Thursday 25 November 2021

यशवंतराव चव्हाण ते... की हे...!


काल महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर ही यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीच्या पोस्टचा पाऊस पडल्याचे दिसून येत होते. पण त्यात एक गोष्ट खटकणारी होती. कारण, हल्लीच्या पीढिला यशवंतराव चव्हाणांचा परिचयच नसल्याचे दिसून आले. अगदी मी-मी म्हणणारे पत्रकारितेतल्या व्यक्तींना देखील यशवंतराव चव्हाणांची साधी तोंड ओळख देखील नसावी, हे फारच अश्चर्याचे म्हणावे लागेल.

कारण, अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहताना जो फोटो पोस्ट केला होता. तो खरं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्मित केलेला, आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला, 'यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची' या चित्रपटात स्वर्गीय यशवंतरावांची भूमिका साकारणाऱ्या अशोक लोखंडे यांचाच फोटो पोस्ट करुन आदरांजली वाहिली होती. आणि स्वर्गीय यशवंतरावांबद्दलच्या आपल्या सहृद भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे या पोस्ट पाहताना महाराष्ट्राचे शिल्पकाराचा परिचय आजच्या पीढिला नसावा, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, "जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही. जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल; तर प्रथम तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करावा लागेल." पण यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टरांचे हे वाक्य खरंच गांभीर्याने कधी घेतलं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. की केवळ थोर महापुरुषांचे फोटो आणि त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथी साजरी केली म्हणजे, आपले इस्पित साध्य झाले म्हणायचे.  

खरंतर ब्रिटीश काळापासून आपल्याला एक शापच लागलेला आहे. लॉर्ड मॅकलेने आपली भारतीय शिक्षण पद्धती मोडित काढून, पाश्चिमात्य शिक्षण पद्धती अंमलात आणली. इंग्रजी शिक्षण घेणे म्हणजे वाघिणीचे दूध पिण्यासाराखे आहे, असे विचार भारतीय जनमानसावर बिंबवून आपली गुरुकुल शिक्षण पद्धती अक्षरश: मोडित काढली. मॅकलेच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे नीट संज्ञापन होण्याऐवजी, वरवरचे शिक्षण देऊन मार्क कसे मिळवायचे, यावरच भर देण्यात आला. त्यामुळे आपल्याकडे शिक्षणाऐवजी, चांगले मार्क घेऊन नोकरीच्या बाजारात उतरणारी एक फॅक्टरी निर्माण झाली. 

अन् याच फॅक्टरीतून तयार होऊन, सॉरी शिक्षित होऊन बाहेर पडलेली आजची पीढि आपल्या इतिहासाला साफ विसरत चालली आहे. त्यामुळे आपले महापुरुष कोण? त्यांनी समाजासाठी काय आणि कोणत्या प्रमाणात बलिदान दिले. हे देखील आपण साफ विसरुन चाललो आहोत. 

आजच्या पीढिला आपल्या महापुरुषांचा मातृभाषेत लिहिलेला इतिहास पचनी पडत नाही. उलट तोच इतिहास मोड-तोड करुन दिला असेल, तर तो नव्या पीढिला लगेच अॅक्सेप्ट होतो. 

दुसरीकडून चित्रपटातून जो इतिहास रंजक पद्धतीने मांडला असतो, तोच खरा आहे म्हणून आजची पीढि मार्गक्रमण करत आहे. अन् त्या चित्रपटात महापुरुषांची व्यक्तीरेखा साकारणारे कलाकारच आपल्याला खरे महापुरुष वाटत आहेत. त्यामुळेच आजच्या पीढिला खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे.

 केवळ रट्टा मारुन, पाठांतर करुन परिक्षेत मार्क नक्कीच मिळतील. पण त्यातून महापुरुष समजणार नाहीत. त्यामुळे 'वाचाल तर वाचाल', नाहीतर सर्वनाश निश्चित आहे.

Thursday 18 November 2021

उडता पंजाब ते उडता महाराष्ट्र...



काही वर्षांपूर्वी शाहीद कपूर, करिना कपूर, आलिया भट अशी तगडी स्टारकास्ट असलेला उडता पंजाब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून पंजाबमधील अमली पदार्थ सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य करण्यात आले होते. अन् अकाली दल सरकारला एकप्रकारे टार्गेट करण्यात आले. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थाचा मुद्दा अतिशय कळीचा बनला होता. या मुद्द्याने जनमानस ढवळून निघाले होते. त्यामुळे परिणाम अपेक्षितच झाला, अन् अकाली दलाचे सरकार गेले. अन् कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आले. त्यानंतर या अमली पदार्थाचे पुढे काय झालं? म्हणजे नव्या राज्य सरकारला अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या उद्योगाला चाप बसला का? माहित नाही.

पण आज महाराष्ट्रातही तशीच स्थिती निर्माण होत आहे. आधी मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्या घरी २०० किलो गांजा सापडल्याने एनसीबीकडून अटक, अन् आठ महिने तुरुंगवास, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्स पार्टी प्रकरण, आणि आता एनसीपीने नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त केल्याचं प्रकरण,  किंवा काल-परवा कोल्हापूरमधील एका फार्महाऊसवरुन ३८ किलो एमडी ड्रग्स जप्त होण्याचे प्रकरण असो;  या सगळ्यातून महाराष्ट्र हा आमली पदार्थांचा सुपरस्टॉक्सिस्ट होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.

नांदेड मध्ये पकडण्यात आलेलं ११२७ किलोच्या गांजाच्या प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणात ३० वर्षांपूर्वी म्हशींचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गृहस्थाची गेल्या १० वर्षात झालेली प्रगती अनेकांना अचंबित करणारी आहे. विशेष म्हणजे नांदेड प्रकरणातील जळगाव जिल्ह्यातील एक पोलीस पाटील ही अडकणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे कोल्हापूरमधील फार्महाऊसवरुन जप्त करण्यात आलेल्या ३८ किलो एमडी ड्रग्स प्रकरणी केअर टेकर ताब्यात घेण्यात आला आहे. तर यातील मुख्य आरोपी एक वकील असून, तो आता फरार झाला आहे.

तिकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केजमधील पोलीस एका गोदामावर छापा टाकायला गेले. तिथे गुटख्याचा अवैध साठा सापडला. त्यामुळे तो जप्त करणार, तितक्यात तिथे उपस्थित कोणीतरी एका व्यक्तीला फोन करतो, तोे व्यक्ती समोरुन सांगतो की, "पोलिसांना सांग, हा खांडेचा (शिवसेना जिल्हाप्रमुखाचा) गुटखा आहे. तुम्ही इथून निघून जा!" यानंतर पोलिसांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्राला एकीकडे व्यसनाधीनतेपासून मुक्त ठेवण्याची राज्यकर्त्यांकडून अपेक्षा असताना, राज्यकर्त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच जर अशा पद्धतीत बोलत असतील, तर त्याला जबाबदार कोण?

त्यामुळे हे सगळं एवढं दिवसागणिक भीषण होत आहे की, महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेने सुरु आहे? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. आता यात एक एक मासे गळाला लागत असल्याने, या प्रकरणाची धग कुठे पर्यंत जाईल, हे आताच सांगणे अवघड असले, तरी उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला आहे का? असे विचारण्याची वेळ आली आहे.