Monday 23 November 2015

इसिसची पिल्लावळे कुणाचे?


 नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात १२९ पेक्षा जास्त नागरीकांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी आखाती देशात रक्ताची होळी खेळणार्‍या इसिसने (इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया) स्विकारली आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा इसिसचे वादळ घुमायला सुरुवात झाली आहे. सर्वच देश इसिसच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. पण इसिसचे पिल्लावळ कुणाचे? तसेच या संघटनेचा म्होरक्या  अबु बक्र अल बगदादी याचा उदय कसा झाला? यासारखे एक ना अनेक प्रश्‍न आता समोर येऊ लागले आहेत. तेंव्हा त्याची उत्तरे शोधताना एक दशक मागे गेल्यास याची उत्तरे मिळतील.
 इसिस म्हणजे, धर्मांध मुस्लीमांची आणि संपूर्ण जगात क्रुरतेची परिसिमा गाठणारी संघटना. अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या या नंगानाचाला अमेरिकेचा छळवाद देखील तितकाच कारणीभूत आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या संघटनेचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याचा जन्म १९७१ रोजी इराकमधील सामर्रा या छोट्याशा गावात झाला. बगदादीचे घराणे सुशिक्षित होतेे. तो देखील उच्चविद्या विभुषितच होता. त्याने बगदादमधील इस्लामी विज्ञान विद्यापीठातून इस्लामचे तत्त्वज्ञान या विषयावर डॉक्टरेट मिळवली होती. त्यानंतर तेथीलच एका मदरशामध्ये शाही इमाम म्हणून नोकरी पकडली होती. त्यावेळी त्याचा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता. पण अखाती देशांमधल इस्लामवरील मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या टोळ्यांमधील युद्धांचा अमेरिकने तेलाच्या राजकारणासाठी वापर सुरू केल्या नंतर अल कायदा, तालिबान, आणि आता इसिससारख्या संघटना फोफावू लागल्या.
 २००३ मध्ये इराकचे सद्दाम, लिबियाचे गदाफी आदी मंडळी सौदी राजपुत्रांच्या विरोधात उभे ठाकले होेते. त्यांचा अमेरिकच्या साम्राज्य वाढीला विरोध होता. अमेरिका आखाती देशात प्रमाणापेक्षा जास्तच हस्तक्षेप करीत आहे आणि त्याला सौदी राजपुत्रांचा राजाश्रय आहे, असा आरोप इराक आणि लिबियाचे प्रतिनिधी ओपेकच्या (Organization of the Petroleum Exporting Countries) बैठकांमधून करत होते. अन् सौदी राजपुत्रांच्या चंगळवादावर देखील ताशेरे ओढत होेते. त्यामुळेच, अमेरिकेने या दोन्ही देशातील सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला. अमेरिकेचे सैन्य इराक आणि लिबियामध्ये घुसवले.यासाठी बुशप्रशासनाने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन इराकमध्ये लापल्याचे कारण सुरुवातीला पुढे केले. पण नंतर अमेरिकेचे पितळ उघडे पडल्यानंतर बुशनी दुसरं कारण पुढं केले. आणि इराककडे महासंहारक शस्त्रास्त्रे असल्याची टूम काढली. तेही अमेरिकेची सबब खोटी ठरली.
 मात्र तोपर्यंत अमेरिकन सैनिक इराकमध्ये घुसले होते. त्यांनी इराकचा पुरता ताबा घेऊन सद्दामला अटक केली होती. अन् इराकी सैन्य बरखास्त केले. या बरखास्तीमुळे जवळपास इराकी सैनिकांवर उपासमारीची वेळ आली. एवढेच नाही तर काही सैन्याधिकारी, जनरल यांची रवानगी अमेरिकेच्या इराकमधीलच कँप आणि बक्का या छळछावणीत केली.
 अमेरिकेच्या या दादागिरीने यातीलच छळछावण्यांमध्ये बंदी असलेल्या बक्का छळछावणीचे जिहादी विद्यापीठात रूपांतर झाले. या छावणीतील अबु मुस्लीम अल तुर्कमानी सद्दामच्या सैन्यातील इंटेलिजन्सचा प्रमुख आणि अबु अली अल अनबारी इराकी सैन्याचा मेजर जनरल या दोघांनी अमेरिकन छळछावणीतील इराकी सैन्याला एकत्र केले. त्यांनी सैनिकांची संघटना बांधून इराकी सैनिकांचे जाळ उभारले.
 याच दरम्यान, दुसरीकडे इराकमधील अमेरिकन जाच इतका वाढला की, बगदादीने देखील धर्मांध मुस्लमानांच्या टोळ्यांमध्ये सामिल झाला, यातूनच तो २००९ च्या जवळपास अलकायदाचा सभासद बनला, त्याने ओसामाचा मास्टर माईंड अयमान जवाहीरीशी त्याची सलगी वाढवली, यामुळेच बगदादीला इराकमधील ओसामाच्या अलकायदाचे नेतृत्वपद देण्यात आले. बगदादीने याचा पुरेपुर वापर करून इराकमध्ये अल कायदा संघटनेचे जाळे उभारले. पण यामुळे इराकमधील ओसामाचे महत्त्व कमी होऊन बगदादीचे महत्त्व वाढले. बगदादीच्या कार्यपद्धतीवर खुष असलेली इराकमधील जिहादी त्याच्या प्रेमात पडली होती. हजारोंच्या संख्येने धर्मांध तरुण जिहादासाठी बगदादीच्या कळपात सामिल होत होते. पण या मुळे अयमान जवाहरी आणि बगदादी यांच्यात खटके उडत होते.
 २०११ साली लादेनच्या खातम्यानंतर अल कायदाचे जिहादी सैरभैर झाले, ओसामानंतर अल कायदा चालवणार कोण? असा प्रश्‍न सर्वच जिहाद्यांना पडला होता. अयमान जवाहिरीशी सातत्याने खटके उडाल्याने बगदादी देखील अल कायदावर नाराज होता. तो अल कायदामधून बाहेर पडून दुसरी संघटना स्थापन करण्याचा विचार करीत होता. संधीच्या शोधात असलेल्या बगदादीने ओसामाच्या खातम्याच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचा फायदा उचलण्यास सुरूवात केली. एकप्रकारे अमेरिकेने देखील याला पोषक वातावरण निर्माण करून दिले. कारण २०११ साली अमेरिकेने इराकमधील सैन्य माघारी बोलावून छळछावणीतील सर्व बंदींना मुक्त केले. अन् यातूनच सुटका झालेल्यांमधील अबु तुर्कमानी आणि अबु अनबारी यांनी प्रशिक्षित केलेली सशस्त्र मंडळी बगदादीला सामिल झाली. वरील दोन्ही जनरल्स आज इसिसच्या सैन्यात आणि कारभारात दोन नंबरवर आहेत.
 यामुळे बगदादीचे बळ चांगलेच वाढले, यातून त्याने संघटनेसाठी पैसा मिळावा या उद्देशाने सुरुवातीला सीरियावर हाल्ला चढवला. सिरीयन राष्ट्राध्यक्ष बशर असदशी युद्ध पुकारले. यातून बगदादीला सिरीयामध्ये जागाही मिळाली, अन् तेलाचे साठे देखील. आखाती देशात अल कायदा संपल्यात जमा झाल्याने, यातून फुटून बाहेर पडणारी मंडळी बगदादीच्या कळपात सामिला होत होती. २०१३ पर्यंत सिरीयातील लाखो जिहादी बगदादीला येऊन मिळाले. अल कायदाचं अस्तित्वच संपल्याने सौदी राजपुत्रांनी इसिसला जवळ केले. त्यांना रसद पुरवण्यास सुरूवात केली. याला इराकचे पंतप्रधान नूरी अल मलीकी यांनी वाचा फोडली. इसिसला सौदी अरब आणि कुवेत हे दोन देश निधी पुरवत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला. तसेच इसिसला जॉर्डन, सीरिया आणि सौदी अरेबियामधून देखील मोठे फंडींग होत असल्याचे अमेरिकेतल्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन’ या संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. शिवाय इसिसने उत्तर सीरियामधल्या तेल विहिरींवर ताबा मिळवल्याने त्याच्या विक्रीतून या संघटनेच्या तिजोरीत भर पडते आहे.
 २०१४ मध्ये इसिसने आक्रमक रूप धारण करून त्याने आपले सैन्य इराकमध्ये घुसवले, अन् आपले मुख्यालय इराकमधीलच राक्का येथे उभारले. याकाळात अमेरिकेने आखाती देशातील लक्ष जवळपास पूर्ण काढून घेतले होते. अमेरिका शेल्फ तंत्रज्ञानामुळे तेल उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागल्याने त्यांना आता ओपेकच्या तालावर नाचावे लागणार नव्हते, त्यामुळेच की काय ओबामा प्रशासनाने अफगाणिस्तानपासूनचे आपले सर्व सैन्य बाहेर काढले. अन् ठिकठिकाणच्या छळछावणीत बंदी असेल्या सैनिकांना मुक्त केले.
 मुक्त झालेल्या आणि अमेरिकन छळाला संतापलेल्या अनेकांनी इसिसचा आश्रय घेतला. इब्राहिम दुरी हा सद्दामचा ज्येष्ठ अधिकारी बगदादीला सामिल झाला. यातून इसिसने मोठमोठ्या हल्ल्यांना सुरूवात केली. परदेशी पर्यटक, पत्रकार यांची जाहीर कत्तल सुरू केली. अन् विशेष म्हणजे, ही कत्तल करताना हा सर्वप्रकार व्हिडीओ रेकॉर्ड करून प्रसारीत करण्यात येऊ लागला.
 २००१ मध्ये ओसामाने वाढवलेला अबु मुसाब अल झरकावी हा मुल्ला इराकमधे सक्रीय होता. तो देखील बगदादीला येऊन मिळाला. त्यांचा शियांवर मोठा राग होता. शिया हे काफीर आहेत, नास्तिक आहेत अशी त्याची धारणा होती. यातून त्याने इराक आणि सिरीया या दोन्ही देशांमधील शियांची कत्तल करण्यास सुरूवात केली. शिया मशिदी, शिया वस्त्यांवर आत्मघाती हल्ले करणे, अगदी एकट्या शियालाही गाठून मारणे आदी उद्योग सर्रास सुरू होते. अशाप्रकारे बगदादीला एकेक माणसे मिळत गेली.  अन् नंतर जिहादासाठी हीच माणसे जगभर पसरली जाऊ लागली. याला आत दक्षिण अफ्रिकेतील बोको हराम सारखी क्रुर संघटना देखील येऊन मिळू लागल्या आहेत.

अमेरिकेने तेलाच्या राजकारणासाठी सुरू केलेला अखाती देशातील इस्लामी टोळ्यांचा वापर. त्यातून स्थानिकांचा चालवलेला छळ यामुळेच इसिसचे पिल्लावळ जन्माला आले आणि आता ते वयात आले आहे. वयात आलेल्या मुलाचे तरुणपणातील उपद्रव मुल्य दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातूनच तो अमेरिकेच्या दोस्त राष्ट्र असणार्‍या फ्रान्सला लक्ष केले आहे. जानेवारीमधील पॅरिसमधीलच शार्लि हाब्दो वरील हाल्ल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दुसर्‍यांदा हल्ला करून हे सिद्ध केले आहे. आता या उपद्रवी पिल्लावळाचे वाढते पंख लवकरात लवकर छाटण्याची वेळ आली आहे.