Sunday 13 May 2018

कुणालाही माहिती नसलेला ‘मध्यान्ह’?


पेशवाई... हा शब्द कानी पडला की, अनेकांच्या मनात पेशवाईबद्दल वेगवेगळ्या कल्पना येतात. त्या चांगल्या असण्यापेक्षा वाईटच जास्त असतात. पेशवाई म्हणजे ब्राह्मणांची मक्तेदारी, पेशवाई म्हणजे बाजीराव पेशव- मस्तानीची प्रेम कथा, चा माकरुन हत्या करण्यात आलेले माधवराव पेशवे, रघोबादादा, आनंदीबाई अशा एक ना अनेक व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण पेशवाईचा काळ कुणी अभ्यासलाय का? विशेष म्हणजे, माधवराव पेशव्यांच्या हत्येनंतरचा पेशवाईचा काळ कसा होता? असा प्रश्न जरी कुणाला विचारले, तर त्याचे उत्तर अनेकांना माहिती नसते. पण तरीही आपापल्या मनातील दुराग्रह, ऐकीव माहिती या आधारे पेशवाईच्या नावे बोटं मोडली जातात. ज्या प्रमाणे, जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा पूर्वार्धाबाबत कुणालाही माहिती नसते, पण त्याच्या उत्तरार्धामुळे हिटलरवर टीका होते, तसाच काहीसा हा प्रकार, (वास्तविक, हिटलर आणि पेशवाईची तुलना होऊच शकत नाही. पण दोन काळातील साधर्म दाखवण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे.) असो!

तर सांगायचा मुद्दा हा की, पेशवाईचा पूर्वार्ध अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे, तसाच याच्या उत्तरार्धापूर्वीचा मधला भाग जास्त महत्त्वाचा आणि रोमहार्षक आहे. आणि हा रोमहार्षक इतिहास ज्यांना जाणून घ्यायचा असेल, तर हरी नारायण आपटे यांची 'मध्यान्ह ही कादंबरी वाचकांनी वाचलीच पाहिजे. कारण, या कादंबरीमध्ये माधवराव पेशवे यांच्या हत्येपासून काय-काय घडामोडी घडल्या, याचं रसभरित विवेचन केलं आहे. हे विवेचन वाचताना वाचकदेखील पुस्तक वाचनात गुंतून जातो. कारण आपटेंनी ज्या प्रकारे या काळातील वर्णनं लिहिली आहेत, त्यातून वाचकांच्या मनाला पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची उत्कंठा लागून राहते.

मी देखील हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली, त्यावेळी पेशवाईच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध इतका इंट्रेस्टिंग असेल अशी कल्पना केली नव्हती. कारण, आजपर्यंत पेशवाईबद्दल जेवढं वाचलं होतं, ते एकतर पूर्वार्धाबाबत आणि ब्रिटिशांनी पेशवाईची गादी कशी मिळवली इतकच माहिती होतं. फार-फार तर नाना फडणीस यांच्याबद्दल घाशीराम कोतवाल नाटकामुळे माहिती होतं.

पण नाना फडणीस या व्यक्तीनेच मराठी साम्राज्याची इभ्रत कशा प्रकारे सांभाळली हे जाणून, त्या व्यक्तीमत्त्वाबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कारण, या एका व्यक्तीने मराठी साम्राज्याची इभ्रत राखण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा समर्थपणे मुकाबला केला. या मुत्सद्दी कारभाऱ्यामुळेच ब्रिटिशांना मराठी साम्राज्य मिळवता आले नाही, तसेच, टिपू सारख्या जुलमी सुलतानाला सळो की पळो करुन सोडले होते.

नाना फडणीसांची दूरदृष्टी इतकी मोठी होती की, त्यामुळे ब्रिटिशांनीच हे मान्य केलं होतं की, हा मुत्सद्दी जोपर्यंत मराठी साम्राज्याचे रक्षण करतोय, तोपर्यंत ब्रिटिशच काय इतर कोणालाही मराठी साम्राज्याच्या सिंहासनाला हात घालता येणार नाही. असा हा लौकिक माझ्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कुणाला मिळाला असेल, तर नाना फडणीस यांनाच मिळालेला असेल.

पण दुर्दैव हे की, या मुत्सद्याला बाह्य आघाड्या सांभळण्यापेक्षा, अतंर्गत आघाड्यांवरच जास्त काळ खेळावे लागले. कारण, आनंदीबाईसारख्या पाताळयंत्री बाईने पेशवाईची वस्त्रे पुन्हा मिळवण्यासाठी जी काही कटकारस्थाने रचली, ती उधळून लावण्यातच नाना फडणीस यांचा वेळ गेला. मग, ते सवाई माधवराव पेशवे गर्भात असताना, त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी नेमलेली बाई असेल, किंवा सवाई माधवराव पेशव्यांना छंदिष्ठ बनवणारा नागूभट असेल, या साऱ्यांना पूरुन उरण्यासाठीच नाना फडणीस यांना आपली राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावावी लागली. हे एवढं सगळं करुनही सवाई माधवराव पेशवे आपल्या छंदिष्ट पणामुळे म्हणा, किंवा बालिशपणामुळे म्हणा, या धोरणी माणसाची तळमळ समजू शकले नाहीत. अन् त्यातूनच ते या मुत्सद्याबद्दल नेहमी आढी धरुन होते. हे वाचताना अतिशय वाईट वाटते.

मराठी साम्राज्याची इभ्रत सांभाळण्यासाठी जो तन-मनाने सर्वस्व अर्पण करुन काम करतो, त्याच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच आली आहे. ही जशी उपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला आली, तशीच उपेक्षा नाना फडणीस यांच्या वाट्याला आली. या धोरणी माणसांबाबतची होणारी उपेक्षा कधी दूर होणार हाच यक्ष प्रश्न आहे.