Tuesday 22 March 2022

काश्मीर फाईल्स- डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का देणारा चित्रपट


दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. पण काहींना या चित्रपटामुळे पोटशूळ उठला आहे. त्यामुळे थेट टिका करण्याऐवजी; ते पडद्याआडून टिका करत आहेत. वास्तविक, या चित्रपटामुळे डाव्यांच्या इकोसिस्टिमला जोरदार धक्का दिला आहे.

कारण, ज्या पद्धतीने डाव्यांचा गढ मानल्या जाणाऱ्या जेएनयूमधून त्यांची मोडस ऑपरेंटी सिस्टिमद्वारे निष्पाप तरुणांचा ब्रेन वॉश करुन, त्यांना देशविरोधी कारवायांमध्ये अडकवले जाते. त्यावर जोरदार आघात या चित्रपटातून केला आहे. अन् यात पल्लवी जोशीने साकारलेल्या राधिका मेननच्या पात्रामुळे डावी मंडळी प्राध्यापिकेचा बुराखा पांघरुन, कशापद्धतीने तरुणांना मिसगाईड करतात, अन् आपला अजेंडा पुढे रेटतात हे अतिशय समर्पकपणे दाखवले आहे. त्यामुळेच अनेकांना यावर पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे.

दोन दिवसापूर्वीच्या सकाळच्या पूरवणीमध्येही श्रीराम पवार यांच्यासारख्या ज्य़ेष्ठ पत्रकारांचा एक लेख छापून आला आहे, त्यातून ही मळमळ अतिशय स्वच्छपणे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी व्ही.पी.सिंह सरकारचा दाखला देऊन अटलबिहारी वाजपेयी यांनी आवाज का उठवला नाही, वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले.

वास्तविक, श्रीराम पवार काय किंवा स्वरा भास्कर काय एकाच माळेचे मणी. कारण, जर या चित्रपटातून तत्कालिन काश्मिरमधील विदारक स्थिती जशी आहे, तशी दाखवली नसती, आणि नेहमीप्रमाणे मुळमुळीत दाखवली असती, तर त्यांनीच हा चित्रपट कसा चांगला आहे? हे ओरडून ओरडून सांगितले असते. पण या चित्रपटातून डाव्यांच्या इकोसिस्टिमलाच जोरदार धक्का लागल्याने, ते आपली मळमळ या-ना-त्या प्रकारे व्यक्त करत आहेत. असो...

मी पत्रकारिता शिकत असताना गोवा फिल्म फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या राक्षसीवृत्तीवर आधारित चित्रपट पाहिला होता. त्याचे नाव आज आठवत नाही. पण त्यातील काही दृष्ये आठवतात. कारण, चित्रपटाची धाटणी देखील अशीच होती.

ज्या मुस्लिम महिला तालिबान्यांचे कायदे पाळत नाहीत, त्यांचाही असाच शेवट केला जात होता. जसा दि कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शेवटच्या भागात कश्मिरी पंडित महिलेला मारल्याचं दाखवले आहे. त्यावेळी तिथले अनेक विश्लेषकांनी या चित्रपटाचे कौतुक केलं होतं.

पण असंच वास्तव, जेव्हा आपल्याकडे दाखवलं जाते, त्यावेळी ते एकांगी वाटतं. कारण, का तर यातून एखादा ठराविक वर्गाची इको सिस्टिम डळमळीत होणार असते. त्यामुळे यापूर्वी विवेक अग्निहोत्रीचाच ताशकंद फाईल्स या चित्रपटाबाबत देखील असाच वाद उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी तर चित्रपट रिलीज करु नये, यासाठी विवेक अग्निहोत्रीला धमकावले ही जात होते. पण तरीही हा चित्रपट रिलीज झालाच. अन् लालबहाद्दूर शास्त्रीजींचा मृत्यूचे गुढ नव्या पीढिला समजले.

भविष्यातही असे अनेक चित्रपट येतील, त्यातही जर डाव्यांच्या इकोसिस्टिमला धक्का लागणार असेल, तर त्याबाबत वाद निर्माण केला जातोच जातो. पण त्यामुळे सत्य काही लपत नाही, हे मात्र नक्की!