेना जिल्हाप्रमुखाचा) गुटखा आहे. तुम्ही इथून निघून जा!" यानंतर पोलिसांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्राला एकीकडे व्यसनाधीनतेपासून मुक्त ठेवण्याची राज्यकर्त्यांकडून अपेक्षा असताना, राज्यकर्त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच जर अशा पद्धतीत बोलत असतील, तर त्याला जबाबदार कोण?
त्यामुळे हे सगळं एवढं दिवसागणिक भीषण होत आहे की,
महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेने सुरु आहे? असा प्रश्न स्वाभाविकपणे
उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. आता यात एक एक मासे गळाला लागत असल्याने, या
प्रकरणाची धग कुठे पर्यंत जाईल, हे आताच सांगणे अवघड असले, तरी उडता पंजाबनंतर
उडता महाराष्ट्र झाला आहे का? असे विचारण्याची वेळ आली आहे.

No comments:
Post a Comment