Friday 10 June 2022

संघटन शरण चंद्रकांतदादा!


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघाच्या शिस्तीत तयार झालेलं हे व्यक्तीमत्त्व. आपल्या आयुष्यातील ६३ वर्षे पूर्ण करताना, संघटन शरण कसं असावं, हे त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळतं. कारण, रा. स्व. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला जशी शिकवण असते, त्या शिकवणीवरच आधारित दादांची आजपर्यंतची वाटचाल राहिलेली आहे. त्यामुळे संघटनेलाच सर्वस्व मानून, संघटना सांगेल, ते करणं हे दादांचं जीवनसार राहिलेलं आहे.

त्यामुळे दादांनाही कधी एखाद्या पत्रकाराने संघटनेबाबतच्या कोणत्याही निर्णयाबाबत विचारलं, तर दादा तात्काळ म्हणतात. आम्ही संघाच्या शिस्तीत तयार झालो आहोत. त्यामुळे संघटना माझ्या पाकिटावर जो पत्ता लिहिल, त्या पत्त्यावर जायचं आणि पडेल ते काम करायचं. त्यांच्या या उत्तरातून ते संघटनेप्रती किती समर्पित आहेत, याचा सहज प्रत्यय येतो.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना, दादांना स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. दादांसाठी हा सहवास म्हणजे परिसस्पर्शच होता. कारण, स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांच्यामुळे दादांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. एका गिरणी कामगाराचा मुलगा संघटनेच्या बळावर किती मोठा हेऊ शकतो, हे दादांकडे पाहिल्यावर समजते.

त्यामुळे दादा या दोन्ही महाद्वयींना गुरुस्थानीच मानतात. त्यामुळे त्यांना कधीही या दोन्ही महाविभूतींबद्दल विचारलं तर ते म्हणतात की, माझे गुरु यशवंतराव केळकर आणि बाळसाहेब आपटे यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यांनी मला एक शिकवण नेहमी दिली ती म्हणजे तुला एक खोली दिली आहे. ती खोली स्वच्छ कशी ठेवायची जबाबदारी तुझ्याकडे आहे. त्यामुळे तू दुसऱ्याच्या खोलीत काय चाललंय ते पाहू नको. तुला दिलंय ते काम तू कर.दादांवरील याच संस्कारामुळे संघटनेनेही त्यांच्याकडे जे-जे दायित्व सोपवते, ते-ते अतिशय समर्थपणे आणि यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मग ते अभाविपचं राष्ट्रीय संघटनमंत्री पद असो किंवा आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद. या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय लिलया सांभाळल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील दादांनी कुठून निवडणूक लढवायची? हा विषय चर्चेला आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांनी दादांनी कोथरुडमधूनच निवडणूक लढवावं हे निश्चित केलं होतं. विधानसभा निवडणुकीसाठीची पक्ष कार्यकारिणीचीही बैठक झाली, तेव्हा त्या बैठकीतही दादांनी माननीय मोदीजी आणि अमित भाईंना पुण्याऐवजी कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची संधी द्या! अशी विनंती केली. पण मोदीजी आणि अमित भाईंनी निर्णय दिला होता. त्यामुळे नेत्याची इच्छा ही आज्ञा प्रमाण मानून दादांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आणि निवडणूक लढून विजयी झाले.

कोथरुड मतदारसंघातूनही निवडून आल्यानंतरही त्यांनी स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांची शिकवण कृतीत उतरवण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणूक निकालानंतर काहीच महिन्यात कोविड महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढावले. सगळेच या महामारीसमोर हातबल झाले होते.

याकाळात भारतीय जनता पक्षाने सेवा हेच संघटनचा नारा दिला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपा कामाला लागला. आपल्य कोथरुड मतदारसंघातील एकही व्यक्ती कोविडच्या काळात दोनवेळचं जेवण मिळालं नाही, म्हणून उपाशी राहायला, असं होऊ नये, यासाठी दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था यांसह अनेक उपक्रम राबविले. त्यात मग कोविडबाधितांसाठी मोफत वैद्यकीय सल्लासह औषधोपचार असो किंवा कोविड केअर सेंटर असो, किंवा कोविड नंतर सुरु केलेले फिरते पुस्तक घर, मोफत फिरता दवाखाना, वस्ती भागाच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीनची व्यवस्था, एक ना अनेक उपक्रम सुरु केले. यामध्ये आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला ज्याप्रमाणे काहीही कमी पडू नये, यासाठी घरचा कर्तापुरुष धडपडत असतो. अगदी तशीच तळमळ दादांची कोथरुडकरांप्रती राहिलेली आहे. यामुळे कोथरुडकर देखील आज दादांच्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान बाळगतात.

आज त्यांचा वाढदिवस. पण हा वाढदिवस देखील लोकसेवेचं माध्यम मानून साजरा करण्याचा ध्यास, त्यांचा दरवर्षी असतो. यात गेल्या वर्षी त्यांनी घरेलू कामगारांचे मोफत लसीकरण आणि रिक्षाचालकांना एक हजार रुपये किमतीचे मोफत सीएनजी कुपनचे वाटप केले होते. याचा कोथरुडमधील आर्थिकदृष्ट्या कामगारांनीही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यंदाही रिक्षाचालक, पेपर वितरक, दूध वितरक घरकाम करणाऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

यातून त्यांचे सेवा हेच समर्पण ही वृत्ती प्रतित होते. संघाच्या संस्कारामुळेच ते समाज सेवेसाठी सर्वस्व अर्पण करुन काम करत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतायुष्य लाभो हीच प्रार्थना!