Monday 18 April 2022

कोल्हापूर उत्तरच्या निकालाचा अन्वयार्थ


नुकताच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या. पण त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची जुनी वक्तव्य काढून हिमालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मुळात या विजयाचे तटस्थपणे विश्लेषण होण्याची गरज आहे. पण तसे न होता, जो-तो आपापला कंड शमवण्यात मशगुल दिसत आहे.

वास्तविक, ही निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर मधून कोण निवडणून येणार, याचे उत्तर कुणालाही सांगणे अशक्य झाले होते. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेत, हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्यानंतर राजेश क्षीरसागर चार दिवस नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या मनात चांगलीच धडकी बसली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांना मुंबईत बोलवून घेत, आपले मुख्यमंत्रीपद शाबूत राखण्यासाठी काँग्रेसला मदत करण्याचा सल्ला क्षीरसागर यांना दिला. त्यानंतर त्यांनीही शब्द प्रमाण मानून काम करण्यास सुरुवात केली. तरीही त्यांच्याबद्दल शिवसेना नेतृत्वाला शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळे सेनेवर दगाफटक्याचे बालंट येऊ नये यासाठी नेतृत्वाने आपले निरिक्षक मुंबईतून कोल्हापुरात पाठवून दिले. पण तरी शिवसेनेप्रती सहानुभूती असणारे मतदार काँग्रेसला मतदान करण्यास तयार नव्हते, हे वेळोवेळी दिसून येत होते. अन् निवडणूक निकालातूनही हे स्पष्ट पणे जाणवून येत आहे.

कारण, वरकरणी शिवसेनेने आपली मते, काँग्रेसला दिली असल्याचे विश्लेषण केले जात असले, तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना जितकी मते मिळाली, ती सर्व मते पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेली नाहीत. उलट शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचे निवडणूक निकालातून सरळ सरळ दिसून आले. पण याची वाच्यता होऊ नये, म्हणून निवडणूक निकालापूर्वीच शहरात सर्वत्र शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याचे बॅनर शहरभर झळकवले गेले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसदेखील या निवडणुकीत नावापुरताच सहभागी झाला होता, असे चित्र होते. कारण, जिल्ह्यातील राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे मंत्री हसन मुश्रीफ हे प्रचारात जास्त काळ रमले नाहीत. एक-दोन सभा वगळता राज्यातील शीर्षस्थ नेते प्राचाराला आल्यानंतरच ते त्यांच्या ताफ्यात फिरताना दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान कितपत होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. असो...

या निवडणुकीत आज भाजपाचा पराजय झाला असला, तरी हा पराजय इतका जिव्हारी लागण्या इतपत नक्कीच नव्हता, हे अनेक राजकीय विश्लेषकही विविध व्यासपीठावरुन मान्य करत आहेत. कारण, तिन्ही पक्ष एकत्रित असतानाही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनाही म्हणावा इतका टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष आज जरी आनंद व्यक्त करत असले, तरी त्यांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर २०१४ चा अपवाद वगळला, तर इथे भाजपाने कधीही विधानसभा निवडणूक लढलेली नाही. तसेच दुसरं म्हणजे कोल्हापूर महापालिकेतही भाजपाची ताकद १३ नगरसेवकांपूरती मर्यादित राहिलेली आहे. याची कारणमिमांसा केली, तर वर्षानुवर्षे कोल्हापूर शहरावर डावे आणि काँग्रेसचा पगडा राहिला आहे. शिवसेना जरी इथे अस्तित्वात असली, तरी ती केवळ काही भागांपूरतीच आणि तडजोडीच्या राजकारणामुळेच वाढू शकली आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववाद्यांचा गढ म्हणून इथे कोणताही मतदारसंघ अस्तित्वात येऊ शकला नाही.

त्यामुळे ही निवडणूक लढवणं भाजपासाठी संघटनात्मक दृष्ट्या मोठं आव्हान होतं. तरीही हे आव्हान पेलण्याची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उचलली. अन् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे चंद्रकांतदादांनी बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढला. तसाच कोल्हापूर उत्तर मतदारसंघ या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंजून काढला. त्यांच्यासोबतीला माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नेटवर्क आणि समरजीत राजे घाटगे आणि शौमिका महाडिक यांच्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या सभांमधील अभ्यासू मांडणीमुळे, उत्तर मतदारसंघात भाजपाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

या निवडणुकीतील भाजपासाठीची एक मोठी उपलब्धी म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर भाजपा ज्या प्रकारे चार्ज झाला, त्यातून भविष्यात कोल्हापुरात भाजपाच्या वाढीसाठी मोठा वाव मिळाला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील २०२४ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास बोलून दाखवला आहे.

निवडणूक निकालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांना सोशल मीडियावरुन ट्रोलिंग सुरु आहे. पण हे ट्रोलिंग आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यकौशल्याची पावतीच म्हणावी लागेल. कारण, त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र भाजपामय केला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे भले-भले नेते गारद झाले. दादांच्या संघटन कौशल्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना म्हाडा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली होती. तर बारामती मतदारसंघ वाचविण्यासाठी पवार साहेबांना झगडावे लागत होते. त्यामुळे तेव्हापासूनच चंद्रकांतदादा हे विरोधकांच्या विशेष करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिट लिस्टवर राहिले आहेत.

कोल्हापूर उत्तरच्याबाबतीत आणखी बोलयाचे झाले तर, ही निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत बोटावर मोजण्या इतक्याच दिवसांचा कालावधी प्रचाराला मिळालेला होता. हा कालावधी कमी दिवसांचा असला, तरी भाजपाने तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचारसभांऐवजी घरो-घरी जाऊन संपर्क आणि मतदारांना भाजपाकडे खेचण्यावर भर दिला होता.

त्यामुळेच ज्या कसबा-बावडा भागात भाजपा कार्यकर्त्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत होते, त्या कसबा-बावड्यासह पेठांमधून आणि शहरातील इतर भागातून भाजपाला भरघोस मतदान झाले. विशेष म्हणजे, तिन्ही पक्ष एकत्रित येऊनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जितकी मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली होती; त्यापेक्षा पाच हजार जास्त मते जयश्री जाधव यांना मिळाली. त्यामुळे तिन्ही पक्षांची ताकद कुठे गेली, याचा शोध सध्या राजकीय विश्लेषक घेत आहेत. तर दुसरीकडे २०१४ च्या तुलनेत पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला दुप्पट मते मिळाली.

आज या निवडणुकीचे किंगमेकर सतेज उर्फ बंटी पाटील यांना म्हणवले जात आहे. पण त्यांनाही प्रचार काळात अक्षरश: तोंडाला फेस आला होता. त्यामुळेच प्रचारावेळी जिथे चंद्रकांतदादा पाटील जायचे; तिथे बंटी पाटील त्यांच्या मागून हजर असायचे. इतका धसका बंटी पाटील यांनी प्रचारादरम्यान घेतला होता.

आणखी एक म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला खऱ्या अर्थाने तारून नेले ते खरं म्हणजे मालोजी राजे यांनी. कारण मालोजी राजे स्वत: फुटबॉलप्रेमी आहेत, कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींची मोठी संख्या आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मालोजी राजेंनी आपले मतदान बाहेर काढले नसते, तर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना विजयासाठी पूरती दमछाक करावी लागली असती. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचे खरे किंगमेकर कोण हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. असो...

पण या पोटनिवडणुकीने एक दाखवून दिले ते म्हणजे, कोल्हापूरचा गढ हा काँग्रेसच्या हातातून नसटण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्याप्रकारे दिवा वीजण्याआधी तो जास्त प्रकाशमान होतो; त्याप्रमाणे काँग्रेसच्या विजयाकडे आज पाहिले पाहिजे.

No comments:

Post a Comment