Saturday 28 October 2017

सावधान..! दैत्य जागा होतोय


गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातून एका पाठोपाठ एक अशा दोन मोठ्या बातम्या आल्या. पहिली 20 अॉक्टोबरला, तर दुसरी 21 अॉक्टोबर रोजी. 20 अॉक्टोबरच्या बातमीत अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील मशिदीत एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिलं. यात 56 जणांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं घेतली. तर 21 अॉक्टोबरच्या बातमीत एका मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला झाला. या गेटवरील 15 कँडेट्सचा मृत्यू झाला. या हल्ल्या पाठिमागे तालिबान्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत होता. या दोन्ही बातम्या वाचल्यानंतर अफगाणिस्तानात आयसिस आणि तालिबान्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु असल्याचं वाटत होतं. त्यातच 25 अॉक्टोबरला उत्तर अफगाणिस्तानात आयसिस आणि तालिबान्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात दोन्हीकडचे 23 दहशतवादी मारले गेले. या बातमीनं अफगाणिस्तानात वर्चस्वाची लढाई चांगलीच पेटलीय याला पाठबळ मिळालं.

पण हा संघर्ष आत्ताच का दिसून येतोय की या पाठिमागेही काही कटकारस्थाने आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. यावरच सीएनएन आणि बीबीसी यांनी या संघर्षाचे चांगलं रसभरीत वर्णनं वाचायला मिळाली. बीबीसीनं सांगितलंय की, हा संघर्ष काही आत्ताचा नाही, तर 2015 पासून सुरु झाला. अन् या पाठिमागे दोन महासत्तांचा हात आहे.

कारण एकतर दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेनं आपली तेलाची तहान भागवण्यासाठी, आणि सौदी राजांनी आपले शौक पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे दहशतवादाच्या दैत्याला जन्म दिला. आणि कशा प्रकारे अमेरिकेच्या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांचं पालनपोषण केलं. याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. त्याच धर्तीवर आता आयसिसला रशिया आणि इराणकडून छुपं पाठबळ मिळत आहे.

कारण एकतर आयसिसनं आखाती देशातील तेल विहिरींवर कब्जा मिळवलाच आहे. त्यामुळे शेल तंत्रज्ञानावर फुशारक्या मारणारी अमेरिका, तेलासाठी काही प्रमाणात अजूनही आखातावर अवलंबून आहे. पण आयसिसने या तेलविहिरींवरच डल्ला मारल्यानं अमेरिकेची कोंडी झाली आहे.

दुसरीकडे तेलाच्या पैशांवर आय्याशी पूर्ण करणार्या सौदीमधील तेल विहिरींवर आयसिसचा डोळा आहे. त्यातून आयसिसच्या दैत्यांनी आपलं जिहादी अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सौदीचे तालिबानी अस्त्र निकामी करण्यासाठी आयसिसने उत्तर अफगाणिस्तानात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

आता या प्रकरणाची दुसरी बाजू अशी की, अमेरिका आणि रशिया यांची एकमेकाला पाण्यात पाहण्याची वृत्ती अजूनही कायम आहे. शीतयुद्धाच्या काळात तालिबान आणि अल कायदाच्या जोरावर अमेरिकेनं रशियाला आखातात फिरकू दिले नव्हते. त्याचे उट्टे काढण्याची संधी रशियाला आयसिसच्या रुपाने मिळाली आहे. आयसिसने आखातातील तेल विहिरींवरच कब्जा केल्याने, रशियाकडून आयसिसला रसद पुरवली जात आसल्याचा आरोप होतो आहे.

दुसरीकडे सौदी आणि इराणमधील शिय्या-सुन्नी वाद काही नवीन नाही. सुन्नी बहुल सौदी अरेबियाच्या विरोधात जो कुणी उभा राहिल, त्याला पाठबळ देण्यास शिय्याबहुल इराण सदैव तयार असते. शिवाय, आयसिसचा जन्मच इराण, इराक, सीरिया या भागात झालेला आहे. त्यामुळे आसिसच्या सौदीवरील जिहादी चढाईसाठी छुपी रसद पुरवण्याचं काम इराणचे राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खोमेनींकडून होत आहे. त्याची लिटमस्ट टेस्ट अफगाणिस्तानात सुरु आहे. कारण, ज्या तालिबान्यांच्या जोरावर सौदी राजांनी आपले शौक आणि अमेरिकेने आपली तेलाची तहान भागवली, इतर देशांना आपल्या तालावर नाचवलं,  त्या तालिबान्यांना ठेचण्यासाठीच आयसिसला  अफगाणिस्तानात हल्ले करण्यास छुपं प्रोत्साहन मिळत आहे.

त्यातूनच तालिबानी आणि आयसीसमध्ये चकमकी सुरु आहेत. अन् आयसिसला आवळण्याच्या नावावर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अमेरिकेकडून उत्तर अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले करुन आयसिसची तळी उद्धवस्त केली जात आहेत.

या सर्व घटनांचा भारतावर थेट परिणाम होत नसला तरी याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. कारण एकेकाळी तत्कालीन सोव्हिएत संघ, पाकिस्तान, इराण आणि अमेरिका या देशातले मोठे भिडू होते. पण आज नाटो, यूरोपीयन संघातील सदस्य देश, चीन भारत आणि रशिया हे मोठे खेळाडू आहेत.भारताची अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तान आणि गनी सरकारमध्ये कुरबुरी सुरु आहेत. तेव्हा पाकिस्तानची मानसिकता पाहता, आयसिसशी हातमिळवणी करुन, अफगाणिस्तानातील भारताच्या गुंतवणूक प्रकल्पांना नख लावण्याचे उद्योग होऊ शकतात. त्यामुळे मोदी सरकारला त्या दृष्टीने ही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.