Thursday 17 February 2022

RIP ऐवजी ॐ शांती


नुकतेच गानसम्राज्ञी लता दीदि आणि प्रसिद्ध संगितकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. बॉलिवूडसह प्रत्येक देशवासियांनी लता दीदि आणि बप्पीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सोशल मीडियावरही श्रद्धांजलीच्या अनेक पोस्ट आल्या. पण हे करताना एक बदल ठळकपणे अधोरेखित होत होता. तो म्हणजे, अनेकांनी RIP ऐवजी ॐ शांती वापरले होते. हा बदल भारतीयांसाठी फारच सकारात्मक म्हटला पाहिजे.

कारण, आपल्याकडे कोणाचेही निधन झाले की, RIP म्हणजेच Rest in Peace (शांततेत विश्रांती घ्या!) हा शब्द प्रयोग वापरण्याची पद्धत रुढ झाली होती. पण तो वापरणे कितपत योग्य याबद्दल अनेक मतप्रवाह दिसून येत होते. पुरोगामी मंडळी याचे समर्थन करताना दिसत होती. तर राष्ट्रवादी, भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते RIP चा विरोध करत होते. ते RIP ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे यावर व्यक्त होताना अनेकांना प्रश्न पडायचा. पण आता यातून परदेशातच, विशेष करुन ज्यांनी हा शब्द वापरण्याची सवय लावली त्या ख्रिश्चनांमध्येही याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळे याचा खोलात जाऊन आपणही विचार करण्याची गरज आहे.

वास्तविक, RIP म्हणजे Rest in Peace हा मूळ लॅटिन शब्द आहे. Requiescat in permanens या शब्दापासून RIP ची निर्मिती झाली. ख्रिश्चनांमधील अँग्लिकन, लूथरन, मेथोडिस्ट आणि कॅथेलिक प्रार्थनेत या शब्दाचा वापर केला जातो. याचा अर्थ जेव्हा विश्वाचा अंत होईल, त्यावेळी तुझ्या पाप-पुण्याचा हिशेब केला जाईल, तोपर्यंत तू इथेच शांतपणे विश्रांती घे!”

आता याबद्दल अजून जाणून घेऊया. कारण या RIP चा इतिहास ही अतिशय रोमांचक आहे. पाचव्या शतकात हा शब्द काही प्रमाणात कबरवर लिहिला जात असे. पण कालांतराने ख्रिश्चन संप्रदायांमध्ये हा शब्द कबरवर लिहिण्याची प्रथाच रुढ झाली. त्यानंतर रोमन काळात कॅथलिक प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थनेसाठी सर्रास वापरला जाऊ लागला.

दरम्यान, १७ व्या शतकात यूकेमध्ये कॅथेलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि ऑरेंज ऑर्डरची निर्मिती झाली. यूकेमधील प्रोटेस्टंटांचे समूळ उच्चाटन करणे, हे आपल्या जीवनाचे इति कर्तव्यच असल्याची भावना कॅथेलिकांमध्ये निर्माण झाल्याने ते प्रोटेस्टंटचा दुस्वास करु लागले.

त्यातच २०१७ साली उत्तर आयर्लंडमध्ये ऑरेंज ऑर्डरच्या सदस्यांनी प्रोटेस्टंटना RIP हा शब्द वापरण्यास बंदी घातली. यानंतर प्रोटेस्टंटांमधील एका गटाने ऑरेंज ऑर्डरच्या निर्णयाचे स्वागत केले. तर दुसरा गट आजही विरोध करताना दिसत आहे.

प्रोटेस्टंटांमधीलच इवांजेलिकल प्रोटेस्टंटांनी RIP च्या वापरास बंदीला मान्यता दिली आहे. इवांजेलिकल प्रोटेस्टंट सोसायटीच्या सचिव वालेस थॉम्पसन यांनी बीबीसी रेडिओच्या टॉकबॅक कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, RIP ही मृतांसाठी प्रार्थना करताना वापरले जाते. आणि बायबलच्या सिद्धांताच्या हे विरोधात असल्याने, आम्ही रेस्ट इन पीस शब्दाचा वापर न करण्यास सर्वांना प्रोत्साहित करु. त्यासोबतच थॉम्पसन यांनी आपल्या फेसबुक वॉलवरुनही पोस्ट लिहून RIP शब्दाचा वापर थांबवण्यासाठी आवाहन केले.

तर दुसरीकडे प्रेस्बिटेरियन चर्चचे माजी मॉडरेटर डॉ. केन नेवेल यांनी थॉम्पसन यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. प्रेस्बिटेरियन केन नेवेल यांच्या मते, जेव्हा लोक सोशल मीडियावर रेस्ट इन पीस शब्द वापरतात, तेव्हा ते एकप्रकारे स्मरण आणि शुभेच्छा देत असतात.आजही या वादाला पूर्णविराम मिळालेला नाही.

दुसरीकडे भारतीय विशेष करुन हिंदू संस्कृतीत मानवी शरिर नश्वर असून, आत्मा अमर असल्याची धारणा आहे. त्यामुळे हिंदू धर्मात मृत व्यक्तीला मुखाग्नी दिला जातो. मुखाग्नीनंतर त्याचे शरीर पंचत्वातविलीन झाले, असे म्हटले जाते. कारण, श्रीमत भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील २३ व्या श्लोकानुसार,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

अर्थात आत्म्याला ना शस्त्रांनी कापता येते, ना अग्नीने जाळता येते, ना पाण्याने भिजवता येते, ना वाऱ्याने वाळवता येते.त्यामुळे हिंदू संस्कृतीत नश्वर शरिराला आग्नीला समर्पित केलं जातं. त्यामुळे एखाद्याच्या निधनानंतर रेस्ट इन पीसच्या ऐवजी ॐ शांती वापरण्याचा आग्रह धरला जातो.

त्याचा परिणाम आता दिसत आहे. लता दीदि आणि बप्पीदांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सेलिब्रेटींकडून ट्विट करण्यात आले, त्यात अनेकांकडून ॐ शांती हाच शब्द प्रयोग करण्यात आला. त्यामुळे आता हा मतप्रवाह एकार्थाने रुढ होताना दिसत आहे. अजय देवगन, अक्षय कुमारसह अनेक नेटकऱ्यांनी रेस्ट इन पीस ऐवजी ॐ शांती हाच शब्दप्रयोग वापरला आहे. त्यामुळे नव्या पीढिच्या अनुषंगाने ही आपल्या सर्वांसाठी सकारात्मक बाब आहे, असेच म्हणावे लागेल.