Wednesday 20 July 2016

झाकीर नाईकच्या निमित्ताने...


बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या झाकीर नाईक अनेक इस्लामिक जिहादी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला असल्याचे समोर आले. जगभरातील अनेक तरुण झाकीर नाईकची भाषणे ऐकूनच कट्टरवादाकडे वळत आहेत, हे अनेक दहशतवाद्यांनी जाहीर ठिकाणी लिहल्याने झाकीरसह अन्य मंडळींचे धाबे दणाणले. ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेल्या रोहान इम्तियाज आणि निब्रास इस्लाम यांनीही आपण झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित असल्याचे सांगितले. यातल्या रोहान इम्तियाजने तर आपल्या फेसबुक पेजवर नाईकच्या भाषणानेच आपण याकडे वळल्याचे म्हटल्याने अनेकांची गोची झाली. या प्रकाराने जगात शरियत लागू करण्याच्या नावावर ही मंडळी तरुणांची माथी कशी भडकवतायत हे सर्वांसमोर आले.

ढाक्यातील हल्ल्यानंतर स्वत: धर्माने मुस्लीम असलेल्या आणि एक विचारवंत म्हणून गणल्या जाणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी इस्लामला शांततेचा धर्म समजू नका, असे जाहीर मत मांडून इस्लामच्या प्रस्थापित धर्म पंडितांविरोधात उभा डाव मांडला. जगभरात होणारे दहशतवादी हल्ले आणि त्यामागचे कर्ते करविते धनी हे इस्लामिक विचारवंत असल्याचे समोर येत असल्याने या धार्मिक संस्थांची गोची होऊ लागली. झाकिर नाईक प्रकरणावरूनही हेच पाहायला मिळाले. नाईकच्या कथित धर्म प्रसारामुळे दार-उल-उलूमला थेट आपल्याच जातभाईविरोधात फतवा काढावा लागला. अन नंतर हे प्रकरण अंगाशी येऊ लागल्याने त्यावर सारवासारव करावी लागली. विशेष म्हणजे, यात धर्मगुरू आणि विचारवंतांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. झाकीरच्या समर्थनार्थ सुन्नींचा गट उभा राहीला. तर त्याच्या दुसऱ्याबाजूला शिया धर्मगुरूंनी नाईक विरोधात दंड थोपाटले. मुस्लीम लॉ बोर्डाचे मौलाना खालिद रशीद फरंगी यांनी नाईकला या प्रकरणात गोवण्याचं षडयंत्रच रचलं जात असल्याचा आरोप करून झाकीर नाईकला क्लिन चीट दिली. तर ऑल इंडिया शिया पर्सनल ला बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी झाकिर नाईकवर थेट हल्ला चढवत, त्याचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्याची मागणी केली. त्यामुळे आखाती देशातील शिया विरूद्ध सुन्नी वादाचे वारे आता इतर देशातही वाहू लागले आहेत.

शितयुद्धानंतर आखाती देशात शिया-सुन्नींमधील वादामुळे अनेक हिंसक दहशतवादी संघटना उदयास आल्या. यात मग ओसामची अल कायदा असेल, किंवा मुल्ला ओमरची तालिबान, आणि आताचा इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी. हे सारेच सुन्नी आणि त्यातच कोणत्या ना कोणत्या मदरशाचे मुल्ला-मौलवी. या साऱ्यांनीच शितयुद्धाच्या काळात शियांना चोपून काढले. सौदीच्या राजाश्रयावर पोसलेल्या या तिघांनीही अक्षरश: शिय्यांसोबतच इस्मायली अहमदी आदी आपल्याच जात भाईंचे शिरकाण केले. ढाक्यातही जो हल्ला झाला त्यावेळीही कुराणातील आयत येत नसलेल्या मुस्लिमांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे सध्या जगभरातून शिय्यांना जीव मुठीत धरून आपल्याच देशातून परागंदा व्हावे लागत आहे.

इस्लाम धर्मात कुराणाला सर्वात पवित्र ग्रंथ मानले जातो. पण याच ग्रंथाच्या आयतीचा सोईचा अर्थ लावून तरुणांची माथी भडकवण्याचे काम हे कथित धर्मगुरू करत आहेत. जगभरात शरियत लागू करण्यासाठी जिहाद केला तर जन्नत नसिब होते, हे या धर्मगुरूंचे सांगणे असते. पण खरंच असे होते का हे मुस्लीम धर्माच्याच अभ्यासकांनी मुस्लीम समाजासमोर आणण्याची गरज आहे. वास्तविक, कुराणातील ६,६६६ आयतींपैकी १०००० आयत या वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेली आहेत. पण या वैज्ञानिक रूपाचे दर्शनच तरुणांना घडवलेच जात नाही, अन मग आयतीचा सोईसकर अर्थ लावून तरुणांना दहशतवादाच्या खाईत ठकलले जाते.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जमियत उल हदिसचे सदस्य आणि बंगळुरूच्या दार-उल-इरफात-वल-इरशादचे मिराज शेख रब्बानी हे मौलवी जिहाद कसा करायचा याचे धडे तरुणांना देत होते. यात इस्लाम धर्म वाढवण्यासाठी जर तुम्हाला मृत्यू जरी आला, तरी तुम्हाला जन्नत नसिब होईल, असे हे साहेब सांगत होते. विशेष म्हणजे, ज्यांच्या मनात इस्लामसाठी जिहाद करणे नसेल तो, मुनाफीक (दुतोंडी) आहे असेदेखील हे ठासून सांगत होते. यांची अनेक विखारी भाषणे सोशल मीडियावर आजही उपलब्ध आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्या माध्यमातून काही इस्लामिक धर्मप्रसारक समाजात अशांतता पसरवण्यासाठी कुराणाचा सोईस्कर अर्थ लावून जगात अशांतता पसरवण्याचे प्रकार सुरु असतात. त्याला शह देण्यासाठी इस्लामच्या खऱ्या अभ्यासकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.