Sunday 13 May 2018

कुणालाही माहिती नसलेला ‘मध्यान्ह’?


पेशवाई... हा शब्द कानी पडला की, अनेकांच्या मनात पेशवाईबद्दल वेगवेगळ्या कल्पना येतात. त्या चांगल्या असण्यापेक्षा वाईटच जास्त असतात. पेशवाई म्हणजे ब्राह्मणांची मक्तेदारी, पेशवाई म्हणजे बाजीराव पेशव- मस्तानीची प्रेम कथा, चा माकरुन हत्या करण्यात आलेले माधवराव पेशवे, रघोबादादा, आनंदीबाई अशा एक ना अनेक व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण पेशवाईचा काळ कुणी अभ्यासलाय का? विशेष म्हणजे, माधवराव पेशव्यांच्या हत्येनंतरचा पेशवाईचा काळ कसा होता? असा प्रश्न जरी कुणाला विचारले, तर त्याचे उत्तर अनेकांना माहिती नसते. पण तरीही आपापल्या मनातील दुराग्रह, ऐकीव माहिती या आधारे पेशवाईच्या नावे बोटं मोडली जातात. ज्या प्रमाणे, जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा पूर्वार्धाबाबत कुणालाही माहिती नसते, पण त्याच्या उत्तरार्धामुळे हिटलरवर टीका होते, तसाच काहीसा हा प्रकार, (वास्तविक, हिटलर आणि पेशवाईची तुलना होऊच शकत नाही. पण दोन काळातील साधर्म दाखवण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे.) असो!

तर सांगायचा मुद्दा हा की, पेशवाईचा पूर्वार्ध अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे, तसाच याच्या उत्तरार्धापूर्वीचा मधला भाग जास्त महत्त्वाचा आणि रोमहार्षक आहे. आणि हा रोमहार्षक इतिहास ज्यांना जाणून घ्यायचा असेल, तर हरी नारायण आपटे यांची 'मध्यान्ह ही कादंबरी वाचकांनी वाचलीच पाहिजे. कारण, या कादंबरीमध्ये माधवराव पेशवे यांच्या हत्येपासून काय-काय घडामोडी घडल्या, याचं रसभरित विवेचन केलं आहे. हे विवेचन वाचताना वाचकदेखील पुस्तक वाचनात गुंतून जातो. कारण आपटेंनी ज्या प्रकारे या काळातील वर्णनं लिहिली आहेत, त्यातून वाचकांच्या मनाला पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची उत्कंठा लागून राहते.

मी देखील हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली, त्यावेळी पेशवाईच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध इतका इंट्रेस्टिंग असेल अशी कल्पना केली नव्हती. कारण, आजपर्यंत पेशवाईबद्दल जेवढं वाचलं होतं, ते एकतर पूर्वार्धाबाबत आणि ब्रिटिशांनी पेशवाईची गादी कशी मिळवली इतकच माहिती होतं. फार-फार तर नाना फडणीस यांच्याबद्दल घाशीराम कोतवाल नाटकामुळे माहिती होतं.

पण नाना फडणीस या व्यक्तीनेच मराठी साम्राज्याची इभ्रत कशा प्रकारे सांभाळली हे जाणून, त्या व्यक्तीमत्त्वाबद्दल अजून जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कारण, या एका व्यक्तीने मराठी साम्राज्याची इभ्रत राखण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा समर्थपणे मुकाबला केला. या मुत्सद्दी कारभाऱ्यामुळेच ब्रिटिशांना मराठी साम्राज्य मिळवता आले नाही, तसेच, टिपू सारख्या जुलमी सुलतानाला सळो की पळो करुन सोडले होते.

नाना फडणीसांची दूरदृष्टी इतकी मोठी होती की, त्यामुळे ब्रिटिशांनीच हे मान्य केलं होतं की, हा मुत्सद्दी जोपर्यंत मराठी साम्राज्याचे रक्षण करतोय, तोपर्यंत ब्रिटिशच काय इतर कोणालाही मराठी साम्राज्याच्या सिंहासनाला हात घालता येणार नाही. असा हा लौकिक माझ्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कुणाला मिळाला असेल, तर नाना फडणीस यांनाच मिळालेला असेल.

पण दुर्दैव हे की, या मुत्सद्याला बाह्य आघाड्या सांभळण्यापेक्षा, अतंर्गत आघाड्यांवरच जास्त काळ खेळावे लागले. कारण, आनंदीबाईसारख्या पाताळयंत्री बाईने पेशवाईची वस्त्रे पुन्हा मिळवण्यासाठी जी काही कटकारस्थाने रचली, ती उधळून लावण्यातच नाना फडणीस यांचा वेळ गेला. मग, ते सवाई माधवराव पेशवे गर्भात असताना, त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी नेमलेली बाई असेल, किंवा सवाई माधवराव पेशव्यांना छंदिष्ठ बनवणारा नागूभट असेल, या साऱ्यांना पूरुन उरण्यासाठीच नाना फडणीस यांना आपली राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावावी लागली. हे एवढं सगळं करुनही सवाई माधवराव पेशवे आपल्या छंदिष्ट पणामुळे म्हणा, किंवा बालिशपणामुळे म्हणा, या धोरणी माणसाची तळमळ समजू शकले नाहीत. अन् त्यातूनच ते या मुत्सद्याबद्दल नेहमी आढी धरुन होते. हे वाचताना अतिशय वाईट वाटते.

मराठी साम्राज्याची इभ्रत सांभाळण्यासाठी जो तन-मनाने सर्वस्व अर्पण करुन काम करतो, त्याच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच आली आहे. ही जशी उपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला आली, तशीच उपेक्षा नाना फडणीस यांच्या वाट्याला आली. या धोरणी माणसांबाबतची होणारी उपेक्षा कधी दूर होणार हाच यक्ष प्रश्न आहे.

Friday 23 March 2018

डोहाळे पुरवा.. साहेबांचे डोहाळे पुरवा..!


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महाराष्ट्राचे जाणते राजे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार २०१९ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. वास्तविक पवार साहेबांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असण्याची ही तशी काही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा पवार साहेबांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत राहिलं आहे. पण यंदा जरा चित्र वेगळंच आहे. कारण, सध्या मोदीविरोधासाठी देशातले सर्वच विरोधक एकवटले आहेत. त्यातच मोदींनी आपल्या बारामती दौऱ्यात पवार साहेबांचा उल्लेख गुरु म्हणून केल्यामुळे गुरु विरुद्ध चेला अशा चर्चा रंगताना दिसत आहे.
तसं पाहिलं तर, पवार साहेबांचीही पंतप्रधान होण्याची सुप्त महत्त्वकांक्षा काही लपून राहिलेली नाही. गेल्या अनेक निवडणुकीपूर्वी ते त्यांच्या कार्यकर्ते, किंवा काही पक्षनेत्यांच्या माध्यमातून लाँबिंगही करुन पाहिले. त्यासाठी आपल्या मनीची ही सूप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष देव पाण्यात ठेवून पाहिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून त्यांचा आता देवावर विश्वास नसावा. असो...!

पण मनसे अध्यक्ष राज साहेबांच्या महामुलाखतीनंतर या चर्चेला पुन्हा उधाण आला आहे. कारण, या मुलाखतीत त्यांनी राज साहेबांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राला घडवायचं असेल, तर दिल्ली हातात असली पाहिजे असं वक्तव्यं केलं होतं. म्हणजे कितीही झालं तरी पंतप्रधान पदासाठी आपली वर्णी लागली पाहिजे, असा यामागचा गर्भीत अर्थ होता. म्हणून तर या मुलाखतीनंतर त्यांनी आपली पंतप्रधान पदी वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. त्यामध्ये त्यांनी जातीवरुन हिणवलेल्या राजू शेट्टींना जवळ केलं. राज ठाकरेंकडून गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मोदी मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं वदवून घेतलं, सोनियांच्या डिनर डिप्लोमसीनंतर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्लीतल्या पवारांच्या घरी जाऊन खलबतं केली. या सर्वांमधून पवार साहेब किती मुरब्बी आहेत, हे दिसून येत होतं. त्यातून आता सोशल मीडियातून पवार साहेब २०१९ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांचे हे डोहाळे यंदा तरी पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून काही.

कारण, त्यासाठी त्यांनी जी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात सर्वजण एकजात मोदीविरोधक आहेत. आणि तसं पाहिलं तर एका व्यक्तीच्या विरोधातलं कडबोळ्याचं सरकार चालवण्यात पवार साहेबांचा हातखंडा आहे. १९७८ साली पुलोद सरकारच्या काळात महाराष्ट्राने तो अनुभवलाही आहे. पण हे सरकारही फक्त दोन वर्षच काम करु शकले. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे पवार साहेबांना काय पाच वर्ष सुखासुखी मुख्यमंत्रीपद उपभोगता आले नाही.
साहेबांचं पुलोदचं सरकार म्हणजे एक प्रकारे काँग्रेसच्याच वळचणीतले नेते असलेले, पण काँग्रेस विरोधी सरकार होते. या सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक दबदबा काँग्रेसी नेत्यांचा राहिला. तरुण तडफदार असलेल्या पवार साहेबांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याने त्यांनी हे इंदिराविरोधी कडबोळ्याचे सरकार स्थापन केले. पण काहीकाळातच त्यांना पायउतार व्हावं लागलं. आणि यानंतर १९८० मध्ये काँग्रेसचे ए.आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. यानंतर पवार साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सलग दहा वर्ष तिष्ठत बसावं लागलं. पण जेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली, तेव्हा ज्या काँग्रेसवर नाराज असलेल्यांना एकत्रित करुन १९७८ मध्ये पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं, त्याच काँग्रेसने त्यांना दहा वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री बनवलं.

आजही तशीच काहीशी स्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधींच्या काँग्रेसमधील एकाधिकारशाहीला विरोध होता, म्हणून महाराष्ट्रात पुलोद सरकारची स्थापना झाली. तर आज मोदींच्या एकाधिकारशाहीला विरोध असल्याने, एनडीएतल्या घटक पक्षांसह सर्वजण एकत्रित येत आहेत. त्यासाठीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित बोलावून डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार हे येणारा काळच ठरवेल. कारण, एकतर देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसला सत्तेसाठी इतर कोणत्या पक्षातील नेत्याचे नेतृत्व कितपत मान्य होईल हा एक प्रश्न आहे. शिवाय, केंद्रात असे कडबोळ्याचे सरकार चालवताना कितपत अडचणीचे असते, हे आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या काळात, आणि त्यानंतर १९८९ च्या व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात संपूर्ण देशाने अनुभवले आहे.
आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनता सरकारमध्ये अनेक पक्ष आणि त्यांची स्वतंत्र भूमिका मान्य करताना मोरारजींचीही दमछाक होत होती. तर १९८९ च्या व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात ओम प्रकाश चौटाला आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंग यांनी व्ही.पी.सिंग यांना ते सरकार नीट चालू दिले नाही. त्यामुळे त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने कडबोळ्यांच्या सरकारला सत्तेतून खाली खेचलं. आणि त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांनी देशाची सूत्रं हाती घेतली. १९९१ पासून ते आजपर्यंत देशात तिसऱ्या आघाडीचा वारंवार प्रयत्न झाला. पण जनतेने तो नाकारला.

आज मोदी मुक्त भारत करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जाणते राजे प्रचंड आशावादी नजरेनं पंतप्रधान पदाकडे पाहात आहेत. त्यांची ही सुप्त इच्छा आगामी काळात पूर्ण होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. तो पर्यंत पवारसाहेबांचे डोहाळ जेवण यशस्वी होवो ही इच्छा..!

Tuesday 13 February 2018

आधी संघ समजून घ्या!


 रविवारी सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मुजफ्फरपूरमध्ये एक वक्तव्य केलं. पण त्यांच्या एका वक्तव्यानंतरजणू त्यांनी घोर पापच केलंय, असा काहीसा गजहब माजवला जात होता. तसेच यावर त्यांनी देशातील जवानांची माफी मागितली पाहिजेअशी मागणी विरोधकांनी लावून धरली. यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते तर राजधानी दिल्लीतमोहनजींच्या विरोधात घोषणा देऊ लागले. आणि त्यात कहर म्हणजेपक्षाचे शीर्ष नेतृत्व. त्यांच्याबद्दल काय बोलणार. कारण ज्या व्यक्तीला मोहनजींचं पूर्ण नाव देखील व्यवस्थित घेता येत नव्हतं. (कारण काल ते माध्यमांना प्रतिक्रिया देतांना मोहन भागवत ऐवजी मोहन भगवत बोलत होते) असे हे साहेब मोहनजींनी जवानांचा आपमान केला. त्यामुळे त्यांनी आणि रा. स्व. संघाने माफी मागितलीच पाहिजे,अशी मागणी केली.

विशेष म्हणजे, काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन हे देखील साधूपणाचा आव आणत होते. संघाने देशासाठी काय केलं याचा पुरावा द्याअसं भाजप प्रवक्ते माधव भांडारींना उद्देशून बोलत होते. त्याला भांडारींनी योग्य उत्तर दिलं खरं. पण ज्या मुद्द्यावरून विरोधक पराचा कावळा करत होतेत्यावर त्यांनी कधी संघ समजून घेतलाय काहेच त्यांना विचारायला पाहिजे.

कारणदेशाला जेव्हा-जेव्हा गरज पडली,तेव्हा संघ स्वतःहुन पुढे आला. मग ते1962 चं युद्ध असो, किंवा त्सुनामीचं संकट. प्रत्येक वेळी संघाने कोणतीही अपेक्षा न ठेवता पुढं येऊन काम केलंय. काश्मीर विलय प्रक्रियेवेळी देखील,गोळवलकर गुरुजींच्या आदेशानुसार संघाचे स्वयंसेवक भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून पाकड्यांशी लढले.1962 च्या भारत-चीन युद्धात ही सैन्याच्या मदतीसाठी संघानेच धाव घेतली. जखमी सैनिकांसाठी 3000 छावण्या उभारुन त्यांच्यावर उपचार केले. त्याशिवाय, लष्करातील जवानांना युद्धात लागणारी रसद वेळोवेळी पोहचवली. युद्धजन्य परिस्थितीत स्वतःच्या जिवाची जराही परवा त्यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी केली नाही. जर युद्धात शत्रू सैन्याची गोळी लागून मृत्यू झालातर त्याची दखल देशात घेतली जाणार नाही,हे माहीती असताना स्वयंसेवकांनी ते केलं. त्यामुळेच नेहमी संघाचा दुस्वास करणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं संघाला निमंत्रण दिलं.

त्सुनामी संकटावेळीही संघानेच मदत कार्यासाठी पुढाकार घेतला. त्सुनामीमध्ये ज्यांचा जीव गेलात्या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासही पुढे येत नव्हतं,अशावेळी संघ स्वयंसेवकांनीच पुढाकार घेत, सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. एवढंच कशाला मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावेळी देखील अनेक स्वयंसेवक मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते. अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील. त्यामुळे संघावर टीका करण्यापूर्वी संघाचं काम आणि त्यांची क्षमता सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजेत.

वास्तविक, संघ स्वयंसेवकांना ही ऊर्जा शाखा आणि दरवर्षी होणाऱ्या संघ शिक्षावर्गातून मिळते. संघाचे चार वर्ग तालुका स्तरावरुन ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजित केले जातात. या चारही वर्गातून स्वयंसेवकाची मानसिक आणि शारीरिक तयारी करुन घेतली जाते. ही तयारी करतानाही त्यासाठीचं पोषक वातावरण तयार केलं जातं. मोकळ्या वातावरणात,सात दिवसाचं प्राथमिक, 20-20 दिवसाचं प्राथमिक आणि द्वितीय, तर 25 दिवसांचं तृतीय संघा शिक्षा वर्ग, या चारही संघ शिक्षा वर्गातून स्वयंसेवकांना घडवलं जातं. आणि स्वयंसेवक घडवण्याचं काम हे आज सुरु झालं नाही, तर संघाच्या स्थापनेपासून सुरु झालंय.

1925 रोजी डॉक्टर हेडगेवारांनीच संघ शिक्षा वर्गाची सुरुवात केली. त्यांना स्वयंसेवकांना लष्करी पद्धतीचं शिक्षण द्यायचं होतं. पण यातली शास्त्रोक्त माहिती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला दर रविवारी ते लष्करातील मित्रांना बोलवून, लष्करी शिस्तीचं शिक्षण स्वयंसेवकांना देत होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात संघाचा गणवेश लष्करी गणवेशाचा अंतर्भाव होता. संपूर्ण खाकी गणवेशइंग्रजी आज्ञाक्रॉस बेल्टखांद्यावर आर.एस.एस.चे बिल्ले असं तेव्हा गणवेशाचं स्वरुप होतं.

जून 1927 रोजी संघ विस्ताराच्या हेतूने डॉक्टरांनी नागपुरातीलच मोहिते वाडा इथं40 दिवसाचं शिबीर भरवलं. या शिबिरात अनेक स्वयंसेवक सहभागी होते. त्यांना लष्करातील शिक्षणासह इतर काही गोष्टी शिकवण्यात आल्या. पण यात शिस्त हा महत्त्वाचा विषय होता. बौद्धिक वर्गासह शारिरीक कसरतीलाठी-काठी आदीचं शिक्षण दिलं गेलं. पूर्वी याला ओ.टी.सी. म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प किंवा अधिकारी शिक्षण वर्ग म्हटलं जायचं. याच क्रमातून पुढे जाऊन दहा दिवसाचं आय.टी.सी. म्हणजे इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कॅम्प सुरु झालं. सध्या यातीलच एक आठवडा चालणाऱ्या वर्गाला प्राथमिक शिक्षा वर्गम्हटलं जातं.


तालुकास्तरावरुन सुरु झालेली ही संघ शिक्षा वर्गाची मालिका संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात येऊन थांबते. ज्या स्वयंसेवकांनी संघाचे प्राथमिक, प्रथम आणि द्वितीय शिक्षा वर्ग पूर्ण केले आहेत. त्या सर्व स्वयंसेवकांचं नागपुरात एकत्रिकरण होतं. जवळपास 30 दिवस देशाच्या विविध भागातले आलेले स्वयंसेवक एकत्र राहतात. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची मित्रत्वाची बंधुत्वाची भावना निर्माण झालेली असते. तृतीय वर्गातील संघ शिक्षा वर्गात केवळ स्वयंसेवकच नव्हे, तर संघाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी ही सहभागी होतात. त्या अधिकाऱ्यांना जवळून भेटण्याची संधी मिळाल्याने, स्वयंसेवकांचे मानसिक मनोबल उंचावले असते. या सर्व अधिकाऱ्यांचे अनुभव, काम करण्याची तळमळ, यातून स्वयंसेवक भारावून जातात. आणि तेही असेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतात. अन् यातूनच संघ प्रचारक तयार होतात. हे प्रचारक देशाच्या विविध भागात जाऊन कठीण प्रसंगातही राहुन तरुणांना संघटीत करण्याचं काम करतात.


संघाचं हेच काम गेली 90 वर्षे अविरतपणे सुरु आहे. या सर्वांची एकच भावना असते, आणि ती म्हणजे "परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं". याच भावनेने संघाचे स्वयंसेवक काम करत असल्यानेसंघ कार्य दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉ. हेडगेवारांनी आपल्या पाच सहकार्यांसोबत सुरु केलेलं कामआज संपूर्ण जगात विस्तारलेलं आहे. आणि भविष्यातही ते वाढतच राहिल. त्यामुळे संघावर टीका करणाऱ्यांनी संघाचे काम, त्याची कार्यपद्धती समजून घेतली पाहिजे.

Saturday 10 February 2018

संविधानाच्या मंदिरात पाकचा जयजयकार का सहन करायचा?

काल जम्मू-काश्मिरच्या विधानसभेत नँशनल कॉन्फरन्सचे आमदार मोहम्मद अकबर यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले. विशेष म्हणजे, त्यांच्या या घोषणाबाजी नंतर आपली भूमिका कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत, 'ते आपलं वैयक्तिक मत असून, त्याला कुणाचाही आक्षेप नसल्याचं" म्हटलं.

विशेष म्हणजे, आपण ज्या देशात राहतो, त्या देशाचं संरक्षण करणार्या जवानांच्या कँम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असताना, त्याचा निषेध करण्याऐवजी हे महाशय पाकिस्तानचा जयजयकार करण्यात धन्यता मानतात. आणि हिच लोकं जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवून त्यांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करतात.

ज्या पक्षाने या महाशयांना निवडणुकीचं तिकीट देऊन विधानसभेत पाठवलं, त्या पक्षाचे प्रवक्ते या घटनेवरुन सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. नँशनल कॉन्फरन्सने जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांताला नाकारल्याचं ते सांगत आहेत. तर मग असं असेल, तर शेख अब्दुल्लांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरचं भिजत घोंगड का ठेवलं. का त्यावेळी काश्मीरचं संपूर्ण विलनीकरण होऊ दिलं नाही? जर त्यावेळी विलिनीकरणच्या प्रक्रियेत शेख अब्दुल्लांनी खोडा घातला नसता, तर आज काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनला नसता. आणि त्यावर अधिकार सांगण्याची पाकड्यांची पण हिंमत झाली नसती.

दरम्यान, या घटनेपूर्वी काही दिवस आधी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणार्यांना तुरुंगवास व्हावा, यासाठी कायदा करा अशी मागणी लोकसभेत केली. त्यांची ही मागणी एकार्थाने योग्यच होती. पण दुसरीकडे एखादा लोकप्रतिनिधीच संविधानाच्या मंदिरातच 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारेे देत असताना कसं सहन करायचं.

कारण, जसं ओवेसींच्या म्हणण्यानुसार भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणार्यांना तुरुंगवास व्हावा, ही मागणी योग्य आहे. तर लोकप्रतिनिधींनी लोकशाहीच्या मंदिरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्यांवर काय कारवाई केली पाहिजे? हे देखील त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.

Thursday 4 January 2018

तरुणाईची वाटचाल पुन्हा 'मंडल' आंदोलनाच्या दिशेने?

गुजरातच्या निवडणूक निकालानंतर काही दिवसांपूर्वी एका मित्राने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, आणि जिग्नेश मेवाणींनी धुरळा उडवल्याचं म्हटलं होतं. त्यातून त्याला मोदींचं नाक कसं कापलं? गेलं हे दाखवायचं होतं. पण त्याला उत्तर देताना मी म्हटलं की, याला धुरळा उडवणं नाही, तर देशाला जाती-धर्मात तोडणं म्हणतात. पण त्याला माझं हे मत विनोदी वाटलं. वास्तविक, इथं माझा उद्देश मोदीचं समर्थन करण्याचा नव्हता, तर देशात जातीपातीचं राजकारण कसं जोर पकडतंय हे सांगण्याचा होता. पण त्यावरुन त्याची आरग्यूमेंट सुरु झाली. स्वतःची भूमिका पुढे रेटण्यासाठी एक-ना-अनेक दाखले देत होता. हे सर्व वाचून मला त्याच्या आकलनाची किव करावी वाटली. कारण केवळ त्याच्या मनात फक्त एकच होतं. ते म्हणजे मोदी द्वेष. हा द्वेष इतका ठासून भरलेला होता की, त्याला काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं.


वास्तविक आजच्या तरुणाईला शालेय जीवनातील प्रतिज्ञेचा 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' याचाच विसर पडलेला आहे. त्यामुळेच आजची तरुणाई राजकीयदृष्ट्या दिशाहीन झालेली आहे. राजकारणासाठी तरुणांचं नेतृत्व विकासापेक्षा जातीला महत्त्व देत आहे. आणि त्यांच्या मागून सगळीच भरकटत आहेत. त्यामुळे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणार्यांना आजची तरुण पिढी नेता मानू लागली आहे.


2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून संपूर्ण देश मोदींच्या पाठीमागे उभा होता. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे वाटलं होतं की, देश आता जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देऊन, विकासाला प्राधान्य देईल. पण 2014 नंतरची परिस्थिती पाहिली, तर फार वाईट वाटते. आज संपूर्ण देश पुन्हा जातीपातीच्या खाईतलोटला जातोय. अन् त्यात तरुणाई अग्रेसर आहे, हे वास्तव आहे.

त्यामुळे आजची स्थिती पाहिली तर 90 च्या दशकातली व्ही.पी सिंग सरकारच्या 'मंडल कमिशन'ची पुनरावृत्ती होईल का? अशी भीती वाटू लागली आहे. कारण त्या काळात या जातीपातीच्या राजकारणापाईच अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यात दिल्ली विद्यापीठाचा एस.एस चौहानने स्वतःला पेटवून घेतले. तर त्याच आगीत राजीव गोस्वामी हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाजला. 14 वर्षांचा त्रास सहन केल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण देशभरात सवर्ण विरुद्ध दलित असा संघर्ष इरेला पेटला. आजही त्याच मार्गावर देशाची वाटचाल सुरु आहे.


आज जातीपातीच्या घाणेरड्या राजकारणातून हार्दिक, अल्पेश, जिग्नेश, कन्हैय्या सारखी तथाकथित तरुण नेते स्वतःला राजकारणात लॉन्च करत आहेत. कन्सट्रक्टिव्ह राजकारणापेक्षा डिस्ट्रक्टिव्ह राजकारणावरच त्यांचा भर आहे. आणि आजच्या तरुणाईला त्यांची हिच डिस्ट्रक्टिव्ह राजकारणाची भूमिका आवडत आहे. हे देशाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे याचा फायदा काही 'जाणते' नेते आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे, पण आदिवासी  बांधवांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन, त्यांच्या हातात शस्त्र देणारे नक्षलवादी संघटनांशी संबंधित संघटना घेत आहेत.


स्वामी विवेकानंदांनी तरुणांनी ध्येय साध्य करण्यासाठी संघटीत होण्याचा मंत्र दिला होता. पण आजचा तरुण विकासाच्या मुद्द्यावर संघटीत होऊन, देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी अग्रेसर होण्याचं ध्येय साध्य करण्यापेक्षा, जातीसाठी संघटीत होत आहेत. प्रत्येकजण दुसर्या जातीचा दुस्वास करत आहे. आणि हे असंच सुरु राहिलं, तर देशाची पुन्हा फाळणी होईल. तेव्हा मात्र ही फाळणी आधीच्या फाळणीसारखी रक्तरंजित असेल, यात शंका नाही.