Friday 23 March 2018

डोहाळे पुरवा.. साहेबांचे डोहाळे पुरवा..!


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महाराष्ट्राचे जाणते राजे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार २०१९ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. वास्तविक पवार साहेबांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असण्याची ही तशी काही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा पवार साहेबांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत राहिलं आहे. पण यंदा जरा चित्र वेगळंच आहे. कारण, सध्या मोदीविरोधासाठी देशातले सर्वच विरोधक एकवटले आहेत. त्यातच मोदींनी आपल्या बारामती दौऱ्यात पवार साहेबांचा उल्लेख गुरु म्हणून केल्यामुळे गुरु विरुद्ध चेला अशा चर्चा रंगताना दिसत आहे.
तसं पाहिलं तर, पवार साहेबांचीही पंतप्रधान होण्याची सुप्त महत्त्वकांक्षा काही लपून राहिलेली नाही. गेल्या अनेक निवडणुकीपूर्वी ते त्यांच्या कार्यकर्ते, किंवा काही पक्षनेत्यांच्या माध्यमातून लाँबिंगही करुन पाहिले. त्यासाठी आपल्या मनीची ही सूप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष देव पाण्यात ठेवून पाहिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून त्यांचा आता देवावर विश्वास नसावा. असो...!

पण मनसे अध्यक्ष राज साहेबांच्या महामुलाखतीनंतर या चर्चेला पुन्हा उधाण आला आहे. कारण, या मुलाखतीत त्यांनी राज साहेबांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राला घडवायचं असेल, तर दिल्ली हातात असली पाहिजे असं वक्तव्यं केलं होतं. म्हणजे कितीही झालं तरी पंतप्रधान पदासाठी आपली वर्णी लागली पाहिजे, असा यामागचा गर्भीत अर्थ होता. म्हणून तर या मुलाखतीनंतर त्यांनी आपली पंतप्रधान पदी वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. त्यामध्ये त्यांनी जातीवरुन हिणवलेल्या राजू शेट्टींना जवळ केलं. राज ठाकरेंकडून गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मोदी मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं वदवून घेतलं, सोनियांच्या डिनर डिप्लोमसीनंतर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्लीतल्या पवारांच्या घरी जाऊन खलबतं केली. या सर्वांमधून पवार साहेब किती मुरब्बी आहेत, हे दिसून येत होतं. त्यातून आता सोशल मीडियातून पवार साहेब २०१९ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांचे हे डोहाळे यंदा तरी पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून काही.

कारण, त्यासाठी त्यांनी जी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात सर्वजण एकजात मोदीविरोधक आहेत. आणि तसं पाहिलं तर एका व्यक्तीच्या विरोधातलं कडबोळ्याचं सरकार चालवण्यात पवार साहेबांचा हातखंडा आहे. १९७८ साली पुलोद सरकारच्या काळात महाराष्ट्राने तो अनुभवलाही आहे. पण हे सरकारही फक्त दोन वर्षच काम करु शकले. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे पवार साहेबांना काय पाच वर्ष सुखासुखी मुख्यमंत्रीपद उपभोगता आले नाही.
साहेबांचं पुलोदचं सरकार म्हणजे एक प्रकारे काँग्रेसच्याच वळचणीतले नेते असलेले, पण काँग्रेस विरोधी सरकार होते. या सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक दबदबा काँग्रेसी नेत्यांचा राहिला. तरुण तडफदार असलेल्या पवार साहेबांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याने त्यांनी हे इंदिराविरोधी कडबोळ्याचे सरकार स्थापन केले. पण काहीकाळातच त्यांना पायउतार व्हावं लागलं. आणि यानंतर १९८० मध्ये काँग्रेसचे ए.आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. यानंतर पवार साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सलग दहा वर्ष तिष्ठत बसावं लागलं. पण जेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली, तेव्हा ज्या काँग्रेसवर नाराज असलेल्यांना एकत्रित करुन १९७८ मध्ये पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं, त्याच काँग्रेसने त्यांना दहा वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री बनवलं.

आजही तशीच काहीशी स्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधींच्या काँग्रेसमधील एकाधिकारशाहीला विरोध होता, म्हणून महाराष्ट्रात पुलोद सरकारची स्थापना झाली. तर आज मोदींच्या एकाधिकारशाहीला विरोध असल्याने, एनडीएतल्या घटक पक्षांसह सर्वजण एकत्रित येत आहेत. त्यासाठीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित बोलावून डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार हे येणारा काळच ठरवेल. कारण, एकतर देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसला सत्तेसाठी इतर कोणत्या पक्षातील नेत्याचे नेतृत्व कितपत मान्य होईल हा एक प्रश्न आहे. शिवाय, केंद्रात असे कडबोळ्याचे सरकार चालवताना कितपत अडचणीचे असते, हे आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या काळात, आणि त्यानंतर १९८९ च्या व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात संपूर्ण देशाने अनुभवले आहे.
आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनता सरकारमध्ये अनेक पक्ष आणि त्यांची स्वतंत्र भूमिका मान्य करताना मोरारजींचीही दमछाक होत होती. तर १९८९ च्या व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात ओम प्रकाश चौटाला आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंग यांनी व्ही.पी.सिंग यांना ते सरकार नीट चालू दिले नाही. त्यामुळे त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने कडबोळ्यांच्या सरकारला सत्तेतून खाली खेचलं. आणि त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांनी देशाची सूत्रं हाती घेतली. १९९१ पासून ते आजपर्यंत देशात तिसऱ्या आघाडीचा वारंवार प्रयत्न झाला. पण जनतेने तो नाकारला.

आज मोदी मुक्त भारत करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जाणते राजे प्रचंड आशावादी नजरेनं पंतप्रधान पदाकडे पाहात आहेत. त्यांची ही सुप्त इच्छा आगामी काळात पूर्ण होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. तो पर्यंत पवारसाहेबांचे डोहाळ जेवण यशस्वी होवो ही इच्छा..!