Monday 3 October 2022

पैसा झाला मोठा...


गेल्या काही दिवसांत उत्तम पुस्तक वाचनात आलं नव्हतं. त्यामुळे थोडं अस्वस्थ वाटायचं. पण अतुल कहाते यांचे पैसा हे पुस्तक हाती पडल, आणि ही अस्वस्थता काहीप्रमाणात कमी झाली. पैसा हे दोन शब्द खरंतर आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विना पैसा आपल्याला कोणीही विचारत नाही. ज्याचा जितका मोठा बँक बँलेस, तेवढी त्याला समाजात प्रतिष्ठा! हे आज एक समीकरण झाल आहे. पण हा पैसा नक्की जन्माला आला तरी कसा? आणि त्याचा विकास संपूर्ण जगभरात कशापद्धतीने झाला याचा अतिशय रंजक इतिहास अतुल कहाते यांनी आपाल्या पैसा या पुस्तकातून मांडलेला आहे.

खरंतर मानवाच्या उत्क्रांतीनंतर तो जेव्हा वस्ती करुन राहू लागला; तेव्हा त्याला वस्तूंच्या देवाण-घेवाणीची सवय लागली. आणि या देवाण-घेवाणीसाठी मानवाने एक पद्धत वापरण्यास सुरुवात केली. त्या पद्धतीलाच आपण barter system’ म्हणजेच वस्तू विनिमय प्रणाली असे ओळखतो. या प्रणालीमध्ये मानवाच्या आवश्यकतेनुसार, आपल्याकडे जास्त असणारे धान्य, वस्तू, अवजारं आदी गोष्टी, ज्यांना पाहिजेत, त्यांना देऊन त्यांच्याकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू मिळवणे, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य. या बार्टर सिस्टिमच्या काळातील किस्से आज आपण जेव्हा या पुस्तकातून वाचतो. तेव्हा कुणाचाही विश्वास बसणार नाही. कारण, आपल्याला कुणी सांगितलं की, पूर्वीच्या नोकरदार वर्गाला मीठाच्या स्वरुपात त्याचा मोबदला दिला जात होता. तर कुणीही म्हणेल काय येड्यात काढता का?”

पण बार्टर सिस्टिमच्या काळातच चीन, उत्तर आफ्रिका आणि इतर काही ठिकाणी चलन म्हणून मीठ वापरलं जात होतं. रोमन सैनिकांनाही त्यांच्या कामाचा मोबदला हा मीठाच्या स्वरुपातच दिला जायचा. सुदानमध्येही घोडे, कपडे, गुलाम हे सर्व मिठाच्या स्वरुपात दिलं जायचं. एका गुलामाची किंमत ही त्या गुलामाच्या पायाच्या आकाराएवढं मीठ इतकं ठरवलं जाई. त्यातूनच salary म्हणजेच आपल्या मराठी भाषेतील पगार ही संकल्पना अस्तित्वात आली.  

मानवाचा जसजसा विकास होत गेला, तसतशी वस्तू विनिमयाची ही पद्धत लोप पावली म्हणा, किंवा कालबाह्य झाली. याचे प्रमुख कारण एकतर आपल्याकडील वस्तू, जर दुसऱ्याला गरज नसेल, तर आपल्याला हवी असलेली वस्तू कशी मिळवायची किंवा वस्तूंची देवाण-घेवाण करताना त्याचे प्रमाणबद्धता कशी ठरवायची या आणि अशा विविध अडचणींमुळे वस्तू विनिमयाची ही पद्धत एक प्रकारे मोडित निघाली. पण जेव्हा माणसाला धातूचा शोध लागला, त्यानंतर वस्तू विनिमयासाठी चलन संकल्पना आकाराला येऊ लागली. धातूच्या शोधामध्ये जिथं सोनं मिळेल, तिथं सोनं, जिथं चांदी मिळेल तिथं चांदी, जिथं लोखंड मिळेल, तिथे लोखंड अशा स्वरुपात हे चलन वापरलं जाई. काही ठिकाणी तर सोन्यापेक्षा चांदीला अधिक महत्वाचं मानलं जाई. त्यामुळे सोन्यापेक्षा चांदीला भाव जास्त होता.

इ.स.पू. २०० च्या जवळपास वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी चलनाचा वापर सुरु झाला.  इ.स.पू. ६४० ते ६३० या काळामध्ये लिडीयामध्ये (आताच्या पश्चिमी अनातोलिया, सालिहली, मनीसा, तुर्की) छोटंसं साम्राज्य अस्तित्वात होतं. त्या साम्राज्यात प्रथमच नाण्यांचा वापर करण्यात आला.

त्यानंतर ही नाणी ग्रीक शहरांमध्ये आणि सिसिली व इटली आदी भागात पसरली. तर कागदी चलन ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये अस्तित्वात आली. या सर्वांचाही विकास अतिशय रंजक आणि रोमहर्षक म्हणावा लागेल. कारण, याकाळात चलन म्हणून वापरण्यात आलेल्या नाण्यांचा विकास हा काही ठिकाणी क्रूर, रंक्तरंजित होता.

आपल्या भारताच्या बाबतीत सांगायचं झालं, तर चालुक्य राजाच्या काळापासून (इ.स. ५००) होन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या नाण्यांचा वापर होत होता. पण नंतर पुतळी नावाचं नाणंही अस्तित्वात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन नाण्यांबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई नावाचं नाणं नक्की करुन घेऊन, ते चलनात आणलं. या नाण्याच्या एका बाजूला तीन उभ्या ओळींमध्ये श्री राजा शिव अशा मजकूर असे. तर नाण्याच्या मागे दोन उभ्या ओळींमधेये छत्रपती असं कोरलेलं असायचं.

६ जून १६७४ साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेक सोहाळ्याला ब्रिटीश हजर होते. या ब्रिटिशांनी शिवाजी राजांकडे जी मागणी केली, ती वाचून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण, ब्रिटिशांनी चक्क शिवाजी महाराजांना ब्रिटिशांनी चलनात आणलेल्या नाण्यांचा वापर, आपल्या हिंदवी साम्राज्यात करावा असा प्रस्ताव ठेवला होता. महाराज हे अतिशय दूरदर्शी असल्याने त्यांनी ब्रिटिशांचा प्रस्ताव फेटाळून लावत, त्यांच्या त्या प्रस्तावाचा योग्य त्या शब्दांत समाचार घेतला. ब्रिटिश हे आपल्या या कृतीतून एकप्रकारे महाराजांनी अथक परिश्रमांनी उभारलेल्या हिंदवी साम्राज्यावर पकड आजमावू पाहात होते.

पण दुर्देवाने १८३५ मध्ये ब्रिटिशांनी भारतावर आपली पकड मजबूत केली, आणि त्यांनी शिवकालीन सर्व नाणी मोडिक काढून रुपया हे चलन अस्तित्वात आणलं. अन् हाच रुपया आज आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन झालं आहे. या रुपयाशिवाय आज आपलं पानही हालत नाही, अशी स्थिती आहे. या रुपयाचा जन्मापर्यंतची कथा वाचताना आपण त्या काळात जातो, हे या पुस्तकाचं यश मानलं पाहिजे. आज आपण २१ व्या शतकात असलो, तरी या रुपयाच्या जन्मापर्यंतचा इतिहास सर्वांनी वाचलाच पाहिजे.